मलिक असगर हाशमी
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा दौरा १५ मे २०२६ पासून सुरू झाला आहे. या दौऱ्याने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. दौऱ्याचा पहिला टप्पा संयुक्त अरब अमिराती (यूएई) हा आहे. यूएईच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रीम अल हाशिमी यांनी पंतप्रधान मोदींचं अत्यंत उत्साहात स्वागत केलं. त्यांनी मोदींना "अनमोल रत्न" म्हटलं. यानंतर सोशल मीडियावर एका वेगळ्याच युद्धाला तोंड फुटलं.
हा वाद मुत्सद्देगिरीपुरता मर्यादित राहिला नाही. त्यात वैयक्तिक हल्ले आणि अपप्रचारही सुरु झाला. आखाती देशांमध्ये सध्या इस्रायल, अमेरिका आणि इराणच्या संघर्षावरून मोठं ध्रुवीकरण होत आहे. अशा वेळी भारत आणि यूएईची मैत्री इतकी घट्ट कशी होत आहे? हीच गोष्ट भारतविरोधकांना पचनी पडत नाहीये.
रीम अल हाशिमी यांनी दोहा इथं एक महत्त्वाचं विधान केलं होतं. यूएई पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची आतुरतेने वाट पाहत आहे, असं त्या म्हणाल्या. या नात्याला त्यांनी एका दीर्घकालीन भागीदारीचं आणि सखोल मैत्रीचं प्रतीक म्हटलं. त्यांच्या मते पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारल्यापासून दोन्ही देशांच्या नेत्यांमधील भेटीगाठींचं सत्र वाढलं आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद भारतात आले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये तिथले क्राऊन प्रिन्स एआय शिखर परिषदेसाठी भारतात पोहोचले. मुत्सद्देगिरीच्या दृष्टिकोनातून हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि हरित विकास या क्षेत्रांमध्ये भारताची पकड मजबूत करणारा हा दौरा आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने या दौऱ्याला खूप महत्त्व दिलं आहे. सध्या जागतिक पुरवठा साखळी वेगाने बदलत आहे. अशा एका नाजूक वळणावर हा दौरा होत आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी इंजिनिअरिंग, फार्मा आणि डिजिटल व्यापाराची नवीन दारं खुली होतील. यूएई हा भारताचा एक प्रमुख व्यापारी भागीदार राहिला आहे. मध्य पूर्वेतील बाजारपेठांमध्ये पोहोचण्याचा तो सर्वात सोपा आणि मोठा मार्ग आहे.
या धोरणात्मक यशाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरलं चित्र मात्र चिंताजनक आहे. रीम अल हाशिमी यांचं विधान येताच भारतविरोधक आणि ट्रोलर्सची फौज सक्रिय झाली. या लोकांनी मुत्सद्देगिरीवर प्रश्नचिन्ह उभं केलं. शिवाय त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन हल्ले करण्यातही कसर सोडली नाही. काही अकाउंट्सवरून रीम अल हाशिमी यांच्या कुटुंबाला थेट बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना वादग्रस्त 'एपस्टीन फाइल्स'शी जोडण्याचे खोटे दावे करण्यात आले. हे सर्व एका पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचं स्पष्ट जाणवतं.
सोशल मीडियावरील या हल्ल्यांमध्ये भारत आणि यूएईला इस्रायलचं सहकारी ठरवलं जात आहे. यावरून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष आणि तिथल्या मृत्यूंसाठी या दोन देशांना जबाबदार धरलं जात आहे. मजहर झैदी आणि मीडिया एक्ससारख्या काही हँडल्सनी तर याला चक्क "नरसंहारात सामील असलेल्या लोकांची भेट" असं म्हटलं. काही ट्रोलर्सनी रीम अल हाशिमी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दाव्यांना कोणताही आधार नाही. तरीही सोशल मीडियावर हेच सत्य असल्यासारखं जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे.
#WATCH | Abu Dhabi, UAE: Ahead of PM Modi's visit, UAE Minister of State for International Cooperation, Reem Al Hashimy says, "We are anticipating, with great excitement, the visit of PM Modi tomorrow, May 15th 2026. He is a key figure of friendship, of a longstanding… pic.twitter.com/mBvrIUsKOw
— ANI (@ANI) May 14, 2026
वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. भारताने जागतिक संघर्षांबाबत नेहमीच संतुलित भूमिका घेतली आहे. गाझा प्रकरणातही भारताने कधीही हिंसेचं समर्थन केलं नाही. भारताने कायम चर्चा आणि शांततेचाच पुरस्कार केला. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावादरम्यानही भारत पूर्णपणे तटस्थ राहिला आहे.
भारताचे इराणशी असलेले संबंध यूएईइतकेच मजबूत आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची सध्या स्वतः नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. हा या संबंधांचा सर्वात मोठा पुरावा आहे. जर भारत विरोधी असता, तर इराणचे सर्वोच्च मुत्सद्दी आज भारतात नसते.
सोशल मीडियावरील या अपप्रचारामागील हेतू समजून घेणं काही कठीण नाही. तुम्ही या वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या हँडल्सची तपासणी करा. तुम्हाला दिसेल यातले बहुतांश अकाउंट्स नव्यानेच बनवले आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. अनेक हँडल्सवर पाकिस्तानचा झेंडा लागलेला आहे. किंवा त्यांची भाषा स्पष्टपणे भारतविरोधी आहे. हे एका पूर्वनियोजित 'टूलकिट'सारखं काम करत आहे. पंतप्रधान मोदींची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन करणं, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.
भारताच्या आतूनही काही असे घटक सक्रिय आहेत. ते या परदेशी अपप्रचाराला हवा देत आहेत. अशा लोकांची ओळख पटवणं आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणं ही काळाची गरज आहे.
भारत आणि यूएईची मैत्री आजची नाही. ती अनेक दशकं जुनी आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात या नात्याला एक नवी उंची मिळाली आहे. मुस्लिम जग आणि भारत यांच्यात दुरावा पाहू इच्छिणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत हीच मैत्री खुपत आहे.
पंतप्रधान मोदींचा हा पाच देशांचा दौरा यूएईपुरता मर्यादित नाही. ते नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीलाही भेट देणार आहेत. युरोप आणि आखाती देशांसोबतची भारताची ही वाढती जवळीक भारताला जागतिक अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख खेळाडू बनवत आहे.
याच कारणामुळे विरोधी गटात मोठी अस्वस्थता आहे. आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या भारताला रोखणं आता शक्य नाही, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच ते वैयक्तिक चिखलफेक करण्याचा आणि धार्मिक भावना भडकवण्याचा सोपा मार्ग अवलंबत आहेत.
सोशल मीडियावरील हा गदारोळ काही काळासाठी वातावरण नक्कीच बिघडवू शकतो. पण भारत आणि यूएईने मिळून तयार केलेला भक्कम पाया याने अजिबात हलू शकत नाही. ऊर्जा सुरक्षेपासून ते अन्न सुरक्षेपर्यंत दोन्ही देश एकमेकांना पूरक बनले आहेत. अशा परिस्थितीत या अपप्रचाराचा सामना तथ्यं आणि भक्कम मुत्सद्देगिरीनेच केला जाऊ शकतो. पंतप्रधान मोदींचा हा दौरा भारताच्या भविष्यासाठी नवीन आशा घेऊन येत आहे. याच गोष्टीची विरोधकांना सर्वात जास्त भीती वाटत आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter