बीएसएनएलची खास 'फ्रीडम' ऑफर: स्वातंत्र्य दिनानिमित्त १ रुपयात एक महिना मोफत 4G सेवा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताची सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने एक खास ऑफर सुरू केली आहे. 'फ्रीडम प्लॅन' नावाच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना एक महिना मोफत 4G सेवा मिळेल. बीएसएनएलने ही ऑफर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आणली आहे. या योजनेत फक्त १ रुपयात ग्राहकांना या सेवा मिळतील.

या ऑफरमुळे, भारताने स्वतः विकसित केलेल्या 4G तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळेल. या योजनेत खालील सेवांचा समावेश आहे:

अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स (लोकल आणि एसटीडी).
दररोज २ GB हाय-स्पीड डेटा.
दररोज १०० एसएमएस.
एक मोफत बीएसएनएल सिम कार्ड.

या ऑफरची घोषणा करताना बीएसएनएलचे सीएमडी ए. रॉबर्ट जे. रवी म्हणाले, "'आत्मनिर्भर भारत' अभियानांतर्गत आम्ही 4G सेवा तयार केली. यामुळे भारत अशा निवडक देशांमध्ये सामील झाला आहे, ज्यांनी स्वतःचे दूरसंचार तंत्रज्ञान तयार केले आहे. आमचा 'फ्रीडम प्लॅन' प्रत्येक भारतीयाला हे स्वदेशी नेटवर्क ३० दिवसांसाठी मोफत वापरण्याची संधी देतो. आम्हाला विश्वास आहे की, लोकांना बीएसएनएलची सेवा नक्कीच आवडेल."

ते पुढे म्हणाले, बीएसएनएल 'मेक इन इंडिया' तंत्रज्ञान वापरून देशभरात १,००,००० 4G साइट्स सुरू करत आहे. सुरक्षित, चांगल्या दर्जाची आणि स्वस्त मोबाइल सेवा देऊन 'डिजिटल भारत' तयार करणे, हा यामागचा एक मोठा उद्देश आहे. नागरिक जवळच्या बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्रात किंवा दुकानदाराकडे जाऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. तसेच, १८००-१८०-१५०३ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवता येईल.