डॉ. राम ताकवले एक द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 10 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

- डॉ. पंडित विद्यासागर 

डॉ. राम ताकवले यांनी दिलेल्या योगदानामुळेच आजच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रशासकीय आणि शैक्षणिक घडी नीट बसली. त्यांच्या पायाभूत कार्यामुळेच विद्यापीठाची पुढे प्रगती झाली.

 

त्यांना आम्ही ‘ताकवले सर’ म्हणत असू, त्यांची भेट होऊन आज पन्नास वर्षे झाली. त्या वेळच्या पुणे विद्यापीठात एम.एस्सीला प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे विभागप्रमुखपदाची जबाबदारी होती.

 

भौतिकशास्त्र विभागात पुण्याबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना धीर देणारे ते दुर्मिळ व्यक्तिमत्त्व! आपुलकीचा जुळलेला हा धागा शेवटपर्यंत तसाच राहिला. माझी गरज ओळखून शिकवणी मिळवून देणारे हे शिक्षक.

 

ताकवले सर घरी बोलवून आदरातिथ्य करीत. जे त्या काळी खूप दुर्मिळ होते. त्यानंतर चारच वर्षांत सर कुलगुरू झाले. तरुण वयात मिळालेले ते पद त्यांनी अतिशय जबाबदारीने सांभाळले. कुलगुरूपद दोनदा मिळूनही ताकवले सरांचे व्यक्तिमत्त्व तसेच राहिले, साधे, सरळ आणि आश्वासक! कुलगुरूपदावरून पायउतार झाल्यावर त्यांचा वावर अतिशय सहज होता.

 

त्याचवेळी त्यांना नाशिक येथे होणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’च्या स्थापनेची जबाबदारी देण्यात आली. विद्यापीठाची औपचारिक स्थापना होण्यापूर्वी त्यांचे कार्यालय मुंबई येथे होते. त्यांची भेट ‘डेक्कन क्वीन’च्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यात झाली. नेहमीप्रमाणे त्यांनी आपुलकीने चौकशी केली.

 

रेल्वेत पहिल्या वर्गाने प्रवास का करत नाही?, असे विचारल्यावर त्यांनी ते हसण्यावारी नेले. बराच वेळ गप्पा झाल्यानंतर ते म्हणाले, ‘‘अरे, प्रशासकीय परवानगी घेण्यापेक्षा मी दुसऱ्या वर्गाने प्रवास करणे पसंत करतो.’’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता. तो त्यांनी आयुष्यभर जपला.

 

हरगुडसारख्या खेड्यातून आलेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणाऱ्या या लोकशिक्षकाने शिक्षण क्षेत्रात भरभरून योगदान दिले. पुणे विद्यापीठापासून सुरू झालेला हा प्रवास ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’पासून ते दिल्लीतील ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’पर्यंत पोचला. या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी समरस होऊन काम केले.

 

कार्यभाग संपल्यावर ‘इदं न मम्’ या वृत्तीने ते तटस्थ राहिले. शिक्षण क्षेत्रात अनेकांचे ते मार्गदर्शक होते. त्यांच्या पावलावर अनेकांनी पाऊल टाकून वाटचाल केली. अनेक संस्थांच्या उभारणीत त्यांचा वाटा होता.

 

एम.के.सी.एल., बहाई अकॅडमी, भारतीय शिक्षणसंस्था, हरगुड येथील माध्यामिक शाळा ही त्यातील काही उदाहरणे. तरीही त्याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात कधीही नसे. चेहऱ्यावरील मुक्त हास्य हाच त्यांचा एकमेव प्रतिसाद होता.

 

डॉ. राम ताकवले यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या प्रचंड आणि बहुमोल योगदानाचे मूल्यमापन अद्याप नीटपणे झालेले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र आणि देश पातळीवर उच्च शिक्षणाला त्यांनी नवी दिशा दिली. त्यांचा जनमानसातील वावर हा सहज होता. आपल्या मोठेपणाचा वारा त्यांनी इतरांना जाणवू दिला नाही.

 

त्यामुळे ते घडले असावे. त्यांना नावीन्याचा ध्यास होता. आंतरजालाचा वापर करून त्यांनी नवीन अभ्यासक्रम तयार करून राबविले. निस्पृहता, सचोटी आणि सामाजिक दायित्व त्यांनी शेवटपर्यंत जपले. या प्रवासात त्यांना त्यांच्या धर्मपत्नीने मोलाची साथ दिली. ताकवले सरांनी स्वतःच्या शिक्षणसंस्था काढल्या नसल्या तरी खऱ्या अर्थाने ‘शिक्षणमहर्षी’ म्हणता येईल, असे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा या आदर्श व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.

(सौजन्य: दै. सकाळ)