सहेर अली : आर्ट थेरपीतून मनःशांतीचा मंत्र देणाऱ्या सायकोलॉजिस्ट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 19 h ago
सहेर अली
सहेर अली

 

रत्ना जी. चोत्रानी

आजच्या या आव्हानात्मक काळात आपल्यापैकी बरेच जण व्यावसायिक मदतीच्या शोधात असतात. यासाठी आपण समुपदेशक, थेरपिस्ट, सायकॉलॉजिस्ट आणि मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव घेतो. यानंतरचा पुढचा प्रश्न असा असतो, की हे तज्ज्ञ किती पात्र किंवा अनुभवी आहेत. एका थेरपिस्टसाठी किमान पात्रता मास्टर पदवी असणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्यक्षात किती जण खरोखरच योग्य पात्रतेचे असतात हा प्रश्नच आहे. अशा वातावरणात सहेर अली यांचे नाव समोर येते. 

सहेर अली या पेशाने एक 'होलिस्टिक सायकॉलॉजिस्ट' (समग्र मानसोपचारतज्ज्ञ) आहेत. त्यांनी समुपदेशनाच्या जगात अत्यंत स्पष्टता, उद्देश आणि शांत व संथ उत्क्रांतीच्या जोरावर आपले पाऊल ठेवले आहे. आपल्या कामात स्वतःची वैयक्तिक उपस्थिती, सहानुभूती आणि इतरांसाठी सुरक्षित व परिवर्तनशील वातावरण निर्माण करण्याची क्षमता आवश्यक आहे, याची त्यांना पक्की जाणीव आहे.

एम.एस्सी. पदवी आणि मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा एक संपूर्ण नवीन दृष्टिकोन यामुळे मानसिक आजारातून बरे होण्याच्या प्रक्रियेला एक वेगळेच वळण मिळाले आहे. सहेर अली या एक लोकप्रिय 'माइंड डॉक्टर' म्हणून ओळखल्या जातात. "आनंदाने आणि सुसंवादाने जगायचे असेल तर माणसाने आपल्या अंतर्गत आणि बाह्य वातावरणात समतोल साधला पाहिजे", असा सहेर यांचा ठाम विश्वास आहे. 
 

प्रत्येकाला कधी ना कधी आपल्या मानसिक आरोग्याची तपासणी करून घेण्याची गरज असते, यात शंका नाही. अनेक लोकांसाठी रंगांच्या आणि कलेच्या माध्यमातून केली जाणारी थेरपी म्हणजेच 'आर्ट थेरपी' शांतता मिळवून देणारी गुरुकिल्ली ठरत आहे. याच उद्देशाने सहेर अली यांनी 'टोटम्स स्टुडिओ'ची स्थापना केली आहे. या स्टुडिओमध्ये कलेचा वापर माणसाचे लक्ष एकाग्र करण्यासाठी आणि स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी केला जातो.

कलेला कोणत्याही सीमा नसतात आणि ती तुम्हाला कागदावर तसेच आयुष्यात स्वतःचे अस्तित्व पुन्हा मिळवून देण्यास मदत करू शकते, असे सहेर मानतात. या उपचार पद्धतीमध्ये त्या एक अग्रगण्य तज्ज्ञ आहेत. त्यांना काळजी आणि प्रेमाचा मोठा कौटुंबिक वारसा लाभला आहे. लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात वाढलेल्या सहेर यांना त्यांच्या पालकांकडून नेहमीच प्रोत्साहन मिळाले. पालकांकडून मिळालेल्या या सकारात्मक विचारांचा वापर त्यांनी आपल्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये अतिशय सुंदरतेने केला आहे.

सहेर अली यांनी आपल्या प्रशिक्षणाची सुरुवात बंगळुरूच्या मॉन्टफोर्ट कॉलेजमधून केली. तिथे त्यांनी रेकी, अ‍ॅक्यूप्रेशर, प्राणिक हिलिंग आणि होमिओपॅथी यांसारख्या पर्यायी उपचार पद्धतींचा सखोल अभ्यास केला. या भक्कम पायामुळे त्यांना मानसिक आरोग्याकडे एका बहुआयामी दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता मिळाली.
 

त्यानंतर सहेर यांची कारकीर्द वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विस्तारत गेली. शैक्षणिक संस्थांपासून ते खाजगी क्लिनिक, स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या कामाचा अनुभव वाढत गेला. या अनुभवाने त्यांच्या मानवी स्वभावाच्या आकलनाला अधिक प्रगल्भ केले. सभोवतालचे वातावरण माणसाच्या भावनिक आरोग्याला कसे आकार देते आणि उपचार हे लादण्याऐवजी त्याचे स्वागत कसे केले पाहिजे, हे त्यांना समजले. 

त्या म्हणतात, की कला आता फक्त एखाद्या स्टुडिओपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती सवडीच्या वेळी उत्स्फूर्तपणे आणि सर्जनशीलतेने साकारलेली एक सुंदर कलाकृती आहे. मानसिक आघातांचा सामना करणाऱ्या लोकांसाठी सहेर अली कलेच्या माध्यमातून एक सुरक्षित वातावरण तयार करतात. सर्वांनी मिळून एकत्र चित्र काढण्याच्या सत्रांमधून त्या लोकांचे दुःख सामूहिक अभिव्यक्ती आणि आशेमध्ये बदलतात. 
 

सहेर यांच्या मते, ही थेरपी कॅनव्हासचा वापर एक सुरक्षित जागा म्हणून करते. जिथे व्यक्ती आपल्या भावनिक आणि मानसिक भावनांना मोकळी वाट करून देऊ शकते. त्यांच्या या थेरपीमुळे खराब मानसिक आरोग्याचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा आधी असणारा तिरस्कार आणि उपहास आता संपला आहे. त्याची जागा आता लोकांच्या कुतूहल आणि आश्चर्याने घेतली आहे. काही प्रसंगांमध्ये तर रुग्ण स्वतः अत्यंत आनंदाने हातात ब्रश घेतात. ते या कलाकृतीमध्ये स्वतःचे रंग भरतात आणि बघता बघता रिकाम्या कॅनव्हासचे रूपांतर एका सुंदर कलेत करतात. 

आज सहेर यांचे कार्यक्रम विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाच्या आरोग्याला नजरेसमोर ठेवून तयार केले गेले आहेत. यामध्ये तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य व्यवस्थापन यांसारख्या विषयांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. सर्जनशील आणि शारीरिक मानसोपचारांच्या माध्यमातून इतरांना सक्षम करणे हेच आपले खरे ध्येय आहे, असे सहेर सांगतात.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter