महाराष्ट्रामध्ये बदलांचे वारे आणणारे १० चेंजमेकर्स

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
महाराष्ट्रातील १० मुस्लिम चेंजमेकर्स
महाराष्ट्रातील १० मुस्लिम चेंजमेकर्स

 

आवाज द व्हॉइसने आपल्या 'द चेंजमेकर्स' या सिरीजमधून वाचकांना आतापर्यंत उत्तर प्रदेश, आसाम आणि जम्मू-काश्मीर मधील चेंजमेकर्सशी ओळख करून दिली. आता उद्यापासून पुढचे दहा दिवस आपण महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या दहा चेंजमेकर्सची आणि त्यांच्या कार्याची माहिती घेणार आहोत. हे दहाही जण उज्ज्वल आणि पुरोगामी वारसा असणाऱ्या महाराष्ट्राचे प्रतिनिधत्व तर करतातच पण ते भविष्यातील सहिष्णु, समानतावादी, सौहार्दपूर्ण आणि सर्वसमावेशक महाराष्ट्र घडवण्यात मोठे योगदान देत आहेत. 

प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या या चेंजमेकर्सच्या महत्त्वाच्या कार्याला 'आवाज द वॉइस'च्या माध्यमातून पहिल्यांदाच उजाळा मिळत आहे. उद्यापासून सलग दहा दिवस या दहा चेंजमेकर्स आणि त्यांच्या कार्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. तत्पुर्वी या दहा चेंजमेकर्स आणि  त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देणारा हा कर्टन रेजर. 

डॉ. फरहा अन्वर हुसैन शेख
 
पुण्याच्या दापोडी भागात वास्तव्यास असलेल्या डॉ. फरहा अन्वर हुसैन शेख या 'मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन'च्या माध्यमातून समाजसेवा करतात. त्या आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती निवारणासाठी कार्यरत आहेत. मुस्लिम महिलांना मस्जिदीत प्रार्थनेचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी पारंपरिक रूढींना आव्हान दिले. सामाजिक कार्य आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली. समानतेच्या लढ्यासाठी फरहा यांचे प्रयत्न प्रेरणादायी आहेत. त्यांचे कार्य पुण्यातील सामाजिक चित्र बदलत आहे. स्थानिक पातळीवर बदल घडवणारी एक प्रेरणा बनल्या आहेत.

पैगंबर शेख
पैगंबर शेख यांनी पुण्यातून 'आर्थिक कुर्बानी' उपक्रम सुरू करत परंपरांना नवे रूप दिले. त्यांनी ईद-उल-अदहाच्या बलिदानाला समाजविकासाचे साधन बनवले. शिक्षण, माइक्रोफाइनेंस आणि आरोग्य शिबिरांसाठी संसाधने वापरत ते विश्वास आणि व्यावहारिकतेचा मेळ घालत आहेत. सत्यशोधक चळवळीपासून प्रेरणा घेत त्यांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन महाराष्ट्राच्या दुर्गम भागात विकास आणि सामाजिक सलोखा वाढवत आहे. पैगंबर शेख खऱ्या अर्थाने दूरदृष्टी असलेले समाजसुधारक आहेत.

मर्झिया शानू पठाण
वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी मर्झिया शानू पठाण एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहेत. वयाच्या १२व्या वर्षी तिने मलाला यांच्यासाठी मोर्चा काढला होता. आपल्या कार्यातून मुंब्रा-कौसातील महिला आणि तरुणांना प्रोत्साहन देते. तिचा उत्साही कार्यकर्तेपणा आणि सामुदायिक उपक्रम मुंब्राच्या विकासात योगदान देत आहे. तिने समावेशक आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे.

हजरत अली सोनिकर आणि मुनिर शिकलगार 
सांगलीच्या शेतीप्रधान भागात हजरत अली सोनिकर आणि मुनिर शिकलगार मुस्लिम समाजाला सक्षम करत आहेत. हजरत हे जागृती मोहिमा आणि कार्यशाळांद्वारे तरुणांना प्रेरित करतात. मुनिर स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून संसाधने मिळवतात. त्यांचा संयुक्त जाहीरनामा शिक्षण आणि रोजगाराला चालना देत आहे. त्यांचे कार्य समाजाचे भविष्य घडवत आहे. 

साकिब गोरे
महाराष्ट्रातील बदलापूर येथे साकिब गोरे ‘व्हिजन फ्रेंड साकिब गोरे’ उपक्रमातून अनेकांचे जीवन प्रकाशमान करत आहेत. त्यांच्या आजीच्या अंधत्वाच्या संघर्षाने प्रेरित होऊन त्यांनी हा उपक्रम सुरू केला. चष्मा हा केवळ फॅशन नाही, तर दृष्टीचा आधार आहे, या विश्वासाने त्यांनी २६ लाख लोकांच्या डोळ्यांची तपासणी केली. १७ लाख मोफत चष्मे वाटले. ६३,००० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. ‘देवाभाऊ’ चष्मा केवळ ३३ रुपयांना उपलब्ध आहे. यासाठी त्यांना काठमांडू येथील जागतिक परिषदेत ‘सिस्टम लीडर पुरस्कार’ मिळाला आहे. दृष्टिहीनांना अंधारातून बाहेर काढणे, हा त्यांचा महत्वाचा उद्देश आहे.

सरफराज अहमद
सोलापूरचे ४१ वर्षीय इतिहासकार सरफराज अहमद महाराष्ट्राच्या दख्खन वारशाला जिवंत ठेवत आहेत. याविषयीची आठ पुस्तके त्यांनी लिहिली. यात ‘हैदर अली, टीपू सुलतान आणि सुलतानत-ए-खुदादाद’ यांचा समावेश आहे. गझियुद्दीन संशोधन केंद्राशी संबंधित त्यांचे कार्य ऐतिहासिक संशोधनाला चालना देत आहे. मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजीतील त्यांचे लेखन वाचकांना भुरळ पाडते. सरफराज यांचे कार्य सांस्कृतिक वारशाला पुनरुज्जीवित करत आहे आणि नव्या पिढीतील विद्वानांना प्रेरणा देत आहे.

सबा खान
मुंब्रा येथील सबा खान यांची ‘परछम’ संस्था मुलींना फुटबॉलद्वारे सक्षम करत आहे. समाजातील रूढींना आव्हान देत महिलांमधील आत्मविश्वास वाढवत आहे. वयाच्या ५०व्या वर्षी त्या लैंगिक समानता आणि धार्मिक सलोख्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी महिलांना स्वतंत्र फुटबॉल मैदान मिळवून दिले. सावित्री-फातिमा फाउंडेशनद्वारे शिक्षण आणि आर्थिक विकासाला चालना दिली. सबा यांचे परिवर्तनकारी कार्य मुंब्राच्या तरुणांना सक्षमतेचा मार्ग दाखवत आहे.

अफरोज शहा
मुंबईचे ४२ वर्षीय वकील अफरोज शहा यांनी आत्तापर्यंत वर्सोवा किनाऱ्यावरून २ कोटी किलोग्रॅम कचरा हटवला आहे. त्यांनी जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम राबवली. अफरोज शहा फाउंडेशन आता नद्या आणि कचरा संस्कृतीवर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार मिळाला. झोपडपट्टीपासून शाळांपर्यंत त्यांचे 'डेट्स विथ ओशन' उपक्रम हजारोंना प्रेरणा देत आहे. एका माणसाच्या दृढ निश्चयाने एखादी चांगली चळवळ सुरू होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले.

डॉ. सबिहा इनामदार
नाशिकच्या ४३ वर्षीय डॉ. साबिहा इनामदार सेक्स आणि रिलेशनशिप कोच म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लैंगिक आरोग्याविषयीच्या निषिद्धांना मोडीत काढले आहे. महिला आणि जोडप्यांसाठी त्यांनी सेक्स आणि रिलेशनशिपबद्दल मोकळेपणाने बोलण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण केली आहे. लैंगिकता, भावना आणि वैयक्तिक संबंधांबद्दलच्या संवादाचे सामान्यीकरण  करणे, विशेषतः महिलांसाठी त्यांचे हे कार्य महत्वाचे आहे. याविषयावरील त्यांच्या कार्यशाळा समाजाची मानसिकता बदलत आहेत. 

हुसैन मन्सूरी
मुंबईचे ४० वर्षीय हुसैन मन्सूरी यांचे ७८ लाख इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत. ते रस्त्यावरील मुलांसाठी अन्नदान करतात. भटक्या प्राण्यांची काळजी घेतात. इस्लामिक मूल्यांवर आधारित त्यांचे सत्कार्य अनेकांचे जीवन बदलत आहे. टाटा रुग्णालयाजवळ अन्नदान असो किंवा दुखावलेल्यांचे सांत्वन करणे असो, हुसैन यांची निःस्वार्थ मोहीम मुंबईच्या पलीकडे प्रभाव टाकत आहे.