'लगान', 'दंगल', आणि 'तारे जमीन पर' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमधून अभिनयाचं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे; पण यावेळी कारण वेगळं आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य करताना आमिर खानने स्वतःच्या अनुभवाची मनमोकळी कबुली दिली आहे.
आमिर म्हणतो, "माझ्या वयाच्या ४४व्या वर्षी मला जाणवलं की, मला मराठी भाषा येत नाही. शाळेत शिकवली जायची; पण मी लक्ष दिलं नव्हतं. मला तेव्हा वाटलं की, ही लाजिरवाणी गोष्ट आहे की मला माझी राजभाषाच येत नाही." त्यानंतर त्याने खास मराठी शिक्षक नेमून मराठी शिकण्यास सुरुवात केली आणि आता तो नीट मराठी बोलू शकतो, असं त्याने स्पष्ट केलं. भाषेवरून निर्माण झालेल्या सध्याच्या वातावरणात आमिर खानने हे मत मांडत असताना सांगितलं की, "अधिकाधिक भाषा शिकणं हे आपल्या फायद्याचं आहे."