खलिस्तानी गटाकडून पुन्हा एकदा धमकी, व्हँकुव्हरमधील भारतीय दूतावासाला घेराव घालण्याची घोषणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

खलिस्तानी दहशतवादी गट 'सिख फॉर जस्टिस'ने (SFJ) पुन्हा एकदा भारतविरोधी भूमिका घेत, कॅनडातील व्हँकुव्हर येथील भारतीय दूतावासाला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. या बंदी घातलेल्या संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नून याने एक व्हिडिओ जारी करून, आपल्या समर्थकांना २८ सप्टेंबर रोजी दूतावासाला घेराव घालण्याचे आवाहन केले आहे.

काही दिवसांपूर्वीच, याच गटाने टोरोंटोमधील भारतीय दूतावासासमोर अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. आता व्हँकुव्हरमध्येही आंदोलन करण्याची घोषणा केल्याने, भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंध अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय आहे धमकी?
गुरपतवंत सिंग पन्नूनने आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, "कॅनडाच्या भूमीवरून भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाला" विरोध करण्यासाठी हा घेराव घातला जात आहे. या आंदोलनादरम्यान, खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जाणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये, खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या आणि दूतावासांवर हल्ला करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे, या ताज्या धमकीनंतर कॅनडा सरकार भारतीय दूतावासाच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलणार, याकडे भारताचे लक्ष लागले आहे.

भारत सरकारने अनेकदा कॅनडा सरकारकडे त्यांच्या भूमीवरून चालणाऱ्या भारतविरोधी आणि खलिस्तानी कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र, कॅनडाने यावर ठोस कारवाई केली नसल्याचा भारताचा आरोप आहे. या नव्या धमकीमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये आणखी कटुता येण्याची शक्यता आहे.