शंपी चक्रवर्ती पुरकायस्थ
समुद्राच्या प्रचंड लाटा, नदीचे अरुंद पात्र आणि पाण्याचा भयंकर प्रवाह! पण यापैकी कोणतीही गोष्ट त्यांची जिद्द मोडू शकली नाही. हा व्यवसाय पूर्णपणे पुरुषप्रधान मानला जायचा. रेशमा निलोफर नहा यांनी ही जुनी परंपरा मोडित काढली आणि एक नवा इतिहास रचला. त्या जगातील पहिल्या महिला 'रिव्हर पायलट' बनल्या आहेत. प्रबळ इच्छाशक्तीसमोर कोणतीही अडचण टिकू शकत नाही. त्यांनी आपले कौशल्य, धाडस आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे सिद्ध करून दाखवले.
चेन्नईत एका सामान्य कुटुंबात रेशमा यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांनी मोठी स्वप्ने उराशी बाळगली होती. अभ्यासात त्या अत्यंत हुशार होत्या. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी चेन्नईच्या प्रसिद्ध 'अॅकॅडमी ऑफ मेरीटाइम एज्युकेशन अँड ट्रेनिंग'मध्ये (एएमईटी) प्रवेश घेतला. तिथे त्यांनी सागरी तंत्रज्ञानाचे धडे गिरवले.
हे शिक्षण पूर्ण होताच त्यांचा खऱ्या अर्थाने सागरी प्रवास सुरू झाला. प्रवाशांची जहाजे आणि 'कंटेनर' जहाजे घेऊन त्यांनी जगभरात सफर केली. या प्रत्येक प्रवासाने त्यांना आणखी मजबूत बनवले. भविष्यातील कठीण आव्हानांसाठी त्यांना अगदी भक्कमपणे तयार केले.
समुद्रातील या प्रदीर्घ अनुभवानंतर रेशमा यांनी कोलकाता बंदरात (तत्कालीन कोलकाता पोर्ट ट्रस्ट) प्रशिक्षण घेतले. हे अत्यंत कठोर प्रशिक्षण तब्बल साडेसहा वर्षे चालले. शेवटी २०१८ मध्ये त्यांना कोलकाता बंदरात पूर्णवेळ 'मेरीटाइम पायलट' म्हणून नियुक्त करण्यात आले. याच क्षणी इतिहासात एका नव्या पानाची नोंद झाली. रेशमा निलोफर नहा यांनी जगातील पहिल्या महिला 'रिव्हर पायलट' म्हणून आपले पहिले पाऊल पुढे टाकले.
आपल्या कामाबद्दल रेशमा अतिशय मनमोकळेपणाने बोलतात.

"एखादे जहाज सुरक्षितपणे बंदरात आणणे आणि पुन्हा बाहेर नेणे, हे 'मरीन पायलट'चे मुख्य काम असते. या कामासाठी प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताकद लागते. एखादी गोष्ट तुम्ही पहिल्यांदाच करत असाल, तर ते काम अधिकच कठीण होऊन बसते", असे त्या सांगतात.
सुरुवातीला अनेकांनी त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले. काही महिन्यांतच त्या ही अत्यंत कठीण नोकरी सोडून देतील, असा अनेकांचा समज होता. पण त्यांनी या सर्व शंका खोट्या ठरवल्या. आज त्या अत्यंत जबाबदारीने आणि चोखपणे आपले काम पार पाडत आहेत.
'रिव्हर पायलट' या कामाचे महत्त्व सांगताना रेशमा यांनी एक महत्त्वाची बाब मांडली.
"आम्ही एका विशिष्ट बंदराशी जोडलेले स्थानिक तज्ज्ञ मार्गदर्शक असतो. आम्हाला जशी जहाजाची माहिती असते, तशीच बंदराच्या प्रत्येक वळणाची आणि वाटेची खडान् खडा माहिती असते. जहाजाचा कॅप्टन सर्वच बंदरांचा तज्ज्ञ असू शकत नाही. तिथेच 'मरीन पायलट'ची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते", असे त्यांनी स्पष्ट केले.
समुद्राच्या तुलनेत नदीपात्रात जहाज चालवणे खूप मोठे आव्हानात्मक असते. नदीचे अरुंद पात्र, वाळूचे ढिगारे, अतिशय टोकदार वळणे आणि पाण्याचा धोकादायक प्रवाह तिथे असतो. त्यामुळे प्रत्येक क्षणी मोठा धोका संभवतो.
"एका सेकंदाचा चुकीचा निर्णय मोठा अनर्थ घडवू शकतो. त्यामुळे नेहमी मानसिकदृष्ट्या सतर्क राहावे लागते. वेगाने निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी", असा कानमंत्र रेशमा देतात.
या व्यवसायात शारीरिक तंदुरुस्तीला खूप महत्त्व आहे. 'पायलट लाँचर' किंवा छोट्या बोटीतून जहाजावर जावे लागते. त्यासाठी दोरीच्या शिडीवरून चढावे आणि उतरावे लागते. यासाठी शरीरात खूप मोठी ताकद आणि लवचिकता लागते.
कामाचे प्रदीर्घ तास, कुटुंबापासूनचा दुरावा आणि खवळलेल्या समुद्राशी सतत चालणारा संघर्ष! या सर्व गोष्टींमधूनच रेशमा निलोफर नहा यांचे हे कणखर व्यक्तिमत्त्व घडले आहे.
महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम प्रतीक म्हणून त्यांना 'नारी शक्ती पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. पण त्यांच्यासाठी पुरस्कारापेक्षाही मोठी एक प्रेरणा आहे. स्वतःची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडून त्या आज असंख्य तरुण मुलींना एक नवा मार्ग दाखवत आहेत.
तुमच्याकडे धाडस असेल आणि स्वप्ने पाहण्याची ताकद असेल, तर कोणताही समुद्र खोल नसतो. कोणतीही नदीची वाट अरुंद नसते. कोणतीही गोष्ट एका महिलेला कधीच थांबवू शकत नाही. हे त्यांनी आपल्या कृतीतून संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter