ओमानजवळ भारतीय जहाजावर झालेल्या हल्ल्याचा केंद्र सरकारकडून निषेध!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

ओमानच्या सागरी हद्दीत 'हाजी अली' या भारतीय मालवाहू जहाजावर (Dhow) झालेल्या हल्ल्याचा केंद्र सरकारने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ही घटना अत्यंत गंभीर आणि 'अस्वीकार्य' असल्याचे सांगत, सरकारने आपल्या खलाशांच्या सुरक्षेबाबतची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

खलाशांच्या सुरक्षेसाठी सरकार सक्रिय

परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमालियावरून यूएईमधील शारजाकडे जाणाऱ्या या भारतीय जहाजाला ओमानच्या सागरी हद्दीत लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यानंतर लागलेल्या आगीमुळे हे लाकडी जहाज बुडाले आहे. सुदैवाने, ओमान तटरक्षक दलाने जहाजावरील सर्व १४ खलाशांना सुखरूप वाचवले असून ते सध्या सुरक्षित आहेत.

भारत सरकार ओमान सरकार आणि तेथील भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात आहे. या खलाशांना लवकरच भारतात सुखरूप परत आणण्यासाठी सर्व आवश्यक कायदेशीर आणि राजनैतिक सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. पश्चिम आशियातील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत भारतीय जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सागरी यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.