पैगंबर शेख : सुधारणावादी विचारांतून सशक्तीकरणाचा संदेश देणारा तरुण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
सामाजिक कार्यकर्ते  पैगंबर शेख
सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख

 

फजल पठाण

समाजातील धार्मिक आणि सामाजिक रूढी परंपरांमध्ये कालानुरूप सकारात्मक बदल घडवणे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. आज जगातील सर्वच प्रगत समाज या प्रक्रियेतून पुढे गेल्याचे दिसते. तर त्यापासून लांब राहिल्यामुळे अनेक समाज  मागास राहिल्याचेही आपण पाहतो.   

अशा समाजांमध्ये  सामाजिक बदल, सुधारणा  घडवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात.  मात्र समाजातील बहुसंख्यक लोकांना परांपरांमध्ये बदल करण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे सुधारणेला आणि त्याचा विचार मांडणाऱ्यांना विरोधालाही सामोरे जावे लागते. मात्र ही सुधारणावादी मंडळी प्रसंगी समाजाचा रोष आणि कटुत्व पत्करून त्यांच्या उन्नतीसाठी निरपेक्षपणे आणि निस्वार्थपणे राबत असतात. पुण्याचे पैगंबर शेख हे त्यापैकीच एक. विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे ते समाजात  सुधारणावादी विचार पेरत आहेत. समाजात बदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
 
 
सुधारणावादी विचारांमुळे पैगंबर शेख यांची राज्यभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र त्यांचा आजवरचा प्रवास मोठा खडतर होता. त्याविषयी ते म्हणतात, “माझे वडील गवंडी आणि आई बांगड्या विकायची. त्यांच्यासमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न असायचा. त्यामुळे त्यांना चळवळीची काही कल्पना नव्हती. तसेच मला घरून कोणतीही विशिष्ट बंधन नव्हती. २०१० पासून मी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला लागलो. पुढे लिखाणाला आणि बोलायला सुरुवात केल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांशी माझी ओळख झाली. ही सर्व मंडळी समाज सुधारणेचे काम करत होते. त्यावेळी या कामाचे महत्त्व माझ्या लक्षात आले, आणि मी स्वतःला यासाठी वाहून घ्यायचे ठरवले.”   

यानंतर पैगंबर शेख यांनी मागे वळून पहिले नाही. पुरोगामी विचारांची कास धरून पैगंबर शेख विविध मुद्द्यांवर सक्रीय भूमिका मांडतात, अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवतात. त्यासाठी बरेचदा ते धार्मिक संकल्पनांचाही आधार घेतात.  सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या कार्यात ते आपली पत्नी आयेशा यांनाही आवर्जून सहभागी करून घेतात. 

आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी…
मुस्लिम समाजात सुधारणा व्हावी यासाठी पैगंबर शेख यांच्यासारखे अनेक तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत. मात्र ठोस भूमिकेमुळे पैगंबर शेख हे त्या सर्वांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांनी मांडलेल्या संकल्पनेपैकी एक संकल्पना म्हणजे ‘आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी’. आर्थिक कुर्बानी म्हणजे  समाजातील गरजूंच्या मदतीसाठी आर्थिक स्वरूपाची मदत करणे आहे.  
 
 
या संकल्पनेमागच्या प्रेरणेविषयी ते म्हणतात, “प्रत्येक धर्मात दानाला महत्व आहे. गेल्या ९ ते १० वर्षांपासून आमचा आर्थिक कुर्बानी हा उपक्रम सुरू आहे. समाजात गेल्या काही वर्षांपासून काही समाजकंठक इतर धर्मांच्या धर्मग्रंथातील शिकवणीवर आक्षेप घेत त्याविषयी गैरसमज पसरवतात. कुराणविषयी असे गैरसमज पसरवले जायचे. त्यावेळी मला असे वाटले की, कुराण वाचले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे. त्यामुळे मी पहिल्यांदा मराठीत कुराण वाचले. ते वाचल्यानंतर धर्माविषयक अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या. त्यापैकी एक म्हणजे कुर्बानीची संकल्पना.” 

पुढे ते म्हणतात, “कुराणच्या एका आयातीमध्ये सांगितले आहे की, तुम्ही प्राण्याची कुर्बानी दिली तर त्याच्या रक्ताचा एक थेंब सुद्धा अल्लाहपर्यंत पोहचत नाही. पोहचते ती फक्त निष्ठा. ही आयत वाचून मला वाटलं की ईश्वरापर्यंत आपली निष्ठा पोहोचवायची असेल तर आपल्याला प्रिय असणारी कोणतीही एक गोष्ट आपण अल्लाहसाठी कुर्बान करू शकतो. आजच्या काळात पैसा सर्वाधिक प्रिय आहे. त्यामुळे मी २०१४ मध्ये पहिल्यांदा आर्थिक कुर्बानीचा विचार मांडला.” 

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आर्थिक कुर्बानी हा उपक्रम राबवला जातो. त्यांच्या या संकल्पनेला २०१८ मध्ये व्यापक स्वरूप मिळालं. २०१८ मध्ये केरळमध्ये पुर परिस्थिती आली होती. यावर्षी पैगंबर यांनी या कुर्बानीच्या माध्यमातून केरळमधील पीडित नागरिकांसाठी आर्थिक आणि जीवनावश्यक गोष्टींची मदत केली होती. अशा कामांसाठी मदत निधी उभा करण्यात पैगंबर शेख यांना महाराष्ट्रातून सर्वधर्मियांनी मदत केली. यामध्ये हिंदू बांधव लक्षणीय सहभाग घेतात आणि मदत करतात.  
 
 
 
याविषयी पैगंबर शेख म्हणतात, “दरवर्षी बकरी ईदला मी मुस्लिम समाजातील नागरिकांना आर्थिक कुर्बानी करण्यासाठी आवाहन करतो. या आवाहनाला मुस्लिमच नव्हे तर सर्वधर्मीय लोक भरभरून प्रतिसाद देतात. मी सकारात्मक प्रतिसादावर भर देऊन काम करतो.  या उपक्रमातून आलेले पैसे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो.”   

पुढे ते म्हणतात, "आर्थिक कुर्बानीतून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेल्या शैक्षणिक सुविधांमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. कुर्बानीच्या पैशातून आदिवासी भागातल्या लहान मुलांपर्यंत आम्ही शैक्षणिक सुविधा पुरवल्या. २०१४ पासून आत्तापर्यंत आर्थिक कुर्बानीच्या माध्यमातून जवळपास २५ ते ३० लाख रुपये जमा झाले असून आम्ही दीड ते दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देत आहोत.”

पैगंबर शेख यांनी सुरू केलेला हा उपक्रम फक्त त्यांच्या पुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. पैगंबर शेख यांच्याकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील विविध संघटना ‘आर्थिक कुर्बानीचा’ उपक्रम राबवत आहेत. 

सामाजिक सुधारणांमध्ये मुस्लिमांचाही सहभाग 
समाजातील चुकीच्या किंवा कालबाह्य गोष्टी सुधारण्याचा आणि न्याय्य व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न  सुधारणावादी चळवळीत केला जातो.  मुस्लिम समाज सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या बाबतीत मागे राहिल्याचे अनेकदा बोलले जाते. मात्र आता चित्र बदलत आहे. मुस्लिम समाजही सुधारणेच्या आणि आधुनिकतेच्या प्रवाहात सहभागी होऊ लागला आहे. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे पैगंबर शेख. 
 
 
 
आपल्या या प्रवासाविषयी ते म्हणतात, “मुस्लिम समाज प्रेषितांच्या शिकवणीवर आचरण करतो. मी प्रेषितांच्या जीवनाचा (सिरतचा) अभ्यास केला आहे. प्रेषितांनी चौदाशे वर्षांपूर्वी सुधारणावादी आणि पुरोगामी विचार मांडत क्रांती केली होती. त्यामुळे त्यांचा हा सुधारणावादी विचार समाजात मांडला पाहिजे याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.”

पुढे ते म्हणतात, “आपल्या देशात हिंदू धर्मियांच्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा मोठा इतिहास राहिला आहे. भारतीय मुस्लिम समाजात मात्र याची फारशी उदाहरणं सापडत नाही. मात्र आता मुस्लिम समाज ही सुधारणांमध्ये सहभागी होत आहे.  आमच्या उपक्रमांना मुस्लिम समाजाचा मिळणारा मोठा प्रतिसाद त्याचेच द्योतक आहे.”   

शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी नव्हते… 
आज ३५० वर्षानंतरदेखील ज्यांच्याकडे महाराष्ट्र आदर्श म्हणून पाहतो असं एक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा आणि समतेची मूल्यं आजही प्रेरणा देतात. पण काहीजण समाजात फुट पाडण्यासाठी शिवाजी महाराजांना मुस्लिमविरोधी ठरवण्याचा उपद्व्याप करतात. काही राजकीय गट आणि संघटना शिवाजी महाराजांना हिंदूंपर्यंत मर्यादित करतात. मात्र शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी नव्हते. ते एका धर्माचे नव्हे तर रयतेचे राजे होते हे पटवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील काही मुस्लिम तरुण काम करत आहेत. त्यापैकी सर्वात प्रभावी तरुण म्हणजे पैगंबर शेख.
 

पैगंबर शेख म्हणतात, “शिवाजी महाराजांचा लढा मुस्लिमांविरुद्ध नव्हता, तर मुघल आक्रमकांविरुद्ध होता. त्यांच्या सैन्यात मुस्लिम मावळे महत्वाच्या पदांवर होते. नौदलाचं नेतृत्वही मुस्लिम सेनापतींकडे होतं. सिद्दी इब्राहिम आणि इब्राहिम खान ही दोन मोठी नावं आहेत. शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांचा आदर केला आहे. रयतेचा राजा म्हणून त्यांनी स्वराज्यात समता आणि बंधुता जपली आहे.”

आज महाराष्ट्रात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करायला लागला आहे. पैगंबर शेख शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. शिवाजी महाराजांची समाजवादी प्रतिमा ठसवण्यासाठी ते महाराजांच्या संबंधित प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ते ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ या उद्घोषनेने करतात. इतकेच नव्हे तर माणसामाणसांमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत, माणूस माणसापासून दूर जात असताना सर्व जाती धर्माच्या माणसांनी एकत्र आलं पाहिजे हे पैगंबर शेख जाणतात. त्यामुळे ते त्यांच्या भाषणांमध्ये   ‘माणसं जोडली पाहिजे’ हे वाक्य आवर्जून म्हणतात. 

समाजातील महत्वाच्या प्रश्नांवर  पैगंबर शेख निर्भीडपणे भूमिका घेतात. केवळ भूमिका न घेता गरज पडल्यास ते रस्त्यावर उतरून समाजाचे नेतृत्वदेखील करतात. संविधानिक आणि लोकशाही मार्गाने समाजाचे आणि मुस्लिमांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांची आग्रही भूमिका असते. त्यासाठी समाजाचा विशेषतः मुस्लिम समाजाचा मानस बदलण्याचे काम ते प्रभावीपणे करत आहेत.  
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter