अजमल फाउंडेशनच्या प्रयत्नातून आकाराला आलंय 'पूर्वेकडील कोटा'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 8 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

- इम्तियाज अहमद आणि आरिफुल इस्लाम
 
मध्य आसाममधील नागाव आणि दिमा हासाओ मैदानी प्रदेशात परफ्युमचे शहर म्हणून ख्याती असलेले होजाई हे एक शहर आहे. एकेकाळी हे शहर अगरवुडचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाई. तर ईशान्य भारताचे शैक्षणिक केंद्र म्हणून पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन्ही राज्यांच्या राजधान्याकडे पाहिले जात असे.  

मात्र आज काही वेगळेच चित्र पाहायला मिळतेय. नीट, जेईई, सीईई आणि नागरी सेवा परीक्षांसाठी तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा हा होजाईकडे वळला. एकेकाळचे व्यापारी केंद्र आता पूर्व भारतातील कोटा म्हणून नावलौकिक मिळवत आहे. केवळ आसाममधीलच नव्हे तर पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येतील इतर राज्यांतील गुणवंत विद्यार्थी होजई येथे येऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. आवाज - द व्हॉईस या  माध्यमाच्या समूहाने होजईला भेट दिल्यानंतर त्याने एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली- गुवाहाटी किंवा कोलकाताहून येणारा प्रत्येक दुसरा मुलगा एका आशेने या शहरात आला.याचे सर्व श्रेय अजमल फौंडेशनला जाते.
  
अजमल फौंडेशन ही एक या सेवाभावी संस्था आहे. ही संस्था आसाममधील परफ्यूम बॅरन कुटुंबाद्वारे चालवली जाते. यात धुबरीचे लोकसभेचे खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल आणि आसाम विधानसभेतील जमुनामुखचे आमदार असलेले त्यांचे बंधू सिराजुद्दीन अजमल याचा समावेश आहे. दिमासा राज्यकर्त्यांनी या जागेला होजाई असे नाव दिले. दिमासा भाषेत होजाईचा अर्थ ‘पुजारी’ असा होतो. खऱ्या अर्थाने अजमल फाऊंडेशन आता पुजारी घडवत आहेत. हे पुजारी धर्माचे नसून, विज्ञान आणि आधुनिक शिक्षणाचे आहेत.

होजई येथील अजमल फाऊंडेशनच्या या शैक्षणिक साम्राज्यात फक्त कनिष्ठ महाविद्यालय आणि कोचिंग नाही तर एकूण ४० शैक्षणिक संस्था आहेत. यात संपूर्ण होजई जिल्ह्यातील अजमल निवासी शाळा, मरियम अजमल विज्ञान आणि तंत्रज्ञान वुमेन्स कॉलेज, नजीर अजमल कॉलेज ऑफ एज्युकेशन, अजमल लॉ कॉलेज, अजमल आयएएस अकादमी आणि इतर अशा अनेक संस्थाचा समावेश होतो. या सर्व निवासी संस्था आहेत, ज्या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरणात शिक्षण देतात. 

याची सुरुवात झाली ती अजमल कुटुंबाने २०००च्या सुरुवातीला उभारलेल्या मरकझुल मारीफ स्कूल आणि अजमल हॉस्पिटलने. त्यानंतर २००५ मध्ये वंचितांच्या शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी अजमल फाउंडेशनची स्थापना केली. फाऊंडेशनचा पहिला उपक्रम वंचित महिलांसाठी महाविद्यालय सुरू करणे हाच होता.

याबद्दल अजमल फाऊंडेशनचे संचालक डॉ खसरुल इस्लाम यांनी आवाजशी बोलत असताना या संस्थेचा आजपर्यंतचा प्रवास सांगितला. “मौलाना बदरुद्दीन अजमल हे २००५ मध्ये अजमल फाऊंडेशनमध्ये भाग झाले त्यावेळी त्यांना होजईला शैक्षणिक केंद्र (एज्युकेशन हब) म्हणून पाहायचे आहे. त्यावेळी फक्त मरकझुल मारीफ शाळा एवढचं काय ते हातात होतं त्यापलीकडे जाऊन हे स्वप्न पूर्ण करणे हे आमच्या कल्पनेच्याही पलीकडे होते. अशा परिस्थितीत ज्या महिला उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी मरियम अजमल महिला विज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली. इथूनच या कामाचा प्रवास सुरु झाला. यात बदरुद्दीन यांच्या अप्रतिम दूरदृष्टीचे कौतुक करायलाच हवे. अवघ्या एका दशकात होजाई हे केवळ आसामचेच नव्हे तर देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे केंद्र बनले आहे. यातूनच आम्हाला काम करण्याचा आनंद मिळतो आणि उत्साह ही. मरियम अजमल महिला विद्यापीठ आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी अजमल विद्यापीठ स्थापन करणे हे आमचे पुढील उद्दिष्ट आहे."

स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर प्रत्येक वेळी अजमल फाऊंडेशनला यश साजरं करण्याची संधी मिळते. या यशोगाथेमागचं रहस्य म्हणजे येथील सर्व शैक्षणिक संस्थेच्या आवारात मोबाईल फोनच्या वापरावर पूर्णपणे बंदी आहे. अडीअडचणीचे प्रसंग सोडल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी आठवड्यातून फक्त दोनदाच फोनवर बोलण्याची परवानगी आहे. बाकी वेळेस सर्वत्र शैक्षणिक वातावरण आहे.

“आम्हाला निकाल मिळतो कारण आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये असे शैक्षणिक वातावरण निर्माण केले आहे. पूर्व भारतातील विविध भागांतील विद्यार्थी आपल्या शैक्षणिक करिअरला आकार देण्यासाठी येथे येतात. गेल्या वर्षी आम्हाला २१००० उमेदवारांकडून अर्ज आले होते. आमच्या मर्यादित पायाभूत सुविधांची मर्यादा लक्षात घेता त्यातील फक्त १५०० जणांना आम्ही घेऊ शकलो. अजमल सुपर ४० या संरचनेत आता आठवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि सुमारे ३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.” असेही त्यांनी पुढे सांगितले.

"आमच्या कॅम्पसला पूर्णपणे शैक्षणिक बनवणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक महत्वाचा घटक म्हणजे सर्व विद्यार्थी  हे निवासी आहेत. कोणत्याही प्रकारचा अडथळा नसतो त्यामुळे संपूर्ण शांत वातावरण असते. कॅम्पसमध्ये मोबाईल फोनसारख्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांना परवानगी देत नाही. दिवसा विद्यार्थीना शाळा असते  आणि संध्याकाळी ते स्वयं-अभ्यास करतात. यावर आम्ही देखरेख करतो. त्यामुळे प्रत्येकाला अभ्यास करणे भाग आहे,” अशी माहिती अजमल सुपर ४० चे प्रमुख अब्दुल कादिर यांनी आवाज – द व्हॉईसला सांगितले.

अजमल सुपर ४० हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ४० गुणवंत विद्यार्थ्यांसाठी २०१६ मध्ये कोचिंग सेंटर सुरु केले. यांत इयत्ता अकरावी आणि बारावीतील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या मुलांना शिकवले जाते. सुरु केल्याच्या पहिल्याच वर्षी आमच्या कोचिंगचा विद्यार्थी अमरसिंग थापा हा आसाममधील उच्च माध्यमिक विज्ञान परीक्षेत अव्वल आला. त्यामुळे संस्थेला राज्यातील तसेच प्रदेशातील शैक्षणिक वर्तुळात झटपट लोकप्रियता मिळाली. त्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी वेगाने वाढली. त्यामुळे अजमल फाऊंडेशनला आता ४० मुले आणि ४० मुलीं अशी त्यांची मर्यादा वाढवावी लागली. ज्यामुळे संस्थेच्या आर्थिक लेखाजोखीवर प्रचंड दबाव वाढला. संस्था सतत यशाची खान खणून त्यातून हे रत्न बाहेर काढत आहे.
 
यावेळी होजाई जिल्ह्यातील डोबोकाचे विजय सिंघा या विद्यार्थ्याने या कोचिंगची खासियत सांगितली. तो म्हणतो  “मी इतर कोणत्याही महाविद्यालयापेक्षा अजमल सुपर ४० निवडले आहे, कारण विद्यार्थी जीवनातील शिस्त ही यशाची गुरुकिल्ली आहे. इथ आम्हाला केवळ उच्च विभूषित पात्र असणारे आणि सक्षम शिक्षकच शिकवत नाहीत, तर आमच्या स्वयं-अभ्यासाचेही सतत निरीक्षण केले जाते’”

कार्बी आंग्लॉन्गमधील डेव्हिड म्हणतो की, “अजमल सुपर ४० ही अशी जागा आहे जिथे अभ्यासासाठी खूप प्रेरणा मिळते. येथील अभ्यास साहित्य आणि सराव चाचण्या खूप उपयुक्त आहेत.” संस्थेच्या इतर सर्व विद्यार्थ्यांप्रमाणे त्याचे लक्ष NEET ७२० गुण मिळवण्यावर आहे. 

“दहावी ते अकरावी आणि बारावीच्या संक्रमणामध्ये खूप अंतर आहे. पण अजमल सुपर ४० येथील शिक्षक अत्यंत सक्षम आहेत, ते हे अंतर इतक्या सहजतेने भरून काढतात. त्यामुळे नवीन अभ्यासक्रमाशी जुळवून घेताना विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे ३-४ महिने वाया जात नाहीत,” नागाव जिल्ह्यातील जुरिया येथील रिझवान अहमदने आवाजला सांगितले.

कोट्यामध्ये विद्यार्थी प्रचंड दबावात वावरत असतात, त्यातूनच काहीतरी चुकीचं करण्याची वृत्ती बळावते. मात्र  अजमल सुपर ४० विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशकांची ही नेमणूक केलेली आहे.
 
लेखक : इम्तियाज अहमद आणि आरिफुल इस्लाम
(अनुवाद: पूजा नायक)