मोहाली
हिंदूंनी मस्जिद आणि कब्रास्तानासाठी जमीन दान केल्याच्या हृदयस्पर्शी बातम्या ताज्या असतानाच, पंजाबमधून धार्मिक सलोख्याचे आणखी एक सुंदर उदाहरण समोर आले आहे. यावेळी एका मुस्लिम कुटुंबाने पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील झमपूर गावात मंदिर उभारणीसाठी ३२५ चौरस वार आकाराचा भूखंड दान केला असून, त्याची किंमत तब्बल ८० लाख रुपये आहे.
गावात मंदिरासाठी जागा उपलब्ध नसल्याची खंत हिंदू बांधवांनी व्यक्त केली होती, ज्याची या मुस्लिम कुटुंबाने तातडीने दखल घेतली.
जमीन दान करणारे मोहम्मद इमरान उर्फ 'हॅपी मलिक' यांनी केवळ जागाच दिली नाही, तर मंदिराच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च उचलण्याचाही निर्णय घेतला आहे. गुरुवारी एका कार्यक्रमात पंजाबचे शाही इमाम मौलाना मोहम्मद उस्मान रहमान लुधियानवी यांच्या उपस्थितीत, इमरान यांनी जमिनीची कागदपत्रे औपचारिकरीत्या मंदिर समितीचे सदस्य राजाराम यांच्याकडे सुपूर्द केली.
शाही इमाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, झमपूर गावाची लोकसंख्या वाढल्यामुळे मोकळी जागा शिल्लक राहिली नव्हती, त्यामुळे मंदिरासाठी जमीन उपलब्ध होत नव्हती. सनातन मंदिराच्या उभारणीसाठी एका भूखंडाची गरज होती. ही गरज ओळखून पंडित राजाराम यांनी इमरान यांच्याकडे मंदिरासाठी जमिनीची मागणी केली होती.
उपस्थितांना संबोधित करताना मौलाना लुधियानवी म्हणाले, "आमचा भाऊ इमरान खान हॅपी याने मला सांगितले की, मंदिर बांधण्यासाठी जमिनीचा तुकडा हवा आहे आणि माझ्याकडे जमीन आहे, तर मी ती दान करू शकतो का? त्यावर मी त्याला सांगितले की, आपण नक्कीच जमीन देऊ शकतो. जर आपण आपल्या हिंदू बांधवांचे काही भले करू शकलो, तर यापेक्षा मोठा आनंद दुसरा असूच शकत नाही."
राजाराम यांनी हा क्षण समाजासाठी अत्यंत आनंदाचा असल्याचे सांगत, इमरान आणि शाही इमाम यांच्यामुळेच आमचे स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना व्यक्त केली.
राजाराम म्हणाले, "मी इमाम साहेब, भाऊ हॅपी मलिक (इमरान) आणि इतरांचा मनापासून आभारी आहे. त्यांनी आमची मागणी पूर्ण केली आहे. मी झमपूर गावातील रहिवाशांचेही आभार मानू इच्छितो, जे अशा कार्यात नेहमी सहभागी होतात आणि प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात."
ते पुढे म्हणाले, "मी नेहमी सांगतो की आमच्यापैकी कोणीही हिंदू, मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन नाही. आम्ही सर्वजण भाऊ आहोत. मी येथे गेल्या चार वर्षांपासून राहत आहे, पण या गावात कधीही कोणीही स्वतःला हिंदू, मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन म्हणून ओळख करून दिली नाही. आम्ही सर्वजण एकमेकांना भाऊ मानतो. म्हणूनच आज आपण एकाच मंचावर उभे आहोत. त्यांच्या शरीरात वाहणारे रक्तच माझ्या आणि तुमच्या शरीरातही वाहत आहे."
एका मंदिर पदाधिकाऱ्याने सांगितले की, लोक त्यांच्या घरात आणि श्रद्धेनुसार स्वतःला हिंदू किंवा मुस्लिम समजत असतील, पण जेव्हा ते एकत्र उभे राहतात, तेव्हा ते सर्वात आधी एक माणूस असतात.
राजाराम म्हणाले, "मंदिरासाठी जमीन दान करणे कोणालाही शक्य झाले नाही — ना मला, ना आमच्या इतर हिंदू बांधवांना. हे काम हॅपी मलिक यांनी करून दाखवले आणि जमीन दान केली. जिथे हॅपी मलिक आहेत, तिथे संपूर्ण झमपूर गाव त्यांच्यासोबत उभे आहे. जोपर्यंत हॅपी मलिक इथे आहेत, आम्ही त्यांच्या सुख-दुःखात नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहू, आणि ते देखील आमच्या सोबत आहेत."
मस्जिद, चर्च आणि आता भव्य मंदिरमोहम्मद इमरान यांनी सांगितले की, अडचणीत असलेल्या लोकांच्या मदतीला धावून जावे, या विचारानेच ते लहानपणापासून जगत आले आहेत. "गरिबांना उपचार मिळावेत यासाठी एक रुग्णालय सुरू करणे हे माझे ध्येय आहे. जेव्हा मी एक मस्जिद बांधली, तेव्हा मला वाटले की लोकांमध्ये असा संदेश जाऊ नये की मी मुस्लिम आहे म्हणून मी केवळ मस्जिद बांधली. म्हणून त्यानंतर मी एक चर्च बांधले आणि आता आम्ही मंदिर बांधणार आहोत. हे मंदिर देखील आधी बांधलेल्या मंदिरांप्रमाणेच भव्य असेल."
मोहम्मद इमरान यांनी सांगितले की, जमीन दान करण्यासोबतच त्यांनी मंदिराच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च उचलण्याचाही निर्णय घेतला आहे.
या कार्यात त्यांचे मित्र संजय जिंदाल हे देखील त्यांना सहकार्य करणार आहेत. तीन मरला (जमिनीचे एक माप) जागेवर हनुमानजींचे मंदिर आणि दहा मरला जागेवर सनातन धर्म मंदिर बांधण्यात येणार आहे.
१२ फेब्रुवारी रोजी शाही इमाम यांच्या उपस्थितीत जमिनीच्या नोंदणीची (Registry) कागदपत्रे मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आली. हवन-यज्ञानंतर बांधकामाचे नियमित काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत हनुमानजी मंदिर आणि सनातन धर्म मंदिराची उभारणी केली जाईल.
३७ वर्षीय हॅपी मलिक हे रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. ते आपली आई, पत्नी आणि मुलांसोबत राहतात, तसेच त्यांच्या दिवंगत भावाची मुलेही त्यांच्यासोबतच राहतात.
मंदिर समितीचे सदस्य पंडित राजाराम यांनी सांगितले की, जमिनीचा एवढा मोठा तुकडा दान करणे सोपे काम नाही आणि ही गोष्ट मोहम्मद इमरान यांच्या चांगल्या हेतूची साक्ष देते. सनातन धर्म सभेच्या वतीने पंडित राजाराम, अध्यक्ष हरप्रीत सिंग गिल आणि रुबी सिद्धू यांनी शाही इमाम आणि मोहम्मद इमरान 'हॅपी' यांचा सन्मान केला.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -