मासिक पाळी आणि आपली मध्ययुगीन मानसिकता!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 11 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

- प्रतिमा जोशी, [email protected]

 

मासिक पाळी येणे हे खरे तर निसर्गाचे चक्र. बाईला आरोग्यासाठी मिळालेले जणू कवच. शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर टाकून बाई दर महिन्याला शुद्ध होत असते. याच कथित अशुद्ध रक्तामुळे पुनरुत्पादन प्रक्रिया चालू राहून मानवाचा वंश चालू राहतो; पण याच स्रावाने बाईला प्रसंगी जीव गमवावा लागतो. अजून किती वर्षे आपण असे मध्ययुगातच राहणार आहोत?

 

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटलेला आणि गेली सुमारे साडेचार दशके कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवत असताना गर्भारपण, बाळंतपण, मातामृत्यू, बालमृत्यू, बालविवाह, गर्भधारणा रोखण्यासाठी निरोध व तत्सम साधने यांचा प्रचार आणि या सर्वांच्या निमित्ताने लैंगिकतेवर ‘प्रबोधन’ करत असणारा आपला देश आजही स्त्रियांच्या ‘योनी’भोवतीच योग्य - अयोग्यतेचे काटेरी कुंपण राखण्यात धन्यता मानत आहे. हे सिद्ध करणाऱ्या काही घटना गेल्या काही आठवड्यांत घडल्या आहेत. पुढेही घडत राहतील, कारण या बाबतीत आपण मध्ययुगातून बाहेर यायला तयारच नाही, असे दिसते.

 

महामुंबईचा एक भाग असलेल्या उल्हासनगरात अगदी काहीच दिवसांपूर्वी घडलेली ही घटना माणूस म्हणून थरकाप उडविणारी तर आहेच; परंतु एका लोकशाही देशाचे नागरिक म्हणून एकाच वेळी लाज आणि चिंतासुद्धा वाटायला लावणारी आहे. या उपनगरातील एका सर्वसाधारण वस्तीत राहणाऱ्या तिशीतल्या भावाने आपल्या छोट्या १२ वर्षांच्या बहिणीला चार दिवस सतत इतकी मारहाण केली की त्यात ती जिवानिशी गेली. ही मारहाण का केली? तर तिला नुकतीच पाळी सुरू झाली.

 

पहिल्यांदाच असे झाल्याने हे काय होतेय, हे तिलाही समजत नसताना त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण सुरू केली. तिचे कोणाशी तरी लैंगिक संबंध आल्यामुळेच योनीतून हा रक्तस्राव होत असल्याच्या समजुतीत त्याने तिला जाब विचारत सलग चार दिवस सळीने मारले, चटके दिले, उपाशी ठेवले. ती मुलगी काहीच सांगू शकली नाही, कारण तिलाच या मासिक धर्माबद्दल फारशी कल्पना नव्हती. भेदरून गेली होती ती. त्यात आई-वडील गावाला. भावाचा मारता हात वरच्या वर रोखण्यासाठी तिच्या बाजूने कोणीच नाही. परिणामी ती कोवळी पोर छळ असह्य होऊन भुकेल्या अवस्थेत मृत्युमुखी पडली.

 

अंगावर काटा आणणारी ही घटना भारतातील पुरुषसत्ताक, पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेचे निदर्शक तर आहेच; पण शरीरविज्ञानाबाबत अपसमज आणि स्त्रियांचे दुय्यमत्व दाखवून देणारी आहे. स्त्रियांचे चारित्र्य योनीभोवतीच केंद्रित झालेले आहे आणि त्याच्यावर पुरुषांचा पहारा आणि मालकी दोन्ही आहे, असे बजावून सांगणारा हा प्रसंग आहे. स्त्री ही बालपणी वडील व भावांच्या, तरुणपणी नवऱ्याच्या आणि म्हातारपणी मुलाच्या ताब्यात, देखरेखीखाली, कडेकोट पहाऱ्यात असायला हवी या मानसिकतेचे प्रतीक ही घटना आहे.

 

या घटनेतील जीव गमावलेल्या छोट्या मुलीबद्दल आपले मन कळवळते. तिच्यावर भयंकर अत्याचार करणाऱ्या भावाचा रागसुद्धा येतो. त्याला कायद्याने जी काय व्हायची ती शिक्षासुद्धा होईल. प्रश्न त्याच्या मानसिकतेचा आहे. योनीमार्गातून होणारा रक्तस्राव हा मासिक पाळीचा आहे, अशी शक्यता वाटण्यापेक्षा या मुलीचे कोणाशी तरी लैंगिक संबंध आल्याने योनी पटल फाटल्याने हा स्राव होतोय, हे त्याच्या मनात अधिक पक्के बसलेले असणे, हे आपल्याकडील अनेक समूहात आजही पावित्र्याचा ज्या कल्पना अस्तित्वात आहेत, त्याचे निदर्शक आहे.

 

आजही अशा हजारो कुटुंबांत विवाहाच्या पहिल्या रात्री वधू-वराला सफेद चादरीवर समागम करणे आवश्यक मानतात. या चादरीवर रक्ताचे डाग असल्याची खात्री घरातले मोठे लोक करून घेतात. ही खात्री असते ती वधूच्या अक्षत योनीची. म्हणजे तिचा हा पहिलाच समागम असल्याची! म्हणजेच ती पवित्र असल्याची... उष्टावलेली नसल्याची... तिचे चारित्र्य शुद्ध असल्याची! योनिपटल पतीने समागम करण्याआधी फाटलेले असेल, तर मुलगी चांगल्या चालीची नाही.

 

तिचे याआधी अन्य पुरुषाशी संबंध आले, असे समजणारे कोट्यवधी लोक आपल्या देशात आजही अस्तित्वात आहेत आणि रुढी, परंपरा यांच्या नावाखाली त्यांच्या या समजुती पिढ्यान् पिढ्या चालू राहिलेल्या दिसतात. यात बळी जातो तो स्त्रियांचा. योनिपटल अनेक कारणांनी फाटू शकते. कष्टाची कामे करताना, सायकल चालवताना, चढण चढताना, लांब उडी मारताना... अनेक महिला क्रीडापटूंच्या बाबतीत हे खूप सर्वसाधारण आहे; मात्र याचा संबंध केवळ विवाहानंतरच्या शरीरसंबंधांशीच जोडला गेल्यामुळे असंख्य स्त्रियांना चारित्र्याच्या प्रश्नावर आजही अग्निदिव्य पार पाडावे लागते, हे आपण मोठ्या प्रमाणात अद्याप मध्ययुगात असल्याचेच दर्शवते. यातील विसंगती म्हणजे शुद्धतेची, चारित्र्याची, पावित्र्याची अशी कोणतीच कसोटी पुरुषांना मात्र लावली जात नाही.

 

दुसरी बातमी आहे आसाममधील. या सरकारने आरोग्यविषयक नोंद या नावाखाली शाळकरी विद्यार्थिनींसाठी एक योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना एक कार्ड दिले जाते. या कार्डवर मासिक पाळीच्या तारखांची नोंद दर महिन्याला नियमित ठेवणे बंधनकारक आहे. मुलींच्या लैंगिक आरोग्याबाबत काळजी म्हणून हे ठीक आहे; परंतु या योजनेचा आणखी एक उद्देश आहे आणि तो म्हणजे अकाली गर्भधारणा उघडकीस आणणे. कुमारी मातांचा प्रश्न हे या योजनेमागील मुख्य कारण आहे. कारणामागील काळजी समजू शकते.

 

मात्र इथेही मासिक पाळीची नोंद करण्याच्या माध्यमातून लक्ष आहे, नियंत्रण आहे ते मुलींवरच. साधारण ११ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना मासिक पाळी सुरू होते. म्हणजे साधारण सहावी-सातवी ते नववीपर्यंतच्या मुलींसाठी जागृती, प्रबोधन या मार्गाने आरोग्य आणि वयात येतानाचे मानसिक प्रश्न याबाबत कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. खरे तर मुलांचाही वयात येण्याचा हाच वयोगट आहे. त्यांनासुद्धा अशा उपक्रमांची गरज आहे. किंबहुना त्यांनाच अधिक गरज आहे, कारण आपल्या कुटुंब व्यवस्थेत सर्वाधिक गैरसमज/ अपसमज हे पुरुषांमध्ये रुजवले जातात. मर्दानगीच्या कल्पनांपासून ते स्त्रियांना वस्तू समजण्यापर्यंत अनेक चुकीचे आणि घातक समज मुले/पुरुष यांच्यात असतात.

 

मुळात विज्ञानशिक्षणाबाबत आपल्याकडे बरीच उदासीनता आहे. त्यात शरीरविज्ञान म्हणजे काहीतरी चावट गोष्ट अशी शिक्षकांचीसुद्धा धारणा असते. सेक्स हा शब्दच आपल्याकडे विकृतीच्या अनेक छटा घेऊन येतो. आपला लैंगिक निचरा कुठेही आणि कोणावरही करणे हे पुरुषांसाठी अगदीच स्वाभाविक, सामान्य समजले जाते. त्यात पुरुषार्थ वगैरे मानला जातो; पण बाईने मात्र कोंडून घ्यायला हवे.

 

नवऱ्याचा तिच्यावर पहिला आणि शेवटचा हक्क असे दुहेरी मापदंड आहेत. त्यामुळे मुलांना काय नियंत्रणात ठेवायचे? नियंत्रण मुलींसाठीच हे आपल्यात पक्के रुजलेले आहे. स्त्री शरीराचा आदर ही कल्पनाच आपल्याकडे आपण अद्याप रुजवू शकलेलो नाहीत. उल्हासनगरच्या घटनेत ही सारी वैशिष्ट्ये दिसून येतात. ती घटना म्हणजे केवळ ‘आयपीसी’खाली येणारी सर्वसाधारण गुन्हेगारी घटना नाही, तर व्यक्तीच्या सन्मानाचे मूल्य पायदळी तुडवून लिंगनिरपेक्ष न्यायाचे संविधानाने दिलेले आश्वासन मोडीत काढणारी घटना आहे.

 

आपला देश एकाच वेळी जणू विविध युगांत जगतो आहे, असे कधी कधी वाटते. केरळ राज्याने अलीकडेच पाळीच्या दिवसात शाळकरी मुली आणि कामकरी महिलांना सुट्टी दिली जाईल, असे जाहीर केले आहे. या दिवसांत स्त्रियांचे जीवन त्रासाचे, वेदनेचे असते, त्यामुळे ही सुट्टी, असे हे सरकार म्हणते. एका बाजूला स्त्रीआरोग्याची काळजी, दुसरीकडे कुमारी मातांचे भय, तिसरीकडे चारित्र्यावर संशय. पुष्कळशा जमाती/समूह असे आहेत की पाळी आली की मुलीला नवरीसारखे नटवून धार्मिक कर्मकांड करतात आणि हळूहळू तिच्या लग्नाच्या गोष्टी सुरू होतात.

 

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातसुद्धा १८ वर्षे पूर्ण व्हायच्या आधी मुलींची लग्ने उरकणारी हजारो कुटुंबे आहेत. मासिक पाळी येणे हे खरे तर निसर्गाचे चक्र. बाईला आरोग्यासाठी मिळालेले जणू कवच. शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर टाकून बाई दर महिन्याला शुद्ध होत असते... नि याच कथित अशुद्ध रक्तामुळे पुनरुत्पादन प्रक्रिया चालू राहून मानवाचा वंश चालू राहतो; पण हाच स्राव, तो स्रवणारी योनी हे मात्र आपल्याकडे अपवित्र, पापाची खाण मानली जाते. बाईला त्याची जन्मभर किंमत मोजावी लागते, प्रसंगी जीव गमवावा लागतो. अजून किती वर्षे आपण असे मध्ययुगातच राहणार आहोत?

 

(लेखिका ज्‍येष्ठ पत्रकार आणि सुपरिचित कथाकार असून, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करतात.)

(सौजन्य: दै. सकाळ)