सॅम्पी चक्रवर्ती पुरकायस्थ
कोलकात्याच्या गजबजलेल्या रस्त्यांवर आजकाल हिजाब परिधान केलेली एक तरुणी आत्मविश्वासाने मोटारसायकल चालवताना दिसली तर आता कोणाला आश्चर्य वाटत नाही. शहरातली माणसे आता तिला 'हिजाबी बायकर' या एकाच नावाने ओळखतात. ही तरुणी दुसरी कोणी नसून अलिमा रहमान आहे. एका सामान्य मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातील या मुलीने स्वतःचा अढळ निर्धार, चिकाटी आणि कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळे ही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अलिमाला बालपणीच मोटारसायकलवर प्रेम जडले होते. आपल्या आजोबांना दुचाकी चालवताना पाहून तिला त्याचे आकर्षण वाटू लागले. पुढे या आवडीचे रूपांतर एका ध्येयात झाले. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. एका सनातनी मुस्लिम कुटुंबात मुलीने दुचाकी चालवणे ही कल्पना नातेवाइकांना मान्य नव्हती. पडदा पाळणाऱ्या घरातील मुलगी रस्त्यावर मोटारसायकल चालवणार, ही गोष्ट पचवणे अनेकांसाठी कठीण होते.
असे असूनही अलिमाचे वडील अझीझुर रहमान तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी मुलीच्या स्वप्नांची गळचेपी करण्याऐवजी स्वतः तिचे प्रशिक्षक म्हणून पुढे येण्याचे धाडस दाखवले. अलिमा वयाच्या अवघ्या १० ते ११ वर्षांपासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी चालवायला शिकली. गिअर हाताळणे, मोकळ्या मैदानात सराव करणे अशा गोष्टींमुळे तिचा आत्मविश्वास वाढत गेला. तरीही सामाजिक विरोधाने तिची पाठ सोडली नाही.
अलिमाला स्थानिक मुलांच्या टोमण्यांना, थट्टेला आणि काहीवेळा जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ती घराबाहेर पडली की लोक तिच्यावर कमेंट्स करत असत. मात्र तिने हार मानली नाही. शांतपणे आणि संयमाने स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. दुचाकी चालवायला शिकून मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही फरक नसतो, हे सिद्ध करणे हेच तिचे एकमेव उद्दिष्ट होते.
आज वीस वर्षांची असलेली अलिमा कोलकात्यातील एक परिचित चेहरा बनली आहे. हिजाब घालून नियमितपणे दुचाकी चालवल्यामुळे तिला ही वैशिष्ट्यपूर्ण ओळख मिळाली. तिने कधीही स्वतःचा धर्म किंवा संस्कृती यांच्यापासून अंतर राखले नाही. ती घराबाहेर पडताना नेहमी हिजाब परिधान करते आणि त्या हिजाबमागे एका जिद्दी बायकरचा आत्मविश्वास दडलेला असतो. एकदा रस्त्यावर उतरल्यानंतर तिची नजर फक्त लक्ष्यावर असते, तिला कशाचेही दडपण येत नाही.
तिचे वडील अझीझुर रहमान म्हणाले की, "स्वाभाविकच मुलगी घरी येईपर्यंत मला काळजी वाटते. मी झोपू शकत नाही, घराबाहेर फेऱ्या मारत राहतो. तरीही मला तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणायची नव्हती. मुलीला चार भिंतींच्या आत बंदिस्त ठेवता कामा नये." विश्वास आणि धैर्याच्या जोरावर मुली सुद्धा स्वतःचा मार्ग शोधू शकतात, असे त्यांना वाटते.
अलिमा स्वतः तिच्या पालकांच्या भूमिकेचा वारंवार उल्लेख करते. तिच्या मते पालकांना विरोध करून आयुष्यात पुढे जाता येत नाही. "तुम्हाला त्यांना गोष्टी नीट समजावून सांगाव्या लागतात आणि परस्पर सामंजस्याने पुढे जावे लागते. प्रगतीसाठी पालकांचे आशीर्वाद अत्यंत आवश्यक आहेत," असे ती म्हणते.
दुचाकी चालवण्याबाबत अलिमाचा संदेश स्पष्ट आहे. आज अनेक मुली घराबाहेर पडत आहेत ही सकारात्मक बाब असल्याचे तिला वाटते. मात्र सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेगाने वाहन चालवणे आणि धोकादायक ओव्हरटेकिंग करणे टाळण्याचा सल्ला ती देते. केवळ मुलींनीच नाही तर मुलांनीही वाहतुकीचे नियम पाळावेत, असे अलिमा मानते.
अनेक वर्षे मोटारसायकल चालवूनही तिचा कधीही अपघात झाला नाही. नियमांचे पालन केल्यास आणि सावध राहिल्यास अपघात टाळता येतात, असे ती सांगते. रस्त्यावर असताना फक्त स्वतःच्याच नाही तर इतरांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली पाहिजे, हा संदेश तिला सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. आज हिजाबी बायकर अलिमा रहमान ही बायकर समाजासाठी एक समाजासाठी आदर्श ठरत आहे. श्रद्धा, संस्कृती आणि स्वप्ने एकत्र पुढे जाऊ शकतात, हे तिने सिद्ध केले आहे.