१० नोव्हेंबर २०२५ रोजी लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आलेल्या हरियाणातील अल्-फलाह विद्यापीठावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने शुक्रवारी (१६ जानेवारी २०२६) या विद्यापीठाची सुमारे १४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आणि अल्-फलाह समूहाचे अध्यक्ष जावेद अहमद सिद्दिकी आणि त्यांच्या ट्रस्टविरोधात आरोपपत्र दाखल केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत जारी केलेल्या तात्पुरत्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये फरिदाबादमधील धौज परिसरातील विद्यापीठाची ५४ एकर जमीन, विद्यापीठाच्या इमारती, तसेच विविध शाळा, विभाग आणि वसतिगृहांच्या इमारती जप्त करण्यात आल्या आहेत. अल्-फलाह ट्रस्टच्या मालकीच्या या मालमत्ता 'गुन्ह्यातून मिळालेले उत्पन्न' (Proceeds of Crime) म्हणून वर्गीकृत करण्यात आल्या आहेत. पीटीआयने या आठवड्याच्या सुरुवातीलाच याबाबतचे वृत्त दिले होते.
विद्यार्थ्यांच्या फसवणुकीतून ४१५ कोटींची कमाई जावेद अहमद सिद्दिकी यांना नोव्हेंबर २०२५ मध्येच अटक करण्यात आली होती. त्यांच्या ट्रस्टने चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आणि मनी लाँड्रिंगचा त्यांच्यावर आरोप आहे. एजन्सीच्या दाव्यानुसार, या शैक्षणिक संस्थांकडे शिकवण्यासाठी आवश्यक असलेली वैध मान्यता नव्हती.
सिद्दिकी यांनी खोटी मान्यता आणि दाव्यांच्या आधारे विद्यार्थी आणि पालकांकडून पैसे उकळले. या माध्यमातून त्यांनी तब्बल ४१५.१० कोटी रुपयांचे 'गुन्ह्यातून उत्पन्न' मिळवले, अशी माहिती एजन्सीने नोव्हेंबरमध्ये न्यायालयाला दिली होती. आता सिद्दिकी आणि अल्-फलाह ट्रस्टविरोधात विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत खटला चालवण्याची मागणी ईडीने केली आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही पीएमएलए अंतर्गत मालमत्ता जप्त केली जाते जेणेकरून गुन्ह्यातून मिळालेली रक्कम नष्ट केली जाऊ नये किंवा विकली जाऊ नये. ही तात्पुरती जप्ती अंतिम झाल्यानंतर सरकार नियुक्त 'रिसिव्हर' विद्यापीठ परिसराचा ताबा घेऊ शकतो किंवा प्रशासन पाहू शकतो. त्यामुळे जरी फौजदारी कारवाई आणि खटला सुरू राहिला, तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
लाल किल्ला स्फोट आणि विद्यापीठाचे कनेक्शन एका 'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलच्या तपासादरम्यान विद्यापीठाचा सहभाग समोर आला होता. या प्रकरणात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी तीन डॉक्टरांसह १० हून अधिक लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या विद्यापीठ-कम-हॉस्पिटलमधील एक डॉक्टर, डॉ. उमर-उन-नबी, हा १० नोव्हेंबर २०२५ रोजी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटात आत्मघाती हल्लेखोर बनला होता. तो स्फोटकांनी भरलेली कार चालवत होता आणि या भीषण स्फोटात १५ लोकांचा मृत्यू झाला होता.