नाहीद मुकीतुल्ला : अर्बानो डेनिमला जेनझीच्या पसंतीस उतरणाऱ्या उद्योजिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
नाहीद मुकीतुल्ला
नाहीद मुकीतुल्ला

 

रत्ना जी. चोत्रानी

वेस्ट हैदराबादच्या गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये डेनिमची एक अनोखी कहाणी विणली जात आहे. अर्बानो ब्रँडच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नाहीद मुकीतुल्ला आणि त्यांच्या भावांनी मिळून ही कहाणी तयार केली आहे. त्यांनी आपल्या कौटुंबिक नात्याचे रूपांतर एका यशस्वी व्यावसायिक भागीदारीत केले आहे. 

या संपूर्ण प्रवासात नाहीद यांचे पती समीर मसरत पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. समीर हे पडद्यामागचे मुख्य सूत्रधार आहेत. नाहीद फॅशन डिझायनिंग आणि ब्रँडची धुरा सांभाळतात. दुसरीकडे समीर हे व्यवसाय ऑपरेशन्स, रणनीती आणि विस्ताराचे काम चोखपणे पाहतात.

भारतातील नामवंत आणि महागड्या फॅशन विश्वावर सहसा अनुभवी मास्टरजींचे वर्चस्व पाहायला मिळते. परंतु, नाहीद आणि त्यांच्या भावंडांनी फॅशनचे हे प्रस्थापित नियम बदलून पारडे आपल्या बाजूने झुकवले आहे. पारंपारिक कारागिरी आणि आधुनिक डिझाइनचा सुरेख संगम साधत नाहीद यांनी समकालीन भारतीय फॅशन जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

शाश्वत फॅशन आणि नैतिक मूल्यांना त्यांनी आपल्या ब्रँडच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. हैदराबादमधील एका व्यावसायिक कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या या धडाडीच्या महिला उद्योजिकेने हैदराबाद या जागतिक तंत्रज्ञान शहरात आपल्या सर्जनशीलतेची पाळेमुळे शोधली.
 

कौटुंबिक व्यवसायाचा सुरुवातीचा अनुभव आणि घरातील पुरोगामी वातावरणामुळे नाहीद यांच्या मनात फॅशनबद्दल आवड निर्माण झाली. हीच आवड आज त्यांच्या प्रवासाचे मुख्य वैशिष्ट्य बनली आहे. त्यांची ही डिझाइन शैली केवळ झेड जनरेशन आणि तरुण पिढीलाच आकर्षित करत नाही, तर लिंग आणि प्रसंगांमधील अंतरही यशस्वीपणे मिटवत आहे. त्यांचे कपडे आणि डिझाइन केवळ फॅशन म्हणून मर्यादित नाहीत. स्वतः कष्ट करणाऱ्या आणि धावपळीचे आयुष्य जगणाऱ्या पिढीसाठी हे कपडे तयार केले आहेत. हे डेनिम लिंक्डइनवर व्यावसायिक आणि प्रतिष्ठित दिसतात, इन्स्टाग्रामवर उठून दिसतात आणि इतर सर्व ठिकाणी अत्यंत आरामदायी ठरतात.

नाहीद यांनी जेव्हा हैदराबाद आणि इतर राज्यांमधील कपड्यांच्या दुकानांना भेटी दिल्या, तेव्हा त्यांना सगळीकडे एकच गोष्ट पाहायला मिळाली. सर्वच ठिकाणी अत्यंत साधे आणि नेहमीचेच डेनिम विकले जात होते. निळ्या रंगाचे चिनोज, नेहमीच्या वॉशचे शर्ट आणि अगदी साधे कपडे बाजारात उपलब्ध होते. हे पाहून ऑनलाईन बाजारात डेनिमसाठी एक मोठी पोकळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही पोकळी अगदी स्पष्ट होती. दुकानांमधील रॅक कपड्यांनी भरलेले होते, पण डिझाइनमध्ये नावीन्य नव्हते. 

भारतात डेनिमची कमतरता नव्हती, तर कमतरता होती ती खवय्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये इच्छा निर्माण करण्याची. 'अर्बानो'ने नेमकी हीच पोकळी भरून काढली. आज त्यांच्या कपड्यांचे वॉश ग्राहकांशी थेट संवाद साधतात. यामध्ये मंडे मॉर्निंग कॉफीसाठी 'कोल्ड ब्रू फेड', विंटेज वॉश आणि स्टोन वॉश यांचा समावेश आहे. यासोबतच ऑलिव्ह ग्रीन, ब्राऊन आणि ऑफ व्हाईट अशा रंगांमधील डेनिमही उपलब्ध आहेत. पावसाळ्याच्या ढगांसारखा 'मॉन्सून ग्रे' आणि 'फिल्टर कॉफी' सारखा गडद ब्राऊन रंग ग्राहकांना भुरळ पाडत आहे. त्यांचे प्रत्येक डिझाइन हे सोयीचे आणि फॅशनेबल आहे.

तरुण नाहीद यांनी बेंगळुरू येथून आयआयएम अहमदाबादचा (IIMA) उद्योजकता अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सण्‍मानितही करण्यात आले आहे. नोकरीमध्ये रस नसल्यामुळे त्यांनी अवघ्या काही लाखांच्या बचतीमधून 'अर्बानो'ची सुरुवात केली. आज हा ब्रँड ऑनलाईन जगतातील आघाडीचा डेनिम लाईफस्टाईल ब्रँड म्हणून नावारूपास आला आहे. आदित्य बिर्ला समूहाच्या 'टीएमआरडब्ल्यू' (TMRW) ग्रुपचे पाठबळ मिळाल्यामुळे company ची झपाट्याने वाढ झाली आहे.
 

पुरुषांसाठी आणि मुलांसाठी शर्ट, चिनोज, टी-शर्ट, जॅकेट, हुडीज असो किंवा महिलांसाठी अ‍ॅसिड वॉश को-ऑर्ड्स असो, हे सर्व कपडे ग्राहकांचा मूड पाहून डिझाइन केले जातात. नाहीद किंवा त्यांच्या भावांना फॅशन मार्केटिंग आणि ब्रँडिंगचा कोणताही पूर्वअनुभव नव्हता. परंतु, या तिघांकडेही ग्राहकांची गरज आणि नवीन ट्रेंड ओळखण्याची उपजत कला आहे. त्यांचे कपडे अधिक आकर्षक, स्टाईलिश आणि स्वतःची वेगळी छाप पाडणारे असतात. 

नाहीद यांच्या या अखंड प्रवासामागे समीर मसरत यांची मोठी ताकद आहे. समीर हे स्वतः एक उद्योजक असून ते अर्बानोच्या वाढीमध्ये आर्थिक आणि व्यवस्थापकीय शिस्त आणतात. ते पुरवठा साखळी, पुरवठादार भागीदारी आणि विस्ताराची रणनीती यांसारखी पडद्यामागची सर्व कामे सांभाळतात. यामुळे नाहीद यांना कपड्यांच्या डिझायनिंगवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे स्वातंत्र्य मिळते. मित्रमंडळी समीर यांचे वर्णन नाहीद यांचे हक्काचे सल्लागार आणि प्रत्येक मोठ्या निर्णयाची तावूनसुलाखून चाचणी घेणारी व्यक्ती म्हणून करतात.

 नवीन कपड्यांचे कलेक्शन बाजारात आणण्यापासून ते निधी उभारणीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात समीर महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचे शांत आणि पडद्यामागचे व्यक्तिमत्त्व नाहीद यांच्या आघाडीच्या भूमिकेला संतुलित करते. एका यशस्वी संस्थापकामागे व्यवसायाची धुरा सांभाळणारा एक खंबीर जोडीदार असतो, हेच यावरून सिद्ध होते. ही संपूर्ण टीम सर्व लिंगांसाठी पूरक डिझाइन तयार करते.

आज अर्बानो भारतातील हजारो पिन कोडवर कपड्यांची डिलिव्हरी करते. त्यांचे सर्वाधिक विकले जाणारे कपडे केवळ जीन्स नसून त्यांचे सर्वच प्रॉडक्ट्स आहेत. हे कपडे कॉर्पोरेट बोर्डरूममधील बैठकांपासून ते स्टार्टअपचे संस्थापक, फॅशन स्टायलिस्ट किंवा कोल्हापुरी चपलांसोबत पेअर करणारे प्रशासकीय अधिकारीही आवडीने वापरतात. तरुण पिढीसाठी ही स्टाईल अतिशय रंजक आहे. कपडे न बदलता तुम्ही कॅफेमधून थेट संध्याकाळच्या पार्टीला जाऊ शकता. हे कपडे जणू 'तुमच्या प्रगतीसोबत स्वतःला बदलणारे डेनिम' आहेत. अर्बानोच्या ऑफिसच्या भिंतींवर एकच वाक्य लिहिलेले दिसते, "आम्ही निळा रंग विकत नाही. आम्ही मूड विकतो." बाजारात सर्वत्र साधे कपडे मिळत असताना, अर्बानोचा हा नवा मूड आता ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter