मुंब्रा-कौसा या मुस्लिम बहुल भागात उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या मोठी असल्याने, येथील विद्यार्थ्यांना अनेकदा मराठी भाषेची अडचण जाणवते. मुस्लिम समुदायाला मराठी बोलता येत नाही किंवा ते ही भाषा आत्मसात करत नाहीत, असा एक चुकीचा समज समाजात पसरलेला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नवनिर्वाचित नगरसेविका मर्झिया शानू पठाण यांनी उचललेले पाऊल या सर्व गैरसमजांना चपराक देणारे ठरले आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि ती सर्वांना आलीच पाहिजे, असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी उर्दू भाषिक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचे विशेष शिबीर राबवले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मराठी विषयातील अडचण दूर करणे आणि विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रोत्साहित करणे हा होता. या शिबिराला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मुलांना सोप्या भाषेत मराठी व्याकरण आणि लेखन कौशल्याचे धडे याठिकाणी देण्यात आले.
या उपक्रमाबद्दल बोलताना नगरसेविका मर्झिया शानू पठाण म्हणाल्या की, "पहिल्यापासूनच शिक्षण क्षेत्रात काम करण्यावर आम्ही अधिक भर देत आहोत. गेल्या वर्षीही बोर्डाच्या परीक्षेपूर्वी विज्ञान, गणित आणि मराठी विषयांसाठी एक सत्र आयोजित केले होते. परंतु गेल्या वेळचे नियोजन खूप घाईघाईत झाले. यावर्षी मात्र आम्ही पूर्ण तयारीने हे शिबीर आयोजित केले आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे. राज्याची भाषा सर्वांनाच आली पाहिजे आणि त्यात मुंब्राच्या विद्यार्थ्यांनीही मागे राहू नये."
शिबिराला भरभरून प्रतिसाद
शिबिरातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर मर्झिया म्हणाल्या, “मुंब्रा-कौसा भागातील आपल्या मुलांची मराठी थोडीशी कच्ची आहे, त्यामुळे त्यांना या विषयाबाबत थोडी अडचण येते. मला असं वाटलं होतं की या शिबिराला फक्त २००-५०० विद्यार्थी येतील, पण २००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिबिराला आले होते. या बिल्डींगचे तिन्ही मजले पूर्ण भरले होते. ज्या मुलांनी नोंदणी केली नव्हती, त्यांनाही आम्ही प्रवेश दिला आहे कारण त्यांना शिकायची इच्छा आहे. मुलांचा उत्साह पाहून गरज पडल्यास आम्ही असे दुसरे सत्रही आयोजित करू.”
त्या पुढे म्हणतात की, “शिबिराला केवळ मुंब्रा-कौसाच नव्हे, तर कुर्ला, डोंबिवली आणि इतर भागांतूनही विद्यार्थी आले होते. यामध्ये मराठी भाषिक विद्यार्थ्यांचाही समावेश होता. मुलांचा पहिलाच पेपर मराठीचा असतो आणि त्यामुळे मुलं खूप घाबरलेली असतात. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठीही आम्ही प्रयत्न केले.अलहम्दुलिल्लाह, आमचे व्हिजन यशस्वी ठरले. ”
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि बक्षिसे
या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून यश संपादन करावे यासाठी मर्झिया यांनी काही घोषणा देखील केल्या. त्या म्हणाल्या की, “जी मुले दहावीत चांगले मार्क मिळवतील आणि ज्यांची टक्केवारी चांगली येईल, त्यांना एमएसपी केअर फाउंडेशन तर्फे सन्मानित केलं जाईल. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांना प्रसिद्धी दिली जाईल, काही भेटवस्तू दिल्या जातील आणि त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. यामुळे मुलांचे मनोबल वाढण्यास मदत होईल.”
त्या पुढे म्हणतात की, “आत्ता प्री-एक्झामचा काळ संपला आहे आणि थेट परीक्षा होणार आहे, त्यामुळेच आम्ही हे मराठीचे सत्र आयोजित केले. परीक्षा संपल्यानंतर आम्ही करिअर मार्गदर्शनाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. दरवर्षी माझा करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम असतोच, पण यावेळी आम्ही तो अधिक सविस्तरपणे करू त्यामुळे मुलांना पुढील करिअरसाठी मार्गदर्शन होईल.”
कॉपीमुक्त परीक्षेचा मंत्र
या शिबिरात मर्झिया यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्लाही दिला. त्या म्हणाल्या की, “मुलांना मी फक्त एकच सांगितलं की, तुम्ही १२ वी फेल हा चित्रपट पाहा. त्यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की चोरी करायची नाही. कॉपी करून तुम्ही आत्ता पास व्हालही, पण दीर्घकाळात त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि भरघोस यश मिळवा.”
भविष्यातील शैक्षणिक संकल्प
मर्झिया यांचे एमएसपी केअर फाउंडेशन शहरातील अनेक सामाजिक प्रश्नांवर काम करत आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “शिक्षणावर काम करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. निवडणूक जिंकल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील हा आमचा पहिलाच कार्यक्रम झाला. येणाऱ्या काळात एमएसपी केअर फाउंडेशन आणि नगरसेविका मरझिया शानू पठाण यांचे संपूर्ण पॅनेल शिक्षणासाठी काम करताना दिसेल, हा माझा शब्द आहे.”
त्या पुढे म्हणतात की, “आता मी नगरसेविका असल्याने मला शिक्षणाच्या बाबतीत हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार आहे. शाळांमध्ये अभ्यास व्यवस्थित होतोय की नाही, हे पाहण्यासाठी मी स्वतः तिथे भेटी देणार आहे. तसेच प्रभागातील अनेक महत्वाच्या प्रश्नांवर मी काम करणार आहे.”