बारावीच्या निकालात 'इतक्या' टक्क्यांनी वाढ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 6 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत १४ लाख २३ हजार ९७० नियमित विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ म्हणजेच ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला आहे. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.५१ टक्के, तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९१.९५ टक्के निकाल लागला आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी १४ लाख ३३ हजार ३७१ नियमित विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्य मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली.

सर्व विभागीय मंडळातून नियमितरीत्या परीक्षा दिलेल्या ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.६० टक्के आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४ टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावीच्या निकालाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

सर्व शाखांमधून एकूण ४५ हजार ४४८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५ हजार ८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २२ हजार ४६३ विद्यार्थी (४९.८२ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. जवळपास ४० हजार ७९५ खासगी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३४ हजार ९८८ विद्यार्थी (८५.७६ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेस सात हजार ३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील सहा हजार ९८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, सहा हजार ५८१ विद्यार्थी (९४.२० टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

निकालाची वैशिष्ट्ये....
- एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के

- २१ शिक्षण संस्थांचा शून्य टक्के निकाल

- २ हजार २४६ महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल

- ८ हजार ७८२ विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण

- गैरप्रकारांच्या संख्येत घट

पाच वर्षांतील निकाल
वर्ष : एकूण निकाल (टक्क्यांमध्ये)

२०२० : ९०.६६

२०२१ : ९९.६३

२०२२ : ९४.२२

२०२३ : ९१.२५

२०२४ : ९३.३७

नियमित विद्यार्थ्यांचा निकाल
तपशील : मुले मुली एकूण

नोंदणी झालेले : ७,७१,९२० : ६,६१,४५१ : १४,३३,३७१

परीक्षा दिलेले : ७,६६,६५१ : ६,५७,३१९ : १४,२३,९७०

उत्तीर्ण झालेले : ७,०२,२९६ : ६,२७,३८८ : १३,२९,६८४

उत्तीर्णतेची टक्केवारी : ९१.६० टक्के : ९५.४४ टक्के : ९३.३७ टक्के

शाखानिहाय विद्यार्थ्यांचा निकाल
शाखा : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी
 
विज्ञान : ७,२५,०७७ : ७,०९,३१४ : ९७.८२ टक्के

कला : ३,५१,१४५ : ३,०१,५६६ : ८५.८८ टक्के

वाणिज्य : ३,०७,८७८ : २,८३,८१८ : ९२.१८ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम : ३५,१०६ : ३०,८०८ : ८७.७५ टक्के

आयटीआय : ४,७६४ : ४,१७८ : ८७.६९ टक्के

विभागीय मंडळनिहाय निकाल (टक्क्यांमध्ये)
पुणे : ९४.४४

नागपूर : ९२.१२

छत्रपती संभाजीनगर : ९४.०८

मुंबई : ९१.९५

कोल्हापूर : ९४.२४

अमरावती : ९३

नाशिक : ९४.७१

लातूर : ९२.३६

कोकण : ९७.५१

२६८ विद्यार्थ्यांचा निकाल राखून
राज्य मंडळाने तब्बल २६८ विद्यार्थ्यांचा निकाल तांत्रिक कारणाने राखून ठेवला आहे. त्यात पुणे विभागीय मंडळातील २६४ विद्यार्थी आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील चार विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे. पुणे विभागीय मंडळांतर्गत सोलापूर जिल्ह्यात परीक्षेदरम्यान एका केंद्रावर आक्षेप नोंदविला होता. त्यातील तांत्रिक बाजूची पडताळणी करण्यासाठी संबंधित केंद्रातील विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला असून लवकरच तो जाहीर करण्यात येईल, असे शरद गोसावी यांनी सांगितले.