भारताने रशियाकडून तेल व शस्त्रास्त्रे खरेदी केल्याने अमेरिकेने संताप व्यक्त करत आयातशुल्क लादले होते, तसेच दंडही ठोठावला होता. आता याच मुद्द्यावरून अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून आदळआपट सुरू असतानाच भारताने मात्र त्याला संयमित प्रतिसाद दिला आहे. 'भारताचे परराष्ट्र संबंध हे त्या-त्या देशाच्या पात्रतेवर अवलंबून आहेत. त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये. भारत - रशिया संबंध हे दीर्घकालीन विश्वासार्हतेचे व भागीदारीचे आहेत,' असे भारताने म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के एवढे आयातशुल्क आकारणीची घोषणा करत दंडही ठोठावला होता. अमेरिकेकडून एखाद्या देशाला दंड ठोठावला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रम्प यांनी याच मुद्यावरून पुन्हा यूटर्न घेत या आयातशुल्कवाढीस आठवडाभरासाठी ब्रेक लावला आहे. भारताने इराणशी व्यापार केल्याने अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती. काही भारतीय कंपन्यांवर निर्बंध लावले होते. या घटनाक्रमावर परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक वार्तालापादरम्यान प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भूमिका स्पष्ट केली.
भारत-अमेरिका संबंधांबाबत ते म्हणाले की, "भारत आणि अमेरिकेमध्ये एक व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे. ही भागीदारी समान हितसंबंध, लोकशाही मूल्ये आणि मजबूत लोकसंपर्क यावर बेतलेली आहे. अनेक आव्हानांनंतरही उभय देशांमधील संबंध अधिक बळकट झाले आहेत. दोन्ही देशांनी परस्पर हिताच्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले असून हे संबंध भविष्यात आणखी प्रगाढ होतील."
...तर पाककडून तेल खरेदी
अमेरिकेने भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांबाबत ते म्हणाले की " अमेरिकेच्या या निर्बंधांची नोंद घेतली असून त्याचा आढावा घेतला जात आहे. मात्र, भारताचे कोणत्याही देशासोबतचे संबंध हे त्या देशाच्या पात्रतेवर आधारित आहेत. वेगळ्या दृष्टीने त्याकडे पाहिले जाऊ नये. भारत आणि रशिया यांच्यात दीर्घकालीन, स्थिर व विश्वासार्ह भागीदारी आहे."
काही देशांवरील करात घट
ट्रम्प यांनी शुक्रवारी नवा कार्यकारी आदेश जारी करताना भारतासह ६८ देशांवर आयातशुल्क लागू केल्याचे जाहीर केले. नव्या आदेशामध्ये भारतावर बुधवारीच जाहीर केलेले २५ टक्के आयातशुल्क कायम ठेवण्यात आले असून पाकिस्तानसह काही देशांवरील करांमध्ये मात्र घट करण्यात आली आहे. तसेच, या करांची अंमलबजावणी एक ऑगस्टऐवजी सात ऑगस्टपासून होणार आहे. ट्रम्प यांचे हे धोरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची परीक्षाच असल्याचे विश्लेषकांकडून सांगण्यात आले.
"भारत भविष्यात पाकिस्तानकडूनही तेल खरेदी करू शकतो," या ट्रम्प यांच्या विधानावर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. "या विषयावर आपल्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही," अशी सूचक टिपणी जयस्वाल यांनी केली.
काही भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबविल्याच्या बातम्यांवर जयस्वाल यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "भारताची ऊर्जेच्या गरजांबाबतची भूमिका सर्वांना माहिती आहे. बाजारातील पर्याय व जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतले जातात. सध्या याबद्दल (तेलखरेदी थांबविल्याचा) ठोस माहिती आपल्याकडे नाही."
येमेनमध्ये खून प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिच्या बचावाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रवक्ते जयस्वाल म्हणाले की, "हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे."