"ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरचे कुटुंब उद्ध्वस्त," जैश कमांडरची कॅमेऱ्यासमोर कबुली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा (JeM) प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याची कबुली खुद्द जैशच्याच एका वरिष्ठ कमांडरने दिली आहे. "या कारवाईत अझहरचे कुटुंब उद्ध्वस्त झाले (torn into pieces)," असे या कमांडरने म्हटले आहे. त्याचा हा व्हिडिओ समोर आल्याने, भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या या कारवाईच्या यशावर शिक्कामोर्तब झाले आहे.

एका अज्ञात ठिकाणी, बहुधा पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) एका मशिदीत, आपल्या समर्थकांना संबोधित करताना या जैश कमांडरचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो 'ऑपरेशन सिंदूर'मुळे झालेल्या नुकसानीचा पाढा वाचताना दिसत आहे.

या कारवाईने दहशतवादी संघटनेचे "कंबरडेच मोडले" असल्याचे तो मान्य करत आहे. तो म्हणतो की, अझहरच्या कुटुंबाची नवीन पिढी "संपली" आहे, ज्यामुळे जैशच्या भविष्यातील कारवायांवर मोठा परिणाम होईल. त्याच्या बोलण्यातून जैश-ए-मोहम्मदला बसलेला मोठा धक्का आणि निराशा स्पष्टपणे दिसून येत आहे.

भारताने पहिलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' ही लष्करी कारवाई केली होती. या कारवाईत दहशतवादी तळांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा भारताने केला होता. आता जैशच्याच कमांडरने दिलेल्या या कबुलीमुळे, भारताच्या दाव्याला एक मोठा आणि ठोस पुरावा मिळाला आहे.

या व्हिडिओमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. आपल्या भूमीवर दहशतवादी संघटना कशा सक्रिय आहेत आणि भारताच्या कारवाईत त्यांचे कसे नुकसान झाले आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे.