लापता लेडिज या चित्रपटातील अभिनेते-निर्माते आमिर खान, निर्मात्या-दिग्दर्शक किरण राव आणि कलाकार
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, आमिर खान प्रॉडक्शन्स निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ हा चित्रपट शुक्रवारी (ता. १) प्रदर्शित होत आहे. यानिमित्त अभिनेते-निर्माते आमिर खान, निर्मात्या-दिग्दर्शक किरण राव आणि चित्रपटातील कलाकारांशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधी महिमा ठोंबरे यांनी साधलेला संवाद.
‘लापता लेडिज’ या चित्रपटाची कथा एका छोट्याशा गावात घडणारी, मनोरंजक पण त्याचवेळी सामाजिक संदेश देणारी अशी आहे. ही कथा कशी निवडली, याबाबत दिग्दर्शक किरण राव सांगतात, ‘‘लेखक बिप्लब गोसावी यांनी एका स्पर्धेसाठी ही कथा पाठवली होती आणि आमिर खान त्या स्पर्धेचे परीक्षक होते. त्यांना ही कथा खूप आवडली. यावर तू चित्रपट करू शकतेस, अशी कल्पना आमिर यांनीच मला सुचवली. मलाही कथा खूप आवडली. नुकतेच लग्न झालेले जोडपे रेल्वेतून प्रवास करत आहे आणि घरी आल्यावर त्या नवऱ्याला कळते की, रेल्वेतून उतरताना आपण भलत्याच मुलीचा हात धरून उतरलो. आपल्यासोबत आली ती दुसऱ्याच कोणाची तरी पत्नी आहे. ही कल्पनाच मुळात फार मनोरंजक होती. मग आता हे नवरा-बायको भेटणार का, कसे शोधणार एकमेकांना, ही उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. कथेतल्या या शक्यतांमुळे मला ती अधिक भावली.’’
‘‘ही कथा मुळात काहीशी गंभीर आणि वास्तववादी होती, पण मला ती थोडी अधिक मनोरंजक पद्धतीने सादर करायची होती. माझ्या सगळ्या कल्पनांमध्ये प्राण ओतला तो, पटकथा आणि संवाद लिहिणाऱ्या स्नेहा देसाई यांनी,’’ असेही राव सांगतात. ‘‘मानवी स्वभावाचे वेगवेगळे गंमतीशीर पैलू या कथेच्या ओघात आले पाहिजेत,’’ असे आम्ही ठरवले होतेच. पटकथा आणि संवादात ते अतिशय नैसर्गिकपणे साध्य झाले. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा या कथेत होत्या. पण ही कथा गंभीरपणे, प्रबोधनात्मक पद्धतीने सांगितली असती, तर कदाचित ती तितकीशी प्रभावी झाली नसती. म्हणून आम्ही तिला हलक्याफुलक्या विनोदाच्या माध्यमातून सादर केली,’’ असे देसाई म्हणाल्या.
किरणच मला योग्य वाटते
ही कथा सर्वप्रथम तुम्ही वाचली होती. त्याचा चित्रपट तयार झाल्यावर काय वाटले, या प्रश्नावर आमिर खान म्हणाले, ‘‘ही कथा मुळातच खूप रंजक होती. त्यात पुरेसा ‘ड्रामा’ होता. किरण राव या खूप प्रामाणिक आणि वास्तववादी दिग्दर्शक आहेत. त्यांच्याऐवजी दुसरा ‘ड्रामाटिक’ दिग्दर्शक असता, तर चित्रपट ‘मेलोड्रामा’ झाला असता, असे मला वाटते. त्यामुळेच ही कथा दिग्दर्शित करण्यासाठी किरण राव याच योग्य होत्या, असे मला वाटले. चित्रपट पाहिल्यावर त्यांनी या कथेला पुरेपूर न्याय दिला, अशी माझी भावना आहे.’’
स्त्रियांचा क्षीण आवाज वाढावा!
स्त्री दिग्दर्शिकेनी सांगितलेली स्त्रियांची गोष्ट, हे या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य आहे. याबाबत किरण राव सांगतात, ‘‘प्रत्येकाने आपल्याला भावलेली गोष्ट सांगायला हवीच. पण विशेषतः स्त्रियांनी स्त्रियांची गोष्ट सांगायला हवी, हे मला नक्कीच वाटते. चित्रपटसृष्टीतच नव्हे, इतरही अनेक क्षेत्रांत स्त्रियांचा आवाज क्षीण आहे, तो वाढायला हवा. लोकसंख्येचा पन्नास टक्के भाग असलेल्या स्त्रियांनी आपली गोष्ट सांगण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अर्थात एखादा संवेदनशील पुरुषही स्त्रियांची गोष्ट तितक्याच ताकदीने मांडू शकतो, हेही नमूद करायला हवे.’’ याच मुद्द्यावर बोलताना आमिर खान सांगतात, ‘‘उत्तम कलात्मक पार्श्वभूमी असलेला आणि संवेदना जागृत असलेला दिग्दर्शक, मग तो स्त्री किंवा पुरुष असेल, तो कोणाचीही गोष्ट उत्तमपणे सादर करू शकतो.’’
अनुभवी अन् नव्यांची मोट
या चित्रपटातील अनेक कलाकार नवीन आहेत, काहींचा हा पहिलाच चित्रपट आहे, तर काही कलाकार अनुभवीदेखील आहेत. या सगळ्यांची एकत्र मोट बांधून कसे काम झाले, या प्रश्नावर किरण राव म्हणाल्या, ‘‘आमिर खान प्रॉडक्शन्सच्या प्रत्येकच चित्रपटात आम्ही चित्रीकरणापूर्वी अनेकदा संहितेचे वाचन करतो. ते या चित्रपटावेळीही केले. सगळ्या कलाकारांसह कार्यशाळा झाल्या. मुंबईतील ऑफिसमध्ये काही प्रसंगांची तालीम केली. ग्रामीण पार्श्वभूमीवरील चित्रपट असल्याने तिथली भाषा आणि त्याचा लहेजा आत्मसात करता यावा, यासाठी एक खास प्रशिक्षक आम्ही नेमला होता.’’ ‘‘आम्ही सगळे कलाकार चित्रीकरणाशिवायदेखील बराच काळ एकत्र होतो, त्याचा फायदा झाला. संहिता तर अतिशय उत्तम होती, त्यामुळे पाया अगदी पक्का होता. त्यावर चांगली इमारत बांधणे, हे कार्यशाळा आणि किरण राव यांच्या मदतीमुळे शक्य झाले’’, असा अनुभव छाया कदम, स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रांटा आणि नीतांशी गोयल या कलाकारांनी सांगितला.
कथाच सर्वांत महत्त्वाची
या चित्रपटाचे महत्त्व विशद करताना आमिर खान म्हणाले, ‘‘कोरोनानंतरच्या काळात चित्रपटगृहात जायचे म्हणजे एखादा ॲक्शन किंवा भव्यता असलेला चित्रपटच असायला हवा, असा एक गैरसमज विनाकारण रूजला. पण मला हे गृहितक पटत नाही. कोणताही चित्रपट हा त्यातील ॲक्शन, व्हीएफएक्स किंवा चित्रीकरणामुळे भव्य आणि मोठा ठरत नाही. चित्रपट मोठा किंवा भव्य असतो, तो केवळ त्याच्या कथेमुळे. जेव्हा कथा चांगली असते, तेव्हा प्रेक्षकांनाही तो चित्रपट भावतो. त्यामुळे कथा हीच चित्रपटातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.’’ याच मुद्द्याला दुजोरा देताना किरण राव म्हणतात, ‘‘अशीच सशक्त कथा असलेला आमचा ‘लापता लेडिज’ हा चित्रपट आहे, त्यामुळे लोकांना तो आवडेल याची खात्री आहे. भव्यदिव्य आणि ॲक्शन चित्रपटांची संख्या जास्त असताना सकस आशय आणि कथा असलेला हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे माझे आवाहन आहे.’’