रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्वपूर्ण चर्चा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह

 

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्व (पश्चिम आशिया) मधील वाढता तणाव यांसारख्या जागतिक संकटांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भारताने कोणत्याही संघर्षावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

युक्रेन आणि मध्य पूर्व संकटावर चर्चा

ब्रिक्स (BRICS) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात आलेले सर्गेई लावरोव्ह आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ही द्विपक्षीय चर्चा जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत युक्रेनमधील सध्याची परिस्थिती आणि इस्रायल-गाझा तसेच इराण संदर्भातील तणावावर विचारविनिमय झाला. जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग असल्याचे भारताने या बैठकीत स्पष्ट केले आहे.

भारताची ठाम आणि समतोल भूमिका

पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, भारत नेहमीच शांततेच्या बाजूने उभा आहे आणि कोणत्याही वादावर लष्करी कारवाई हा अंतिम उपाय असू शकत नाही. दोन्ही देशांनी भारत आणि रशिया यांच्यातील 'विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी' अधिक मजबूत करण्यावरही भर दिला. तसेच, परस्पर सहकार्यातून जागतिक आव्हानांचा सामना करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.