राज्य सरकार आणि खान अॅकॅडमी इंडिया यांच्यामध्ये करार झाला. याप्रंसगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह अॅकॅडमीचे अधिकारी उपस्थित होते
मुलांना शिक्षणाची समान संधी मिळावी, या ध्येयाने राज्य सरकार आणि खान अॅकॅडमी इंडिया यांच्यामध्ये पाच वर्षांसाठी करार झाला आहे. त्याद्वारे राज्यातील सरकारी शाळांमधील मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित, चांगल्या दर्जाचे डिजिटल शिक्षण साहित्य मोफत मिळणार आहे.
या कराराप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते. तंत्रज्ञानाच्या मदतीसह सरकारी शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत खान अॅकॅडमीचे डिजिटल साहित्य राज्यातील ६२ हजारांहून अधिक सरकारी शाळांमध्ये वापरले जाणार आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार हजार १६४ शाळांचा समावेश आहे.
फडणवीस म्हणाले, "या भागीदारीमुळे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी शिक्षण जास्त सोपे होईल. मुलांची उत्सुकता वाढेल, त्यांचा अभ्यासाचा पाया पक्का होऊन प्रत्येक मुलाला आपली पूर्ण क्षमता वापरता येईल."
अॅकॅडमीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती वासुदेवन म्हणाल्या, "महाराष्ट्रामध्ये आमची सुरुवात ४८८ शाळांपासून झाली होती आणि आता आम्ही संपूर्ण राज्यात पोहोचायला तयार आहोत. शिक्षणामुळे फक्त एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण समाजाचा विकास होतो. कुठल्याही घरातून आलेल्या प्रत्येक मुलाला जगातलं सर्वोत्तम शिक्षण मिळेल आणि तो यशस्वी होईल, हे पाहून खूप आनंद आणि अभिमान वाटतो."
खान अॅकॅडमी विषयी...
२००६ साली सलमान खान नावाच्या एका व्यावसायिकाने विद्यार्थ्यांना गणिताच्या काही संकल्पना समजावण्यासाठी एक व्हिडीओ तयार केला. त्याने तो यूट्यूब वर टाकला आणि आश्चर्य म्हणजे तो व्हिडीओ अनेक जणांनी पाहिला. त्याला फार चांगला प्रतिसादही मिळाला. इथूनच ‘खान अॅकॅडमी’ची संकल्पना पुढे आली. त्याने व्हिडीओजच्या माध्यमातून शिक्षण देण्याची आणि तेही विनामूल्य ही संकल्पना पहिल्यांदा अस्तित्वात आली.
खान अॅकॅडमी हे एक शैक्षणिक साहित्य पुरवणारे संकेतस्थळ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संकेतस्थळावरील साहित्य सर्वांसाठी अगदी विनामूल्य उपलब्ध आहे. इथे गणितापासून जीवशास्त्रापर्यंत आणि भूगोलापासून ते इतिहासापर्यंत सर्व विषयांवर व्हिडीओज् आहेत. जगभरात ३६ भाषांत त्यातील मजकुराचे भाषांतर केले जात आहे. साइटवर १३ लाखांपेक्षा जास्त नोंदणी असलेले शिक्षक आहेत.