परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले की यमनमधील भारतीय नागरिक निमिषा प्रिया यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे.
मंत्रालयाने जनता आणि प्रसारमाध्यमांना या प्रकरणातील अपुष्ट बातम्या आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की सरकार निमिषा आणि तिच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहे.
ते स्थानिक प्रशासन आणि मित्र देशांच्या सरकारांशी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करत आहेत. साप्ताहिक पत्रकार परिषदेत रणधीर जयस्वाल यांनी एएनआयच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, “हा अतिशय संवेदनशील विषय आहे. भारत सरकार या प्रकरणात सर्व शक्य ती मदत करत आहे. आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शिक्षा स्थगित झाली आहे. आम्ही या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहोत आणि सर्वतोपरी सहाय्य करत आहोत.”
यापूर्वी १६ जुलैला होणारी फाशी भारत सरकारच्या नेतृत्वाखालील राजनैतिक हस्तक्षेप आणि चर्चेनंतर स्थगित करण्यात आली होती. जयस्वाल यांनी स्पष्ट केलं की निमिषाचा मृत्युदंड पूर्णपणे रद्द झाल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. ते म्हणाले, “आम्ही या प्रश्नावर काही मित्र देशांशी संपर्कात आहोत. काही घडामोडींचा दावा करणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. कृपया आमच्याकडून येणाऱ्या अधिकृत माहितीची वाट पाहा. आम्ही सर्वांना चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचं आवाहन करतो.”