आय-लीग विजेते खालिद जमील यांच्याकडे भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
खालिद जमील
खालिद जमील

 

कुवेत येथे जन्मलेले आणि मुंबईत वास्तव्यास असलेले खालिद जमील यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. मागील १३ वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीकडे फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे.
अखिल भारतीय फुटबॉल संघाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत खालिद जमील यांच्याकडे प्रशिक्षकपद सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

स्टीफन कॉनस्टॅनटाइन व स्टीफन टार्कोविच हेदेखील भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावर रुजू होण्यास इच्छुक होते, मात्र कार्यकारी समितीकडून प्रशिक्षकपदी खालिद जमील यांच्या नावावर शिक्कामोर्तव करण्यात आले. खालिद जमील हे भारतीय फुटबॉल संघाचे माजी खेळाडू असून, सध्या जमशेदपूर एफसी या इंडियन सुपर लीग संघाचे प्रशिक्षकही आहेत. अर्थात आता त्यांना जमशेदपूर एफसी संघाचे प्रशिक्षकपद सोडावे लागणार आहे.

प्रशिक्षकपदाचा कालावधी
अखिल भारतीय फुटबॉल संघाचे अध्यक्ष कल्याण चौबे याप्रसंगी म्हणाले की, संघटनेच्या कार्यकारी समितीकडून खालिद जमील यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे, मात्र प्रशिक्षकपदाचा कालावधी अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. खालिद यांना तीन वर्षांचा करार हवा आहे, मात्र समितीमधील काही व्यक्तींनी एक ते दोन वर्षांचा करार करण्यात यावा, अशी सूचना केली आहे, मात्र दोन ते तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात येऊ शकतो. कामगिरीच्या आधारावर हा कालावधी ठरवण्यात येईल. खालिद यांच्यासोबत मानधनाची चर्चा होणे बाकी आहे. त्यांच्यासोबत लवकरच याबाबत संवाद साधण्यात येणार आहे.

भारतीय फुटबॉलच्या तांत्रिक समितीत आय. एम. विजयन व शब्बीर अली हे आहेत. या दोघांचाही भारतीय व्यक्तींनाच प्रशिक्षकपदी पाठिंबा होता. अरमांडो कोलको हे सल्लागार आहेत. तसेच माजी खेळाडू व सध्याच्या कार्यकारिणीतील सदस्यांचाही भारतीय व्यक्तींनाच प्रशिक्षकपदी पाठिंबा होता, अशी माहिती भारतीय फुटबॉल संघटनेकडून याप्रसंगी देण्यात आली.

आईजवॉल क्लबला मार्गदर्शन अन् कलाटणी
खालिद जमील यांनी आईजवॉल या क्लबला २०१७ मध्ये मार्गदर्शन केले. या संघांनी यावर्षी आय लीग ही स्पर्धा जिंकण्याची किमया करून दाखवली. कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या या क्लबने देदीप्यमान कामगिरी केली. यामुळे खालिद जमील हे नावारूपाला आले. तिथून त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली.

खालिद यांची २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठी भारतातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. यामुळे भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदासाठी त्यांच्याच नावाला प्राधान्य होते

कोण आहेत खालिद जमील ?

१९७७ मध्ये कुवेत येथे जन्म
१९९०-९१ मध्ये कुटुंब मुंबईत स्थलांतर
रिझवी महाविद्यालयात शिक्षण
विद्यापीठ संघाकडून फुटबॉल
खेळण्याचा अनुभव
महिंद्रा युनायटेड, एअर इंडिया, मुंबई एफसी क्लबमधून खेळण्याचा अनुभव
१९९७ मध्ये भारतीय फुटबॉल संघामधून पदार्पण
२००६ मध्ये आंतरराष्ट्रीय निवृत्ती

खालिद यांच्या समोरील आव्हान
खालिद जमील यांच्यासमोर भारतीय फुटबॉल संघाची खालावलेली कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान असणार आहे. नेशन्स करंडकाला २९ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर एएफसी आशियाई करंडक पात्रता फेरीच्या लढती पार पडणार आहेत.
 
गटामध्ये भारतीय संघ खालच्या स्थानावर आहे. गटातील अव्वल संघालाच एएफसी आशियाई करंडकासाठी पात्र ठरता येणार आहे. त्यामुळे खालिद जमील यांचा प्रवास सध्या तरी खडतर आहे.