काश्मीरच्या एका तरुणीचा पक्षी आणि प्राणी यांच्याविषयीचा स्नेह बघून आपल्याला नवल वाटेल. ती जम्मू-काश्मीरमधील एकमेव 'वन्यजीव बचाव तज्ज्ञ' म्हणून काम करते. अस्वल, साप, बिबट्या आणि इतरही बऱ्याच प्राण्या-पक्ष्यांचा जीव वाचवणारी म्हणून तिची एक वेगळीच ओळख आहे. या कामाबद्दल तिला लेफ्टनंट मनोज सिन्हा यांच्या हस्ते ‘वन्यजीव सन्मान’ हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलाय. पशू-पक्ष्यांची ही मैत्रीण म्हणजे श्रीनगरच्या वजीरबाग भागात राहणारी ४१ वर्षीय आलिया मीर. जाणून घेऊया आलियाची ही कहाणी...
प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल नेहमी स्नेह बाळगणाऱ्या आलियाने सन २००४ मध्ये उच्च शिक्षणासाठी दिल्ली गाठली. एकीकडे शिक्षण घेत असतानाच, दुसरीकडे ती तिच्या या आवडीमुळे, तिथे भटक्या आणि वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी काम करणाऱ्या ‘वाइल्ड लाइफ एसओएस' या संस्थेत स्वयंसेविका म्हणून काम करू लागली. सन १९९५ मध्ये स्थापन झालेली 'वाइल्ड लाइफ एसओएस' (WSOS) ही भारतातील 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. या संस्थेचा उद्देश, संकटात सापडलेल्या वन्यजीवांचा बचाव आणि पुनर्वसन करणे; तसेच भारताचा नैसर्गिक वारसा जतन करणे, हा आहे.
एका वर्षानंतर आलिया ही ‘वाइल्ड लाइफ एसओएस’ची प्रकल्प-व्यवस्थापक झाली. तिथे तिने सहसंस्थापकांच्या मदतीने ‘मिटिगेशन ऑफ ह्यूमन वाइल्ड लाइफ कॉन्फ्लिक्ट’ (MHWC) नावाचा एक प्रकल्प तयार केला. तिच्या टीमसोबत ती आता दाचीगाम आणि पहलगाम या दोन ठिकाणी' अस्वल बचाव केंद्रां'चेदेखील काम बघते. या केंद्रात दोन प्रकारच्या म्हणजे, आशियात आढळणारी काळ्या रंगाच्या आणि हिमालयाच्या परिसरात आढळणाऱ्या तपकिरी रंगाच्या अशा एकूण आठ अस्वलांचा समावेश आहे.
आयुष्यातील टर्निंग पॉईंट
आलिया सांगते, “जेव्हा मी २००७ मध्ये 'वाइल्डलाइफ एसओएस'मध्ये सहभागी झाले तेव्हा काश्मीरमधील एक बातमी माझ्या वाचण्यात आली. काश्मीरमध्ये लोकांनी भीतीपोटी प्राण्यांना मारहाण केली व जाळण्याचा प्रयत्न केला, असं त्या बातमीत म्हटलं होतं. त्या प्राण्यांमध्ये काश्मिरी अस्वलांचाही समावेश होता. ती बातमी वाचून मला अतिशय वाईट वाटलं. खूपच हृदयद्रावक घटना होती ती. काश्मिरात प्राणिसंवर्धनाविषयी काम करणे अत्यंत गरजेचे आहे याची मला तेव्हा जाणीव झाली आणि अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत यासाठी मी प्रयत्न सुरू केले. ही घटना माझ्यासाठी 'टर्निंग पॉईंट' ठरली."
आलिया पुढे म्हणते, “लोकांच्या पाठिंब्याशिवाय प्राणिसंवर्धनाविषयी काम करणे अशक्य आहे. त्यासाठी आता आम्ही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेतो, जनजागृती कार्यक्रम आयोजित करतो."
प्राणिसंवर्धनाविषयी आलिया ही संपूर्ण मानवजातीला काही सांगू इच्छिते. यासंदर्भात ती म्हणते, "प्राण्यांचीही काळजी मानवाप्रमाणेच घ्या. त्यांनादेखील जगण्याचा अधिकार आहे. मी करत असलेल्या कामाविषयी मला आदर आहे. हे काम प्रसंगी धोकादायकही ठरू शकते याची मला जाणीव आहे. मात्र, योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली तर सर्व काही शक्य आहे. लोकांच्या पाठिंब्यामुळे मला काम करत राहण्याची प्रेरणा मिळते."
साप पकडण्यात प्रावीण्य
विविध पक्षी, आशियाई काळे अस्वल आणि हिमालयीन तपकिरी अस्वल यांसह अनेक वन्यप्राण्यांची सुटका आलियाने केली आहे; परंतु साप पकडण्यासाठी ती विशेष प्रसिद्ध आहे. कार्यालये आणि कॉरिडॉर, कार, लॉन, गार्डन, बस, रूम अशा विविध ठिकाणी आढळलेले साप पकडून तिने त्यांची सुखरूप सुटका केली आहे व त्यांना पुन्हा जंगलात सोडले आहे. काश्मीरमध्ये तिने आजवर जवळपास ३०० साप आणि पक्षी यांना वाचवले आहे. त्यांत इजिप्शियन गिधाड, सोनेरी गरुड यांसारख्या विदेशी पक्ष्यांचाही समावेश आहे.
'वायपर'ला वाचवल्यानंतर आलिया प्रसिद्धीच्या झोतात
सन २०१९ मध्ये आलियाने जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी आढळून आलेला 'लेव्हेंटाईन वायपर' या प्रकारातला विषारी साप पकडून त्याची सुटका केली होती. हा सापनंतर डाचीगाममधील जंगलात सोडून देण्यात आला. दोन किलो वजनाच्या या सापाला पकडल्यामुळे आलिया तेव्हा चर्चेत आली होती. हा साप वन्यप्राण्यांच्या गटातील सर्वात मोठा सरपटणारा प्राणी आहे. याशिवाय, जहाँगीर चौकात स्कूटरमध्ये अडकलेल्या सापाचीही सुटका आलियाने केली होती. या प्रसंगाचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
पशू-पक्ष्यांविषयी जनजागृती
पशू-पक्ष्यांचा बचाव करण्याबरोबरच सापांबद्दलही आलिया स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करते. लोकांच्या मनात असलेली सापांबद्दलची भीती आणि घृणा दूर करण्यासाठी तिने २०२१ मध्ये 'वन्यजीव बचाव' ही हेल्पलाइन सुरू केली. साप आणि इतर वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी 'जम्मू-काश्मीर वन्यजीव संरक्षण विभागा'सोबत ती सध्या काम करत आहे.
लेफ्टनंट मनोज सिन्हा यांच्या हस्ते सन्मान
लेफ्टनंट मनोज सिन्हा यांनी आलियाला ‘वन्यजीव सन्मान’ पुरस्कार प्रदान केला. 'जम्मू-काश्मीर कलेक्टिव्ह फॉरेस्ट'ने आयोजित केलेल्या 'जागतिक वनीकरण दिना'च्या समारंभात आलियाला हा सन्मान प्रदान करण्यात आला. याबाबत आलिया सांगते, “हा सन्मान मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. ज्यांनी माझ्यावर प्रत्येक टप्प्यावर विश्वास ठेवला आणि मला इथपर्यंत पोहोचण्यास मदत केली, अशा सर्व लोकांची आभारी आहे."
वन्यजीव संरक्षणासाठी पुरस्कृत
काश्मीरमधील अस्वलाचे बचावकार्य, वन्यप्राण्यांची सुटका, जखमी प्राण्यांची सेवा आणि वन्यजीवांची काळजी या कामगिरीबद्दल, तसेच वन्यजीवसंरक्षणाच्या इतर सर्व बाबींमध्ये आलियाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वन्यजीव SOS कार्यक्रमांतर्गत शिक्षणप्रणालीची प्रमुख म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत असणारी आलिया ही काश्मीरमधील 'पहिली महिला वन्यजीव बचावकर्त्री’ आहे.
- छाया काविरे