नवी दिल्ली
पेपरफुटीच्या आरोपानंतर रद्द करण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेसाठी रविवारी पुन्हा एकदा २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने देशभरातील ५,४४० आणि परदेशातील १४ केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली होती. ही महाकाय प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणेने एकत्र येऊन काम केल्याचे एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी सांगितले.
या परीक्षेसाठी केवळ ३७ दिवसांत सर्व व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये पोलीस पथके, निरीक्षक आणि परीक्षा कर्मचारी अशा सुमारे ७ लाख अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी आधार-आधारित बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन, सीसीटीव्ही पाळत, जॅमर्स आणि दोन स्तरांवर तपासणी अशा कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दिल्लीतील एनटीए आणि शिक्षण मंत्रालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत सीसीटीव्ही देखरेखीसाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते.
परीक्षेदरम्यान काही ठिकाणी किरकोळ प्रकार घडले. काही केंद्रांवर चुकीचे किंवा बनावट प्रवेशपत्र घेऊन येणारे विद्यार्थी आढळले, तर काही ठिकाणी ओळख चोरण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, सीसीटीव्ही आणि मेटल डिटेक्टर्समुळे अशा प्रकारांवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, अजमेरमधील एका केंद्रावर बुरखा परिधान केल्यामुळे प्रवेश नाकारल्याचा आरोप एका विद्यार्थिनीने केला होता, मात्र नंतर एनटीएने स्पष्ट केले की तिला प्रवेश देण्यात आला होता. तसेच, अहमदाबादमधील काही केंद्रांवर धार्मिक चिन्हांवरून झालेला वादही पोलिसांनी मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देऊन शांत केला.
परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यावेळच्या व्यवस्था मागील परीक्षेपेक्षा अधिक चांगल्या होत्या, असे मत व्यक्त केले. काही विद्यार्थी उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या. मात्र, कोलकातामध्ये अपघातात जखमी झालेल्या एका विद्यार्थिनीसाठी विशेष वैद्यकीय सुविधा आणि रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली होती. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने बसची विशेष सोय केली होती. नवी दिल्लीतही परीक्षार्थींना त्रास होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रवासात आवश्यक ते बदल केले होते. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे.