बॉलीवूडमध्ये अनेक लोकप्रिय जोडीदारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे, पण आता एका नव्या आणि अनपेक्षित जोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रोमॅटिक इमेजसाठी ओळखला जाणारा इमरान आणि गोंडस, घराघरात लोकप्रिय असलेली जेनेलिया पहिल्यांदाच एकत्र काम करत असून, त्यांच्या 'गनमास्टर जी९' या आगामी अॅक्शन ड्रामा चित्रपटाची घोषणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
२० वर्षांपूर्वी 'आशिक बनाया आपने' मध्ये एकत्र काम करणाऱ्या दिग्दर्शक आदित्य दत्त, अभिनेता इमरान हाश्मी आणि संगीतकार हिमेश रेशमिया ही त्रिकूट पुन्हा एकदा एकत्र आली आहे, मात्र यंदा त्यांच्याबरोबर जेनेलिया मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षकांसाठी ही जोडी नवी असली, तरी त्यांच्यातील केमिस्ट्री आणि अॅक्शन-इमोशनचा मेळ पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
या सिनेमात इमरान आणि जेनेलियासोबत अपारशक्ती खुराना आणि अभिषेक सिंग हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त करणार असून, निर्मितीची धुरा दीपक मुकुट आणि हुनर मुकुट यांच्या सोहम रॉकस्टार एंटरटेन्मेंट बॅनरखाली पार पडत आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पावसाळ्यानंतर मुंबईत सुरू होणार असून, त्यानंतर उत्तराखंडमध्येदेखील काही महत्त्वाच्या दृश्यांचे शूटिंग होणार आहे. 'गनमास्टर जी९' २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. जुन्या आठवर्णीची झलक आणि नव्या कथेचा थरार नवी मेजवानी ठरणार आहे का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.