राजस्थानचा शुष्क पश्चिम भाग असलेल्या थरच्या वाळवंटात संशोधकांनी पहिल्या पुष्टी झालेल्या हडप्पा वसाहतीचा शोध लावला आहे, ज्यामुळे प्राचीन सिंधू संस्कृतीच्या ज्ञात पैलूंवर अधिक प्रकाशझोत पडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संकेत मानले जात आहेत. हा राजस्थानमधील या वाळवंटातील सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा मानला जात असून त्याच्याकडे उत्तर राजस्थान व गुजरातमधील ज्ञात हडप्पा स्थळांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून पाहिले जात आहे.
राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील रातादी री देरी येथे हे प्राचीन अवशेष सापडले आहेत. रामगड तालुक्यापासून ६० कि.मी. व पाकिस्तानातील संघानवालापासून ७० कि. मी. वर असलेल्या या वाळवंटात यापूर्वीच हडप्पाकालिन अवशेष सापडले आहेत. पुरातत्त्वशास्वज्ञ पंकज जगानी यांनी या ठिकाणी उत्खनन केले होते. राजस्थान विद्यापीठातील तज्ज्ञांनी त्यांच्या संशोधनातील निष्कर्षांवर शिक्कामोर्तब केले. जमिनीखालून मिळालेल्या या वस्तूंमध्ये पारंपरिक हडप्पा संस्कृतीतील वस्तू ज्यात लाल मातीची भांडी, छिद्र असलेले जार, मातांच्या छोट्या चकत्या, दगडाची पाती तसेच माती व शंखांच्या बांगडांचा समावेश आहे.
हडप्पा स्थापत्य पद्धतींशी सुसंगत असलेली मध्यवर्ती स्तंभ, पाचरच्या आकाराच्या विटा आणि पाया असलेली एक भट्टी देखील उत्खननात सापडली आहे. सिंथ व रोहरी येथील पाती व सूक्ष्म दगडांपासून बनविलेल्या अवजारांचाही या अवशेषात समावेश आहे. सिंधू संस्कृतीच्या विस्तृत भूभागावर लांब अंतरापर्यंत देवाणघेवाण व संसाधनांच्या एकत्रीकरणाचा हा पुरावा मानला जात आहे.
या ठिकाणी सापडलेले हडप्पाकालिन अवशेष हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे राजस्थान पर्यटन व सांस्कृतिक विभागातील ज्येष्ठ इतिहासतन्या डॉ. तामेग पंवर यांनी सांगितले. या स्थळातून हडप्पा काळातील ग्रामीण वसाहतीची गतिशीलता आणि व्यत्पार, संसाधनांच्या एकत्रीकरणातून शहरी केंद्रांना जोडण्यातील त्यांची भूमिका प्रतिबिंबित होते, असेही त्यांनी सांगितले. हडप्पा काळातील प्रामीण जाळ्याच्या आकलनामध्ये आणखी महत्त्वाचा आयाम या संशोधनामुळे जोडला गेला आहे.
विशेषतः संसाधनांची कमतरता असलेल्या वाळवंटी भागाकडे सिंधू संस्कृतीच्या अभ्यासात दुर्लक्ष झाल्याने हा अभ्यास महत्त्वाचा आहे. या संशोधनासंदर्भातील अहवाल पुरातत्त्वशास्वज्ञ डॉ. जीवनसिंह खारकवल व पंकज जगानी यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकाला सादर केला आहे. तो स्वीकारला गेल्यास हडप्पाकालिन अभ्यासात या स्थळाला जागतिक ओळख मिळू शकते.
पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. जीवनसिंह खारकवल म्हणाले की, "प्राचीन हड़प्पा संस्कृतीतील हे एक छोटे, पण महत्वाचे स्थळ आहे. हे स्थळ इ.स.पू. २६०० ते इ.स.पू. ११०० काळातील असल्याची शक्यता आहे. त्याचे स्थान आणि वैशिष्ट्ये उत्तर राजस्थान आणि गुजरातमधील एक महत्वाची पुरातत्वीय दरी भरून काढतात."
वाळवंटात होती आर्थिक प्रणाली
तज्ज्ञांच्या मते, या स्थळाच्या रचनेतील कालिबंगन व मोहेंजोदडो येथे आढळलेल्या भट्टीसारखे घटक हे सूचित करतात की त्या काळात आज निर्जन समजल्या जाणाऱ्या वाळवंटी भागातही एक सुसंगत सामाजिक-आर्थिक प्रणाली अस्तित्वात होती. या वैशिष्ट्यांवरून सूचित होते की हा परिसर कधीकाळी व्यापारी आणि कारागिरीच्या उत्पादनाला पाठबळ देणारा समृद्ध भाग होता, तो सिंधू संस्कृतीच्या जाळ्याचा भाग होता.