फजल पठाण
ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपण या सुंदर जगाचं रंग, रूप आणि रस अनुभवत असतो. शरीरातील पाच ज्ञानेंद्रियांपैकी एक म्हणजे डोळा. ‘दृष्टी नाही तर सृष्टी नाही’ अस आपल्याकडे म्हटलं जातं. भारतातील ३५-४० टक्के लोकांना दृष्टीदोष आढळल्याची आकडेवारी सांगते. दृष्टीहीनांना रोजची काम करण्यासाठी अडचणी तर येतात शिवाय दुसऱ्यावर अवलंबूनही रहावं लागतं. हीच अडचण लक्षात घेऊन दृष्टीहीनांना हे सुंदर जग दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील बदलापुरचे साकीब गोरे काम करत आहेत. ‘चष्मा ही फॅशन नसून, आपली दृष्टी चिरकाल टिकवण्याचा पर्याय आहे’, अस म्हणत साकीब गोरे दृष्टीहीनांना दृष्टी देण्यासाठी धडपडत आहेत.
अशी सुरू झाली दृष्टीहीनांची सेवा
दृष्टीहीनांची सेवा करण्याच्या सुरुवातीविषयी ते सांगतात, “माझी दूरची नानी (आज्जी) आजारी होती. तीच नाव जोहरा होतं. माझी आई आणि मी नानीला पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. त्याच दिवशी नानीचा देहांत झाला. मरताना तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं.”
पुढे ते म्हणतात, “स्वाभिमानी असणारी माझी आज्जी गेल्या ३५ वर्षांपासून अंध होती. तिला असणारा मोतीबिंदू फुटल्यामुळे ती अंधारमय आयुष्य जगत होती. मी काहीच करू शकतं नव्हतो. मरताना हसण्यापेक्षा जिवंतपणी दृष्टीहीन लोकांना हसवलं पाहिजे असं मला वाटलं. तेव्हाचं मी ठरवलं होतं दृष्टीहीनांसाठी आणि त्यांचं आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी काम करायचं.”
साकीब यांनी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर कामाला सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा ट्रक क्लीनर म्हणून आणि नंतर हमाल म्हणून काम केले. ते म्हणतात, “सुरुवातीला काम करत असताना मला अनेक दृष्टीहीन लोक दिसायचे. माझी समाजसेवा करण्याची इच्छा होती. ईश्वराच्या कृपेने माझी आर्थिक आणि सामाजिक प्रगती होत गेली. सामाजिक जनीवेतूनचं मी १९९२ मध्ये पहिल्यांदा नेत्र तपासणी शिबीर आयोजित केलं.”
ते पुढे म्हणतात, “या शिबिरामध्ये मी दहा रुपयाला चष्मा ठेवला होता. तेव्हा केवळ बोटावर मोजण्या इतके चष्मे लोकांनी घेतले. बऱ्याच लोकांना पैसे नसल्याने चष्मे घेता आले नव्हते. ही बाब लक्षात येताच मी चष्मे मोफत देण्याचा निश्चय केला. त्याच वर्षी थोड्यादिवसांनी मी दुसऱ्यांदा नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं. या शिबिरात मोफत चष्मा वाटप केल्याने २७५ दृष्टीहीनांनी चष्मे घेतले.”
याच दरम्यान ‘व्हीजन फ्रेंड साकीब गोरे’ या संस्थेची सुरुवात केली. ही संस्था ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यातील १७५० गावांमध्ये दृष्टिहीन लोकांसाठी काम करत आहे.
दृष्टीहीनांच्या आशीर्वादामुळे समाजकार्यास बळ
साकीब यांनी आतापर्यंत २६ लाख लोकांची नेत्र तपासणी केली असून १७ लाख चष्म्यांचं मोफत वाटप केले आहे. तसेच ६३ हजारहून अधिक लोकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या आहेत. या प्रवासाविषयी ते सांगतात, "नेत्र तपासणी शिबिरापासून सुरू झालेला हा प्रवास आजही अविरत सुरू आहे. या मोठ्या प्रवासात अनेक सामाजिक आणि आर्थिक अडचणींना समोर जावं लागलं. अनेक वेळा मनोबल ढासळलं परंतु दृष्टीहीनांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे ही सेवा करण्याचं बळ मिळत राहिलं.”
प्रवासातील आठवणी सांगताना ते म्हणतात, “दृष्टिहीन लोकांसाठी काम करत असताना सुरुवातीला आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून प्रचार करतो. विविध गावांमध्ये जाऊन नेत्र तपासणीची शिबिर आयोजित करतो. यामध्ये चष्म्याचे मोफत वाटप करून मोतीबिंदू असणाऱ्या नागरिकांना आम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. त्यांना तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवले जाते. त्यांचा राहण्याचा खाण्याचा आणि औषधांचा संपूर्ण खर्च मी स्वतः करतो. मोतिबिंदूची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर जेव्हा त्यांच्या डोळ्याची पट्टी उघडते तेव्हा त्यांना दृष्टी येते. त्यावेळी ते लोक या सुंदर जगाला बघतात. डोळ्यात आनंदाश्रू घेऊन मला मिठी मारतात, मला प्रेम करतात. या गोष्टींमुळेच मला सतत समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळते.”
मोतीबिंदूबाबत जागरूकता पसरवणे आवश्यक
सध्या जगभरातील २.५ अब्ज लोक दृष्टीदोषाने त्रस्त आहेत. त्यापैकी १.१ अब्ज लोकांपर्यंत अद्यापही चष्मा पोहोचू शकलेला नाही. चष्याची किंमत जास्त असल्यामुळे गोरगरीबांवर चष्याअभावी अंधारात चाचपडण्याची वेळ येते. भारतात दरवर्षी २० लाखांहून अधिक मोतीबिंदूचे रुग्ण आढळतात. यामधील ६३ टक्के रुग्णांना उपचाराअभावी अंधत्व येतं. एकूण दृष्टिदोषांपैकी ८० टक्के प्रकरणं मोतीबिंदूमुळे होतात.
याविषयी साकिब म्हणतात, “मोतीबिंदू हा साधा आजार आहे. पण मोतीबिंदूसारख्या साध्या आजाराकडे दुर्लक्ष केलं, तर त्याचे परिणाम गंभीर होतात. ग्रामीण भागात जागरूकतेचा अभाव आणि आर्थिक अडचणी यामुळे अनेकजण उपचार घेत नाहीत. मोतीबिंदूबाबत जागरूकता पसरवणे आवश्यक आहे. गावांमध्ये जाऊन लोकांशी बोलणे आणि त्यांना समजावणे महत्वाचं आहे. पण हे काम मुळीच सोपं नाही. गावातील विशेषतः कमी शिकलेले लोक अनेकदा आम्हाला दारातच नाकारतात. आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत नाही. पण लोकांना समजावणं हे आमचं काम आहे आणि आमची संस्था ते काम प्रामाणिकपणे करते.”
काठमांडूतील जागतिक परिषदेत साकीब यांचीच चर्चा
२०१६ मध्ये मुरबाडमध्ये आयोजित नेत्र तपासणी शिबिरास त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी साकीब यांच्या कामाचे कौतुक केले होते. नुकतेच जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक अंधत्व निवारण संस्थेच्या माध्यमातून नेपाळमधील काठमांडू येथे तीन दिवसीय शिखर परिषदे आयोजित करण्यात आली होती. साकीब यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना जागतिक परिषदेसाठी विशेष आमंत्रित केले होते. या परिषदेत साकीब यांनी अवघ्या ३३ रूपयांमध्ये बनवलेल्या 'देवाभाऊ' चष्म्याला सर्वात स्वस्त चष्म्याची मान्यता मिळाली.
याविषयी ते म्हणतात, “काठमांडू येथे झालेल्या जागतिक शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे. या परिषदेसाठी १४० देशांतील ७०० प्रतिनिधी आले होते. या ठिकाणी मी जगातील सर्वात स्वस्त चष्मा सर्वांसमोर ठेवला. त्याची किंमत अवघी ३३ रुपये आहे. यामुळे जागतिक शिखर परिषदेत मला ‘सिस्टम लीडर अवार्ड’ देण्यात आला. हा पुरस्कार जगभरातील १४० देशांच्या प्रतिनिधींपैकी एकाला देण्यात येतो.”
बदलापूरमध्ये होणार सोशल सेंटर…
दृष्टीहीनांसाठीचं काम पूर्ण झाल्याचं साकीब मानत नाही. आजही ते तेवढ्याच तळमळीने दृष्टीहीनांसाठी काम करतात. संस्थेच्या भविष्यातील योजनांविषयी ते म्हणतात, “मी साधा माणूस आहे. मला ना आमदार व्हायचं ना मोठ्या संस्था काढायच्या आहेत. मला फक्त देशातील दृष्टीहीन लोकांना अंधारातून मुक्त करायचं आहे. बदलापूरमध्ये सोशल सेंटर उभारून लोकांची सेवा करायची आहे. या सोशल सेंटरमध्ये पोस्टरच्या माध्यमातून डोळ्यांसंदर्भातली सगळी माहिती देण्यात येईल. तसेच आमचा कॉल सेंटर शासनाच्या अंधत्व निवारण केंद्राला जोडण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून देशातील कोणताही व्यक्ति आम्हाला कॉल करून मोतीबिंदूवर मोफत शस्त्रक्रिया करून घेऊ शकतो.”
पुढे ते म्हणतात, “देशातील ४० टक्के लोकांना चष्म्याची गरज आहे. पण सध्या चष्म्याच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील अशा नाहीत. आमच्या व्हीजन फ्रेंड आयवेअरचे बदलापूरमध्ये पाच शॉप आहेत. या शॉप मध्ये आम्ही नऊ रुपयाला चष्मा देतो. भविष्यात मला चष्म्याच्या किमती कमी करायच्या आहेत. त्यासाठी मला व्यवसायिक दृष्ट्या सक्षम व्हावे लागले.”
साकीब गोरे यांच्या कामाची व्याप्ती मोठी आहे. त्यांनी तयार केलेल्या देवाभाऊ चष्म्याला जगातील विविध देशांकडून मोठी मागणी आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, श्रीलंका, ब्राझील, कॅनडा, साऊथ आफ्रिका, नेपाळ, भूतान यांसारख्या मोठ्या देशांचा समावेश आहे. साकीब यांच्याकडून खरेदी केलेल्या चष्म्यातील नफा हा त्यांच्या ‘व्हिजन फ्रेंड्स साकिब गोरे’ या संस्थेत जातो आणि या प्रॉफिट मधून गोरगरिबांना मोफत चष्मे वाटप केले जाते.
जागतिक पातळीवर भारताच्या दृष्टिदोष आणि अंधत्वाविरुद्धची लढाईचे कौतुक केलं जातं. यात साकिब यांच्यासारख्या व्यक्तींच्या निस्वार्थ सेवेचं योगदान आहे. साकिब गोरे यांचं काम केवळ दृष्टीहीनांपुरतं मर्यादित नाही, तर ते लाखो लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण बनलं आहे. त्यांचा तीन दशकांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.