'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांना इतरांचा सल्ला घेण्यासोबतच स्वतःच्या अभ्यासाच्या पद्धतीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. यश हे आत्मविश्वास आणि सतत शिकण्याची वृत्ती यांचा समतोल राखल्याने मिळते, असे त्यांनी आवर्जून सांगितले. सीबीएसई, आयसीएससी आणि इतर राज्य बोर्डांच्या परीक्षा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीतील ७, लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवासस्थानी 'परीक्षा पे चर्चा'च्या ९ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंतप्रधानांनी निवडक एग्जाम वॉरियर्स विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावर्षी गुजरातचे देवमोगरा, तामिळनाडूचे कोईम्बतूर, छत्तीसगडचे रायपूर आणि आसामचे गुवाहाटी येथील विद्यार्थी सुद्धा या संवाद सत्रात सहभागी झाले होते.

अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे निर्माण होणारा गोंधळ कसा हाताळावा, या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, परीक्षार्थींनी आपल्यासाठी नेमकी कोणती पद्धत योग्य ठरते याकडे लक्ष द्यावे आणि इतरांनी दिलेल्या सूचनांचा विचारपूर्वक स्वीकार करावा. मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितले की, "सर्वांचा सल्ला ऐका, पण स्वतःची पद्धत बदलायची असेल तरच ती बदला. मी पंतप्रधान झालो तरी आजही लोक मला काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुचवतात. मात्र प्रत्येकाची स्वतःची एक पद्धत असते. काही जणांना सकाळी लवकर अभ्यास करणे आवडते, तर काही जण रात्री चांगला अभ्यास करतात. तुम्हाला जी पद्धत सोयीची वाटते त्यावर विश्वास ठेवा. सल्ला नक्की घ्या, पण त्याचा फायदा होणार असेल तरच तो आपल्या दिनचर्येत समाविष्ट करा."

पंतप्रधानांनी आपला वैयक्तिक अनुभव सांगताना नमूद केले की, काळानुसार त्यांच्यात बदल झाले आहेत, तरीही त्यांनी आपल्या मूळ तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. "मी देखील काही गोष्टी बदलल्या पण माझी मुख्य पद्धत सोडली नाही," असे ते म्हणाले. 'परीक्षा पे चर्चा' उपक्रमाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, हा उपक्रम गेल्या काही वर्षांत विकसित झाला आहे. "जेव्हा मी हा संवाद सुरू केला होता, तेव्हा त्याची एक निश्चित पद्धत होती. आता मी त्यात हळूहळू बदल करत आहे. या वेळी मी वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील ही सत्रे आयोजित केली. मी माझी पद्धत बदलली असली तरी मूळ उद्देश सोडलेला नाही."

शिक्षकांच्या भूमिकेवर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, शिक्षकांचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहित करणे हा असावा. विद्यार्थ्यांची अभ्यासाची गती ज्या स्तरावर आहे, शिक्षकांची गती त्याच्या एक पाऊल पुढे असायला हवी. आपले उद्दिष्ट असे असावे की जे गाठता येईल, पण ते सहज साध्य होणार नाही. शैक्षणिक यशासाठी आंतरिक विकास आणि आत्म-जागरूकता खूप महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. "आधी स्वतःच्या मनाची तयारी करा, मग आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि त्यानंतर तुम्हाला आवडणारे विषय निवडा. असे केल्यावर विद्यार्थी नेहमीच यशस्वी होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सत्रात मोदींनी परीक्षेचा ताण, वेळेचे व्यवस्थापन, नेतृत्व, आरोग्य आणि स्वप्नपूर्ती अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेली गाणी पंतप्रधानांसमोर सादर केली.

२०२६ च्या या आवृत्तीचा मुख्य भर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करणे आणि शिकण्यावर अधिक लक्ष देणे यावर आहे. यापूर्वी एक्स वर एका पोस्टमध्ये मोदींनी म्हटले होते, "#ParikshaPeCharcha26 नक्की पहा. यावर्षीच्या पीपीसीमध्ये परीक्षेसंबंधित खूप मनोरंजक विषय आहेत. यामध्ये ताणमुक्त राहणे आणि शिकण्यावर लक्ष केंद्रित करणे याला प्राधान्य दिले आहे. मला या व्यासपीठावर येणे नेहमीच आवडते, कारण यामुळे मला देशभरातील हुशार विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो." राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार, परीक्षेच्या काळाला उत्सवाचे रूप देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार, पंतप्रधानांनी आपले विचार "एग्जाम वॉरियर्स" या पुस्तकात संकलित केले आहेत. हे पुस्तक अनेक भाषांसह ब्रेल लिपीतही उपलब्ध आहे. आपल्या मुलांना त्यांचे हक्काचे आनंददायी बालपण मिळावे आणि त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा, यावर त्यांनी पुस्तकात भर दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून साकारलेली ही 'परीक्षा पे चर्चा' दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येत आहे. या वर्षीच्या तयारीचा भाग म्हणून देशभरातील शाळांमध्ये स्वदेशी संकल्प दौड, क्विझ आणि लेखन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये सुमारे ४.८१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.