रुबिना मजीद : शिक्षण व्यवस्थेला नवा मानवी चेहरा देणारी प्रयोगशील शिक्षिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 8 h ago
Rubina Majid, Founder Our School @ 12th Avenue, Hyderabad
Rubina Majid, Founder Our School @ 12th Avenue, Hyderabad

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitterरत्ना जी. चोत्राणी / हैदराबाद

हैदराबादच्या ऐतिहासिक हुसैनी आलम भागातील 'अवर स्कूल @ १२थ ॲव्हेन्यू'मध्ये वर्गातली आसनव्यवस्था पाहिल्यानंतर तिथे केवळ पुस्तकी शिक्षण दिले जात नाही, तर त्याहून खूप मोठा विचार रुजवला जात असल्याचे स्पष्ट जाणवते.

या शाळेत एखाद्या डॉक्टरच्या मुलीशेजारी कसाईचा मुलगा बसलेला दिसतो. कॉक्लिअर इम्प्लांट (कर्णबधिरत्वावरील शस्त्रक्रिया) झालेला विद्यार्थी ऑटिझम स्पेक्ट्रमवर असलेल्या आपल्या वर्गमित्रासोबत एकाच बाकावर बसून शिकतो. दुकानदार, इंजिनिअर, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुले येथे गुण्यागोविंदाने एकत्र शिकतात, खेळतात आणि लहानाची मोठी होतात.

हे सर्व काही योगायोगाने घडलेले नाही. शिक्षणतज्ज्ञ रुबिना मजीद यांच्या दूरदृष्टीचे हे फलित आहे. प्रत्येक मुलाला, आणि विशेषतः ज्यांना 'सामान्य' किंवा 'अभ्यासात कच्चे' समजले जाते, त्यांनाही यशस्वी होण्याची एक उत्तम संधी मिळाली पाहिजे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले आहे.

https://www.awazthevoice.in/upload/news/1781942023Rubina_Majid.jpeg

रुबिना यांचा हा प्रवास त्यांच्या जन्मभूमी हैदराबादमधून सुरू झाला. त्यांचे शालेय शिक्षण काश्मीरमध्ये पूर्ण झाले. पुढे त्यांनी प्रतिष्ठित अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून 'एमबीए'ची पदवी घेतली. त्यामुळे त्या कॉर्पोरेट क्षेत्रात मोठे करिअर करतील, असाच सर्वांचा अंदाज होता. परंतु, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

लग्नानंतर रुबिना सौदी अरेबियातील जेद्दाह येथे वास्तव्याला गेल्या. त्यांचे पती सौदी एअरलाईन्समध्ये 'एरोनॉटिकल इंजिनिअर' म्हणून कार्यरत होते. तिथे एका सुरक्षित आणि सुबक वातावरणात त्यांचे अतिशय सुरळीत आयुष्य सुरू होते. पण एके दिवशी त्यांच्या दारावर पडलेल्या एका अनपेक्षित थापेने आयुष्याला कलाटणी दिली. जवळच्याच एका शाळेला आठवडाभरासाठी तातडीने एका पर्यायी शिक्षिकेची गरज होती. 'तुम्ही शिकवाल का?' अशी विचारणा त्यांना झाली आणि रुबिना यांनी लगेच होकार दिला.

त्यांच्या त्या एका साध्या 'होकार'ने त्यांचे संपूर्ण भविष्य बदलून टाकले. लहान मुलांच्या वर्गासमोर शिकवण्यासाठी उभ्या असताना त्यांना जगण्याचा एक असा नवा आनंद गवसला, जो व्यवस्थापन शास्त्राच्या मोठ्या लेक्चर्समध्ये कधीच मिळाला नव्हता. या अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी 'इलिनॉय स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन'ची मान्यता असलेली 'टीचिंग इंग्लिश' या विषयातील पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.

https://www.awazthevoice.in/upload/news/1781942069WhatsApp_Image_2026-06-10_at_5.52.16_PM_(3).jpeg

त्यानंतर त्या जेद्दाहमधील 'यू.एस. एम्बेसी स्कूल'मध्ये रुजू झाल्या. तिथे त्यांनी वेगवेगळ्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना शिकवले. दुसरीच्या मुलांना 'फोनिक्स' (उच्चारशास्त्र) शिकवण्यापासून ते मोठ्या मुलांना रसायनशास्त्र आणि इतिहास शिकवण्यापर्यंतचा व्यापक अनुभव त्यांनी गाठीशी बांधला. मुले नेमकी कशा प्रकारे शिकतात, याची एक सखोल समज त्यांच्यात विकसित झाली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, परीक्षेतील प्रत्येक गुणांच्या आकडेवारीमागे अफाट क्षमता असलेले एक स्वतंत्र मूल दडलेले असते, हे वास्तव त्यांना उमगले.

२००८ मध्ये पतीच्या निवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब भारतात परतले. हैदराबादमध्ये त्याकाळी अनेक शाळा उपलब्ध होत्या. तरीही तिथे कशाची तरी मोठी उणीव असल्याचे रुबिना यांना जाणवले. संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही केवळ 'टॉपर' विद्यार्थ्यांवर आणि गुणतालिकांच्या रँकिंगवर लक्ष केंद्रित करत होती. तर अभ्यासात मध्यम असलेल्या सामान्य मुलांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात होते. सुरुवातीला त्यांनी शाळांमधील शिकवण्याच्या पद्धती सुधारण्यासाठी एक 'एज्युकेशनल कन्सल्टन्सी' सुरू केली. पण आपली खरी जागा कन्सल्टन्सीच्या कार्यालयात नसून प्रत्यक्ष वर्गातच आहे, याची जाणीव त्यांना अल्पावधीतच झाली.

२००९ मध्ये त्यांनी हैदराबादच्या अत्यंत जुन्या हुसैनी आलम भागात 'अवर स्कूल @ १२थ ॲव्हेन्यू' ची मुहूर्तमेढ रोवली. 'शिक्षण हे प्रत्येकाचे हक्काचे असले पाहिजे', हे त्यांचे मूळ तत्त्वज्ञान या शाळेच्या नावातूनच प्रतिबिंबित होत होते.

"आपण येथे केवळ रँक मिळवणारी मुले तयार करायला बसलेलो नाही," असे रुबिना आपल्या शिक्षकांना नेहमी बजावून सांगतात. "आपल्याला उत्तम आणि संवेदनशील माणसे घडवायची आहेत, गुण आपोआप मागे येतील." रुबिना यांच्या मते, दर्जेदार शिक्षणाचा पाया हा दर्जेदार शिक्षकांमधूनच रचला जातो. 'अवर स्कूल'मध्ये शिक्षकांची भरती ही केवळ पहिली पायरी असते. प्रत्यक्ष शिकवण्याची जबाबदारी हाती घेण्यापूर्वी प्रत्येक शिक्षकाला साडेचार महिन्यांचे अतिशय सखोल प्रशिक्षण घ्यावे लागते आणि त्यानंतर सहा आठवडे वर्गातील अध्यापनाचे बारकाईने निरीक्षण करावे लागते.

https://www.awazthevoice.in/upload/news/1781942137WhatsApp_Image_2026-06-10_at_5.52.16_PM.jpeg

या प्रशिक्षणात केवळ विषयाच्या ज्ञानावरच लक्ष केंद्रित केले जात नाही. तर बालमानसशास्त्र, पाठ्य नियोजन, वाचन सुधारणा आणि वर्ग व्यवस्थापनाचे धडे दिले जातात. शिक्षकांना एक अत्यंत साधे पण प्रभावी तत्त्व शिकवले जाते: जर एखाद्या मुलाला शिकताना अडचण येत असेल, तर त्या मुलाला दोष देण्याऐवजी आपल्या शिकवण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार केला पाहिजे. "सामान्य विद्यार्थी ही समस्या नसते," असा रुबिना यांचा दृढ विश्वास आहे. "मुलांच्या गरजांनुसार शिक्षण व्यवस्थेने स्वतःमध्ये बदल केला पाहिजे." सर्वसमावेशकता हे 'अवर स्कूल'चे केवळ कागदावरचे धोरण नसून, तो त्यांच्या दैनंदिन आचरणाचा भाग आहे.

शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे दहा टक्के मुलांना विशेष शैक्षणिक आधाराची गरज आहे. यामध्ये कॉक्लिअर इम्प्लांट झालेली आणि ऑटिझम स्पेक्ट्रमवरील मुले आहेत. ती इतर सामान्य मुलांसोबत एकाच वर्गात बसून शिकतात, सर्व शालेय उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेतात आणि त्यांना प्रगतीच्या समान संधी दिल्या जातात. त्यांच्यासाठी कोणताही वेगळा विभाग नाही किंवा त्यांच्यावर कोणताही शिक्का मारला जात नाही.

https://www.awazthevoice.in/upload/news/1781942113WhatsApp_Image_2026-06-10_at_5.52.15_PM_(2).jpeg

ही शाळा सामाजिक आणि आर्थिक सर्वसमावेशकतेसाठी तितकीच कटिबद्ध आहे. जुन्या शहराच्या मध्यभागी असलेली ही शाळा सर्व समाज आणि स्तरांतील मुलांचे खुल्या दिलाने स्वागत करते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही आपल्या मुलांना चांगल्या शाळेत टाकता यावे, यासाठी शाळेची फी जाणीवपूर्वक अत्यंत माफक ठेवली आहे. "जर एखाद्या पानविक्रेत्याच्या मुलाला आपल्या शाळेची फी परवडत नसेल, तर आपण संस्था म्हणून अपयशी ठरलो आहोत," असे रुबिना म्हणतात. "शिक्षणाची उपलब्धता ही केवळ माहितीपत्रकातील आश्वासनापुरती मर्यादित न राहता ती प्रत्यक्षात असली पाहिजे."

रुबिना यांच्या या कार्याचा ठसा केवळ त्यांच्या शाळेपुरताच मर्यादित राहिलेला नाही. त्या आंध्र प्रदेशमधील शिक्षकांना नियमितपणे प्रशिक्षण देतात. अपुऱ्या सोयीसुविधा आणि मर्यादित साधने असलेल्या शाळांमध्येही मुलांची शिकण्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल, याचे धडे त्या देतात.

 त्याच वेळी, चूल आणि मूल यात अडकलेल्या अनेक महिलांसाठी त्यांनी रोजगाराची नवी दारे खुली केली आहेत. विशेष शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या या महिलांना व्यावसायिक कौशल्ये आणि आत्मविश्वास देतात, ज्यामुळे त्यांना शिक्षण क्षेत्रात एक सन्मानाचे करिअर घडवता येते. या उपक्रमातून आतापर्यंत सुमारे ३०० महिला प्रशिक्षित शिक्षिका बनल्या आहेत.

"एका महिलेला प्रशिक्षित करा," त्या म्हणतात, "आणि तुम्ही संपूर्ण कुटुंबाचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकता." वाचन तज्ज्ञ आणि अभ्यासक्रम विकसक असलेल्या रुबिना यांनी मुलांच्या बौद्धिक कुवतीनुसार शिक्षण पद्धती तयार करण्यात अनेक वर्षे खर्च केली आहेत. जर पाचवीतला एखादा विद्यार्थी दुसरीच्या पातळीचे वाचन करत असेल, तर त्या यात अपयश पाहत नाहीत. उलट त्यांना यात शिकवण्याची एक नवी संधी दिसते.

अशा वेळी मुलाला शिक्षा करणे किंवा त्याला वर्गात कमी लेखणे हा त्यावरचा उपाय नसतो. तर 'फोनिक्स', मार्गदर्शित वाचन, वैयक्तिक लक्ष आणि अत्यंत संयमपूर्ण आधार देणारा एक सुव्यवस्थित आराखडा तयार करणे हा असतो. त्यांचे तत्त्वज्ञान अगदी सोपे आहे: अतिशय हुशार असलेली मुले यशस्वी होण्याचे मार्ग स्वतःच शोधून काढतात. परंतु, ज्या मुलांना शिकण्यासाठी थोडा जास्त वेळ, प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाची गरज असते, त्यांच्यासाठी शिक्षण व्यवस्थेने तितकीच ऊर्जा खर्च केली पाहिजे.

'अवर स्कूल @ १२थ ॲव्हेन्यू'च्या आवारात फेरफटका मारल्यास तुम्हाला केवळ परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित केलेले आणि निरव शांतता असलेले वर्ग दिसणार नाहीत. त्याऐवजी तिथे अर्थपूर्ण हालचाली सुरू असलेल्या दिसतील. कॉक्लिअर इम्प्लांट झालेला विद्यार्थी अत्यंत आत्मविश्वासाने विज्ञानाचा प्रोजेक्ट समजावून सांगताना दिसेल. एखादी शिक्षिका थेट जमिनीवर बसून मुलांना कठीण परिच्छेद वाचायला आणि समजून घ्यायला मदत करताना दिसेल. तर लहान मुले 'चांगला मित्र कशाला म्हणतात' यावर चर्चा करताना आणि एकमेकांची भिन्न मते आदराने ऐकायला शिकताना दिसतील.

भविष्यातील यशाची इमारत याच भक्कम पायावर उभी राहते. रुबिना यांच्या मते, शिक्षण म्हणजे केवळ गुणपत्रिकेवर मोठे आकडे मिळवणे नव्हे; तर ते मुलांमध्ये सहानुभूती, आत्मविश्वास, जिज्ञासा आणि निकोप चारित्र्य रुजवणे आहे.

रुबिना मजीद यांचा हा दीर्घ प्रवास - हैदराबाद ते काश्मीर, अलिगढ ते जेद्दाह आणि पुन्हा हुसैनी आलमपर्यंत - एका अढळ विश्वासावर आधारलेला आहे: शिक्षण हे केवळ मोजक्या असामान्य मुलांसाठी न राहता ते प्रत्येक मुलाच्या सेवेत असले पाहिजे.

त्या भारतात 'बिझनेस'ची पदवी घेऊन परतल्या होत्या, पण त्यांच्या अंतरात्म्याची ओढ शिक्षणाकडे होती. या प्रवासात त्यांची खात्री पटली की, शिक्षण व्यवस्था नेहमीच अव्वल विद्यार्थ्यांचे मोठे कौतुक करते. परंतु, ज्यांना केवळ आधाराची आणि विश्वासाची गरज असते अशा बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे ती सोयीस्करपणे दुर्लक्ष करते. म्हणूनच त्यांनी या मधल्या फळीतील मुलांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

आज आपल्या शाळेच्या, शिक्षक प्रशिक्षणाच्या आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्या यशाच्या पारंपारिक व्याख्यांना आव्हान देत आहेत. सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष शिक्षणासाठी भरमसाठ फीची गरज नसते, हे त्या आपल्या कृतीतून सिद्ध करत आहेत. अर्थपूर्ण शिक्षक प्रशिक्षण हे केवळ शनिवार-रविवारच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेपुरते मर्यादित असू शकत नाही. आणि अगदी भिन्न सामाजिक स्तरांतील मुलेही एकत्र शिकू शकतात, प्रगती करू शकतात आणि गुण्यागोविंदाने राहू शकतात. प्रगतीपुस्तके (रिपोर्ट कार्ड्स) कालांतराने स्मृतीतून पुसून जातील.

पण शिकण्यातील अडचणींवर जिद्दीने मात करणाऱ्या मुलाचा आत्मविश्वास कायम टिकून राहील. कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या विद्यार्थ्याने वर्गात म्हटलेली कविता कायम स्मरणात राहील. धडपडणाऱ्या विद्यार्थ्याने यशस्वीपणे वाचलेला पहिला परिच्छेद कायम जिवंत राहील.

https://www.awazthevoice.in/upload/news/1781942045WhatsApp_Image_2026-06-10_at_5.52.14_PM_(1).jpeg

ज्या मुलांकडे शिक्षण व्यवस्थेने अनेकदा दुर्लक्ष केले, त्यांच्यासाठी रुबिना मजीद यांनी 'अवर स्कूल @ १२थ ॲव्हेन्यू' ची पायाभरणी केली. त्यांचे कार्य आपल्याला याचीच आठवण करून देते की, शिक्षण म्हणजे मुलांची मोजमाप करणे नव्हे; तर त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना मोठे होण्यास बळ देणे आहे. कारण जेव्हा तुम्ही मधल्या फळीला शिकवता, तेव्हा तुम्ही संपूर्ण वर्गाची प्रगती साधता. जेव्हा तुम्ही एका महिलेला प्रशिक्षित करता, तेव्हा तुम्ही विकासाची असंख्य दारे खुली करता.


हा लेखही वाचा - नाहीद मुकीतुल्ला : अर्बानो डेनिमला जेनझीच्या पसंतीस उतरणाऱ्या उद्योजिका


आणि जेव्हा तुम्ही एका सामान्य मुलाला एक असामान्य शिक्षक देता, तेव्हा तुम्ही 'रँक होल्डर'पेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान गोष्ट निर्माण करता - तुम्ही एक उत्तम माणूस घडवता. आणि कदाचित, हेच एकमेव रँकिंग आहे जे खऱ्या अर्थाने महत्त्वाचे असते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter