शिवाच्या समता आणि सहिष्णुतेतून धडा घेण्याची गरज

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 13 h ago
Lord Shiva: The Democratic God and Need for Tolerance in Today's World
Lord Shiva: The Democratic God and Need for Tolerance in Today's World

 

मनजित ठाकूर

आजच्या काळात जेव्हा गोपनीयतेची संकल्पनाच संशयाच्या भोवऱ्यात आहे, तेव्हा ना तुमची गोपनीयता कुठल्या यंत्रणेला महत्त्वाची वाटते, ना तुम्हाला स्वतःला गुप्त राहायचं आहे. यंत्रणांना तुमची माहिती हवी असते आणि तुम्हाला तुमची प्रत्येक गोष्ट शेअर करायची असते; अशा वेळी 'शिवत्व' अत्यंत महत्त्वाचे ठरते.

तुमच्या मनात सहज विचार येईल की शिवत्व आणि गोपनीयता यांचा काय संबंध? तर नक्कीच आहे. ते स्वतः, त्यांचे कुटुंब आणि त्यांचे कल्याण या गोष्टी अत्यंत गोपनीय आहेत. तुम्ही शिवांना सहजपणे ओळखू शकत नाही, पण त्याच वेळी शिव प्रत्येकासाठी नेहमी उपलब्ध असतात.

कुठल्याही मंदिरात जा, जिथे सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या इतर देवांच्या मूर्तींना स्पर्श करणे कठीण असते, तिथे भगवान शंकराच्या पूजेचे महत्त्व शिवलिंगाला स्पर्श करून पूजा करण्यातच आहे.

भगवान शिव लिंग रूपात असोत वा मूर्ती रूपात, ते सदैव उपलब्ध असतात. हे काहीसं असं आहे की एखादा खूप मोठा माणूस तुमच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी नेहमी हसतमुखाने तयार असावा.

पण मी म्हणालो की आज शिवाची गरज आहे. कोणीही विचारू शकेल की या औघडदानी, महादेव, भोलेबाबाची आज गरज का आहे?

कपड्यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देणाऱ्या सध्याच्या काळात, अगदी जुजबी कपड्यात राहणाऱ्याला कोण विचारणार? व्यवस्थित विंचरलेले केस, सुगंधी तेल-अत्तर, सोनं-नाणं आणि हिरे-मोत्यांनी नटलेल्या देवांची स्वतःची एक वेगळीच आभा असते.

त्यामध्ये जटाधारी, गळ्यात साप गुंडाळलेले, जग वाचवण्यासाठी हलाहलासारखे घातक विष पचवणारे, वाघाचे कातडे आणि भस्म लावलेल्या देवाला या देखावा करणाऱ्या जगात कोण महत्त्व देईल? खरं तर, याच गोष्टीसाठी त्यांची गरज आहे.

भगवान शिव मला खूप आवडतात. एक ईश्वर म्हणून, सर्व समुदायांमध्ये समन्वय साधणारे मध्यस्थ म्हणून, आणि एका सुखी कुटुंबाचे प्रमुख म्हणून.

ते आपल्या सर्वांना आवडतात कारण आपल्या संसारातील क्षुल्लक गोष्टींच्या गदारोळात, एकमेकांच्या समुदायांबद्दलची असहिष्णुता, असमानता आणि अन्यायाने भरलेल्या जगात शिव सर्वांसाठी सहज उपलब्ध आहेत. 'शं कल्याणं कुरु'च्या घोषासह महादेव मूळतः शंकर (कल्याण करणारे) आहेत.

त्यांचे तिसरे नेत्र उघडून जगाला (आणि त्यांच्या तपश्चर्येत विघ्न आणणाऱ्या कामदेवाला) भस्म करण्याची त्यांची भीषण आणि संहारक क्षमता खूप चर्चिली जाते. पण कोणाला तरी विचारा की तिसरा डोळा उघडण्याची घटना नक्की किती वेळा घडली? उत्तर आहे, फक्त तीन वेळा.

Shiva: God with the X Factor याचा अर्थ असा की मृत्यू आणि संहाराचे अधिष्ठाता असूनही, शिव बाबा 'औघडदानी' म्हणूनच आपल्यावर कृपा करत असतात.

जरा बारकाईने पाहा, ते हिमालयात अशा ठिकाणी राहतात जिथे गवताची काडीही उगवत नाही. आणि त्यांचे वाहन नंदी (बैल) तिथे कसे राहत असेल? देवी पार्वतीचे वाहन वाघ आहे, ज्याचे अन्न बैल असू शकते.

गणपती बाप्पांचे वाहन उंदीर आहे, जे शंकराच्या गळ्यातल्या सापाचे भक्ष्य ठरू शकते. मोठा मुलगा कार्तिकेय याचे वाहन मोर आहे, जो सापाला गिळंकृत करू शकतो. पण, तरीही सर्वजण एकत्र राहतात.

निस्पृह आणि संसारिक भोगांपासून दूर राहणाऱ्या शंकराची पत्नी गौरी ही सौभाग्याची देवता आहे. एक मुलगा कार्तिकेय देवांचा सेनापती आहे तर दुसरा मुलगा गणेश बुद्धीची देवता आहे. सर्व समुदायांनी मिळूनमिसळून राहण्याचे हे इतके पवित्र उदाहरण आहे, ज्याची भारताला सध्या नितांत गरज आहे.

नुकताच १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे होऊन गेला. नवी पिढी हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस मानते. पण, जसे अप्रतिम आणि पराकोटीचे प्रेम शिवाच्या ठिकाणी पाहायला मिळते, तसे इतरत्र कुठे सापडेल?

जेव्हा माता सती पतीच्या (शिवाच्या) अपमानामुळे यज्ञकुंडात कूदल्या, तेव्हा भगवान त्यांचे पार्थिव शरीर घेऊन तिन्ही लोकात भटकत होते. हे प्रेमाचे अद्भुत रूप आहे, जे समर्पण आणि एकमेकांच्या सन्मानासाठी सर्वस्व त्यागी देण्याचे उदाहरण आहे.

त्याच माता सती जेव्हा पार्वती किंवा गौरीच्या रूपात पुन्हा जन्म घेतात, तेव्हा त्या कुटुंब आणि सौभाग्याची देवता बनतात. म्हणूनच हिंदू स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी गौरीची पूजा करतात आणि शंकरासारखा पती मिळावा म्हणून कुमारिका सोळा सोमवाराचे व्रत करतात. आपल्या पसंतीचा पती मिळवण्यासाठी गौरीने जी कठोर तपस्या केली, ते प्रेमाचे उदात्त रूप आहे.

सोशल मीडियाच्या जमान्यात जिथे आपल्याला 'ब्रेन रॉट'च्या (मेंदू बधीर होण्याच्या) समस्येने ग्रासले आहे, जिथे आपली एकाग्रता क्षमता (अटेंशन स्पॅन) अवघ्या ३ सेकंदांवर आली आहे, तिथे आपल्याला शंकरासारखे एकाग्रचित्त होऊन स्थिरतेचा शोध घ्यायचा आहे.

आपल्याला कार्तिकेय आणि गणेशासारख्या मुलांच्या रूपात आई-वडिलांचा सन्मान करायचा आहे, जिथे आई-वडिलांना प्रदक्षिणा घालणे म्हणजे विश्वाला प्रदक्षिणा घालण्यासारखे मानले जाते.

जिथे शिव हे 'लोकशाहीवादी' देव म्हणून चांगले-वाईट, देव-दानव, मनुष्य-गंधर्व, यक्ष-राक्षस, स्त्री-पुरुष या सर्वांसाठी सहज उपलब्ध आहेत. ज्यांची पूजा दुर्वा-बेलपत्र, भांग-धतुरा यांसारख्या साध्या गोष्टींनी होते आणि हे काहीच नसेल तर केवळ भक्तीभावाने अर्पण केलेला एक तांब्याभर पाणीही त्यांना स्वीकार्य असते.

शिव रावणाची भक्ती स्वीकारतात आणि भगवान श्रीरामाचीही. ते दानवांनाही वरदान देतात आणि देवांचेही रक्षण करतात. त्यांच्या वरातीत त्यांच्यासोबत भूत-प्रेत, वेताळ सगळे काही असतात.

पशुपतिनाथांच्या कल्याणाच्या कक्षेत केवळ मानव-दानव-देव-गंधर्वच नाहीत, तर पशू आणि पक्षीही येतात. समुद्र मंथनात रत्नं देवांनी ठेवून घेतली, अमृतावरून भांडण झाले, पण ज्या हलाहल विषामुळे संसाराचा नाश होऊ शकत होता, ते शिवाने स्वतः पचवले.

ही विश्वाचे कल्याण करण्याची सर्वोत्तम मंगल भावना आहे. शिव हे समरसता, समन्वय, सहिष्णुता, संस्कृती आणि सदाशयतेचे दैवत आहेत. या महाशिवरात्रीला शंकराचा केवळ जलाभिषेकच करू नका, तर त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्नही करा. हर हर महादेव.

(लेखक 'आवाज-द व्हॉइस'चे AV एडिटर आहेत.)