रिलस्टार मोहसीन कुरेशी गणेशोत्सवाच्या काळात देतोय ऐक्याचा संदेश

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
डिजिटल क्रिएटर मोहसीन कुरेशी आणि त्याची मित्रमंडळी
डिजिटल क्रिएटर मोहसीन कुरेशी आणि त्याची मित्रमंडळी

 

भक्ती चाळक

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. चहूकडे रेखीव गणेश मूर्तींचे स्टॉल्स लागलेत. विद्युत रोषणाई आणि  सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्यात. रस्त्यांवर भव्य मंडप उभारले जातायेत. ढोल-ताशांच्या सरावाचे आवाज वातावरण मंत्रमुग्ध करतायेत. या सर्व तयारीत नक्षीदार पांढरी टोपी घातलेला एक कार्यकर्ता सर्वांचे लक्ष वेधतोय.   

सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय मोहसीन कुरेशी या तरुणाच्या व्हिडीओची. कधी हातात रंगीबेरंगी पताका घेऊन आरास करताना तर कधी घरोघरी फिरून गणपतीचा चंदा मागताना. मोहसीन सध्या गणपतीच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी जोमात करताना दिसतोय. हे फक्त इंस्टाग्रामपुरते मर्यादित नाही बरं. तर मोहसीन खऱ्याखुऱ्या आयुष्यात एका गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे. 

मुंबईचा लोकप्रिय डिजिटल क्रिएटर मोहसीन कुरेशी बाप्पाच्या आगमनाच्या मंगलमयी दिवसांत सामाजिक सलोख्याचा संदेश देतोय. त्याच्या याच खास प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी ‘आवाझ-द-व्हॉईस’ने मोहसीनशी गप्पा मारल्या.

संमिश्र वातावरणात वाढलेला तरुण
मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील चांदिवली माडा परिसर. इथे असलेल्या बीईएसटी (BEST) कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत मोहसीन लहानाचा मोठा झाला. वडील बेस्ट उपक्रमात शासकीय सेवेत असल्यामुळे इथेच त्याचे बालपण गेले.

बालपणीच्या गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा देताना मोहसीन म्हणतो, “आमच्या या बेस्ट क्वार्टर्समध्ये चार इमारती होत्या. त्या काळात चारही इमारती मिळून एकच गणेशोत्सव मंडप असायचा. विशेष म्हणजे तो मंडप आमच्याच इमारतीच्या प्रांगणात उभा राहायचा.” 

तो पुढे म्हणतो, “बाप्पाच्या आगमनाची तयारी, रात्रभर जागून केलेली सजावट, आरतीचा गजर आणि नंतरचा महाप्रसाद... या सगळ्या वातावरणातच माझे बालपण गेले. माझ्या घरात कुराण पठण आणि बाहेर गल्लीत बाप्पाच्या आरत्यांचे सूर घुमायचे. दोन्ही संस्कृती एकत्र अनुभवत मी मोठा झालो.”

मोहसीनचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले, तरी वसाहतीतील वातावरण पूर्णपणे महाराष्ट्रीयन होते. यामुळे साहजिकच त्याचा मित्रपरिवार बहुतांश मराठी बनला. मुस्लिम कुटुंबात जन्म झाला तरी वेगवेगळ्या धर्मांचे सण-उत्सव एकत्र साजरे करण्याची शिकवण त्याला याच बीईएसटी क्वार्टर्समधून मिळाली.
 

त्रिवेणी संगमाची यारी
सचिन दामोदर आणि सौरभ पाटील हे मोहसीनचे अगदी लहानपणापासूनचे जीवाभावाचे मित्र. आजच्या काळात सोशल मीडियावर धर्मावरून विद्वेष पसरवला जात असताना या तिघांची मैत्री सामाजिक सलोख्याचं उत्तम उदाहरण ठरलीये.

आपल्या मैत्रीच्या या अनोख्या समीकरणाबद्दल मोहसीन म्हणतो, “माझा सगळ्यात पहिला आणि जवळचा मित्र सचिन दामोदर हा नवबुद्ध आहे. तर दुसरा मित्र सौरभ पाटील हा हिंदू मराठा. आमच्या या ग्रुपमध्ये बौद्ध, मुस्लिम आणि हिंदू असा अनोखा त्रिवेणी संगम आहे. लहानपणापासून आम्ही एकमेकांचे सण आनंदाने साजरे करत आलो आहोत. त्यामुळे कधी वेगळेपण जाणवले नाही.” 

तो पुढे म्हणतो, “सोशल मीडियावर अनेकदा धर्मांवरून वाद पेटलेले दिसतात. त्यात काही खऱ्या तर काही खोट्या गोष्टी असतात. पण या अशा गोष्टींचा आमच्या मैत्रीवर कधीच परिणाम झाला नाही. या मुद्द्यावरून आमची कधी भांडणेही झाली नाहीत. उलट आम्ही एकत्र राहिलो तर आम्हाला पाहून पुढची पिढीही चांगल्या गोष्टी शिकेल, असा विचार आम्ही करतो.”

मोहसीन आणि त्याच्या मित्रांमध्ये नेहमीच सामाजिक विषयांवर चर्चा होत असतात. मित्राने दिलेल्या शिकवणीवर मोहसीन म्हणतो, “ईद असो, दिवाळी असो वा गणेशोत्सव... आपण प्रत्येक सणात तेवढ्याच उत्साहाने सामील झाले पाहिजे. कारण उत्सव हे माणसाला जोडण्यासाठी असतात. ही शिकवण मला सचिननेच दिली होती. आम्ही तिघेही मित्र आज याच वाटेवर चालतो.”

लालबाग राजाच्या दर्शनाचा अनुभव 
लहानपणी आपल्या इमारतीच्या मंडपात गणेशोत्सव अनुभवणाऱ्या मोहसीनला मुंबईच्या मध्यवर्ती भागातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे भव्य रूप पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. मित्रांच्या आग्रहास्तव तो पहिल्यांदाच लालबाग, परेळ परिसरात गणेशोत्सवाची भव्यता अनुभवायला गेला आणि त्या अफाट जनसागराने तो अक्षरशः भारावून गेला. 

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर पहाटे पाच वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जनाची आरती पाहायला तो मित्र परिवारासोबत दोन-तीन तास आधीच जाऊन उभा राहिला होता. त्या अनुभवाचा साक्षीदार ठरलेला मोहसीन म्हणतो, “मी जेव्हा पहिल्यांदा लालबाग परिसरात फिरलो, तेव्हा ती गर्दी आणि तो उत्साह पाहून मी थक्क झालो होतो. एका गैर-हिंदू मुलासाठी असा अनुभव अत्यंत वेगळा होता.”

तो पुढे म्हणतो, “लाखो लोक तिथे बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असायचे. लालबागच्या राजाचे थेट दर्शन मला दोनदा जाऊनही मिळू शकले नाही, पण तिथल्या वेगवेगळ्या देखाव्यांनी माझे मन जिंकले. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी तर गिरगाव चौपाटीवर पहाटे पाच वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जनाची आरती पाहायला आम्ही दोन-तीन तास आधीच जाऊन उभे राहिलो होतो. उद्योगपती अंबानी यांच्या मुलापासून ते सामान्य माणसापर्यंत सगळे तिथे एकत्र उभे होते. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही.”

 
मोहसीन कसा झाला इन्स्टाग्रामर? 
अकरावीत असताना मोहसीनने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती. हळूहळू त्याच्या व्हिडिओंचे कौतुक होऊ लागले आणि अवघ्या अकरावीत असतानाच त्याच्या अकाउंटने १० हजार फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला.

या यशानंतर त्याने डिजिटल क्रिएशनमध्येच पूर्णवेळ करिअर करण्याचा निर्णय घेतला. पालकांनी थेट विरोध न दर्शवता त्याला एक मोलाचा सल्ला दिला. हे सगळं करत असताना शिक्षण अजिबात सोडू नकोस, असे पालकांनी त्याला सांगितले. पालकांचे म्हणणे ऐकत मोहसीनने वाणिज्य शाखेतून आपली पदवी (B.Com) यशस्वीरीत्या पूर्ण केली. आज इन्स्टाग्रामवर लाखो आणि युट्यूबवर ३० हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेला मोहसीन एक यशस्वी कंटेंट क्रिएटर बनला आहे.

मोहसीन हा हलकेफुलके मनोरंजनात्मक व्हिडीओ तर बनवतोच परंतु त्याचे सामाजिक विषयांवरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. त्याच्या व्हिडीओमध्ये कोणत्याच प्रकारची कृत्रिमताआढळत नाही. उलट व्हिडीओ बनवताना तो दखनी भाषेचा वापर करताना दिसतो. 

‘व्हेन मुस्लिम सेलिब्रेट गणेश चतुर्थी’
सोशल मीडियावर काम करत असताना त्याने आपल्या सभोवतालच्या वातावरणाचे निरीक्षण केले. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मुस्लिम तरुण अत्यंत हिरिरीने सहभागी होतात, वर्गणी गोळा करण्यापासून ते घरातून नैवेद्य देण्यापर्यंत सर्व कामे करतात. हे वास्तव त्याने जवळून पाहिले होते.

याच वास्तववादी अनुभवातून ‘व्हेन मुस्लिम सेलिब्रेट गणेश चतुर्थी’ या संकल्पनेचा जन्म झाला. या गाजलेल्या रील्समागची भूमिका स्पष्ट करताना मोहसीन सांगतो, “माझा पहिला व्हिडिओ ‘नॉन-महाराष्ट्रीयन स्पीक्स मराठी’ असा होता. त्या व्हिडीओला मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले, लोकांनी त्याला खूप पसंती दिली. माझी मराठी भाषा अगदी अस्खलित किंवा परफेक्ट नाही. परंतु मी महाराष्ट्रीयन असल्याने अभिमानाने मराठी बोलतो.”

तो पुढे म्हणतो, “या व्हिडीओला मिळालेल्या प्रतिसादानंतर गणेशोत्सवावर व्हिडीओ बनवायचे ठरवले. गणेशोत्सवाच्या काळातप्रत्येक मंडळात कुणी ना कुणी मुस्लिम मुलगा असतोच, जो आपल्या मंडळाला मनापासून पाठिंबा देतो. मी स्वतः हे सगळे अनुभवले आहे. म्हणूनच मी ही रील्स संकल्पना तयार केली. लोकांना ती खूप आवडली आणि लोकांनी आपापल्या मुस्लिम मित्रांना त्यात टॅग करायला सुरुवात केली.”

संवेदनशील विषयांवरील व्हिडीओ 
अशा संवेदनशील विषयांवर व्हिडिओ बनवताना मोहसीनला आपल्या कुटुंबाचा, विशेषतः आईचा पूर्ण पाठिंबा मिळाला. मुस्लिम कुटुंबातील मुलाने गणेशोत्सवावर व्हिडिओ बनवल्यावर समाजातूनही प्रतिक्रया आल्या.

अशा प्रकारचा सामाजिक आशय असलेल्या व्हिडिओंना घरातील ज्येष्ठ व्यक्ती आणि मुख्यत्वे आईकडून मिळालेल्या पाठींब्यावर मोहसीन म्हणतो, “मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्यावर आम्मीला आधी दाखवले. आम्मीने मला फक्त एकच गोष्ट सांगितली. ‘तू लोकांमध्ये एकता दाखवणारे चांगले काम करत आहेस, हे खूप छान आहे. फक्त तुझ्या बोलण्याने किंवा व्हिडिओने कुठल्याही जातीचा, धर्माचा किंवा पंथाचा अवमान होणार नाही, याची काळजी घे.’ असं ती म्हणाली.”

गणेशोत्सव मंडळ सामाजिक ऐक्याचं माध्यम 
आपल्या गणेश मंडळातील सहकाऱ्यांबद्दल आणि तिथल्या वातावरणाबद्दल बोलताना मोहसीन सांगतो की, तिथे कसलाही भेदभाव नसतो. आपल्या बालपणीच्या मित्रांसोबत मंडळाचे काम करताना येणाऱ्या अनुभवाबद्दल तो म्हणतो, “आमच्या मंडळातील कार्यकर्ते आमचे लहानपणीचे मित्रच आहेत. तिथे कोणी लहान किंवा मोठे नसते. कोण हिंदू, कोण मुस्लिम आणि कुणी नवबुद्ध... याने कोणालाच फरक पडत नाही. मंडळाकडे येणारा प्रत्येक नागरिक आनंदाने आणि समाधानाने परत गेला पाहिजे, एवढाच आमचा प्रयत्न असतो.”

सोशल मीडियाचा वापर द्वेष पसरवण्यासाठी करण्याऐवजी, आपली संस्कृती, बंधुभाव आणि सलोखा मजबूत करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, हे मोहसीनने दाखवून दिले आहे. डोक्यावर पांढरी टोपी घालून बाप्पाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या मोहसीनच्या रूपाने सर्वांचे इन्स्टाग्राम अल्गोरिदम नक्कीच सकारात्मक होईल. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News