पाकिस्तानमधील कराची आर्ट्स कौन्सिलमध्ये 'मौज' नावाच्या नाट्यसंस्थेने हे नाटक सादर केले. विशेष बाब म्हणजे, या नाटकात काम करणारे सर्व कलाकार मुस्लिम समाजातील असूनही त्यांनी हिंदू धर्मग्रंथावर आधारित एक महत्त्वपूर्ण नाट्य रूपांतर सादर केले.
या नाटकाचे दिग्दर्शन योहेश्वर करेरा यांनी केले आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, "रामायण हे केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर तो एका संस्कृतीचा, मूल्यांचा आणि मानवी भावनांचा आरसा आहे. माझ्यासाठी ते रंगमंचावर साकार करणे हा एक जिवंत आणि विलक्षण अनुभव ठरला."
ते पुढे म्हटले की, "अनेक समीक्षकांनी निर्मितीचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. मला कधीच वाटले नाही की, लोक मला नापसंत करतील किंवा रामायण सादर केल्यामुळे मला काही अडचणींचा सामना करावा लागेल. यातून दिसून येते की, पाकिस्तानी समाज जितका समजला जातो, त्यापेक्षा जास्त सहिष्णु आहे."
प्रदर्शनात प्रगत प्रकाश योजना, लाइव्ह संगीत, विस्तृत वेशभूषा आणि भव्य सेट डिझाइनचा वापर झाला. याची प्रशंसा वरिष्ठ थिएटर समीक्षक ओमैर अलवी यांनीही केली. ते कथाकथनातील प्रामाणिकपणाने प्रभावित झाले. ते म्हणाले की, "रामायण ही अशी कथा आहे, जी जगभरातील लाखो लोकांना जोडते. ती इतक्या दर्जेदार आणि संवेदनशीलतेने मंचावर पाहणे प्रेरणादायी आहे."
AI वापरुन नवे प्रयोग
या संपूर्ण नाट्यमालिकेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करण्यात आला. पारंपरिक रामलीलेला एका आधुनिक टचसह सादर करताना, ग्राफिक्स, पार्श्वभूमी, संवाद आणि संगीत या सगळ्यांमध्ये एआय तंत्रज्ञान वापरून एक भव्य-दिव्य अनुभव प्रेक्षकांना देण्यात आला. कराचीतील प्रेक्षकांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे नव्या पिढीतील तरुण प्रेक्षकांना ही सादरीकरण पद्धत आकर्षक वाटली. मौज या संस्थेने आधीही विविध सामाजिक विषयांवर आधारित नाटके सादर केली आहेत, मात्र रामायण हे त्यांचं सर्वात धाडसी पाऊल मानलं जात आहे.
या नाटकात सीतेची भूमिका मौज ग्रुपच्या निर्मात्या राणा काज्मी यांनी साकारली. त्यांनी हा अनुभव रचनात्मकदृष्ट्या समाधानकारक असल्याचे सांगितले. त्यांना हे महाकाव्य आधुनिक थिएटर शैलीत सादर करण्याचा विचार रोमांचक वाटला.
हा प्रयोग पाकिस्तानात एक धाडसी सांस्कृतिक प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान राजकीय व धार्मिक तणाव शिगेला पोहोचलेल्या काळात रामायणाचे हे नाट्य सलोखा आणि समजूतदारपणा वाढवणे शक्य असल्याचा विश्वास दृढ करते.
नाटकात राम, सीता, लक्ष्मण, रावण आणि इतर महत्त्वाच्या पात्रांना बारकाईने साकारण्यात आले. काही दृश्ये सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मौज ग्रुपचे सदस्य आणि दिग्दर्शक यांनी स्पष्ट केले की हा प्रयोग फक्त कलात्मक प्रयत्न नाही, तर एक सामाजिक संदेश आहे. लोकांमध्ये संवाद, समज आणि सन्मानाची भावना वाढवणे हा त्याचा उद्देश आहे.
दिग्दर्शक करेरा यांनी शेवटी सांगितले, “पाकिस्तानला बाहेरून असहिष्णु देश म्हणून पाहिले जाते. मी दाखवायचे होते की पाकिस्तानी लोक कला आणि संस्कृतीच्या विविधतेला स्वीकारतात आणि तिची कदर करतात.”