चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या आमिर खानने पुन्हा एकदा समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. 'टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६'मध्ये आमिर आपल्या संपूर्ण कुटुंबासह धावताना दिसणार आहे. या धावण्यामागे केवळ स्पर्धा नाही, तर समाजाला एक महत्त्वाचा संदेश देणे हा उद्देश आहे.
आमिरच्या या पुढाकारातून 'पाणी फाउंडेशन' आणि 'अगत्सू फाउंडेशन' या दोन महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमांना पाठिंबा मिळणार आहे. धावण्याचा मूळ हेतू जिंकणे नसून ज्ञान प्रसार, सामाजिक बदल घडवणे आणि समुदायासाठी योगदान देणे हा आहे.
कोणी कोणती शर्यत धावणार?
या मॅरेथॉनमध्ये खान कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या प्रकारांत सहभागी होणार आहेत. स्वतः आमिर खान, किरण राव, मुलगा आझाद राव खान आणि मुलगी इरा खान हे 'ड्रीम रन'मध्ये (Dream Run) सहभागी होतील. तर आमिरचा मुलगा जुनैद खान आणि जावई नुपूर शिखरे हे ४२ किलोमीटरची 'फुल मॅरेथॉन' (Full Marathon) पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारणार आहेत.
पाणी फाउंडेशनचे कार्य
आमिर खान आणि किरण राव यांनी स्थापन केलेल्या 'पाणी फाउंडेशन'ने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये मोठे काम उभे केले आहे. ही संस्था पाणी व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीसाठी अविरत कार्य करत आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेपासून या कामाला सुरुवात झाली. आज हे उपक्रम ग्रामीण भागात पाणीसंधारणाचे प्रशिक्षण देणे, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणे आणि शाश्वत शेतीसाठी मार्गदर्शन करणे, यावर भर देत आहेत.
इरा खानची 'अगत्सू' संस्था
दुसरीकडे, इरा खानच्या 'अगत्सू फाउंडेशन'चा उद्देश मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणे हा आहे. मानसिक आरोग्य सेवा सुरक्षित, सोप्या आणि सर्वसमावेशक पद्धतीने उपलब्ध करून देणे हे या संस्थेचे ध्येय आहे. वांद्रे येथे या संस्थेमार्फत एक मोफत कम्युनिटी सेंटर चालवले जाते. तसेच, कमी किमतीत थेरपी क्लिनिक आणि मानसशास्त्रावरील विविध नॉलेज प्रोग्राम्सच्या माध्यमातून ही संस्था लोकांपर्यंत पोहोचत आहे.