'सितारे जमीन पर'च्या खास स्क्रीनिंगवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि अभिनेता आमिर खान
अभिनेता आमिर खानचा विशेष मुलांवर आधारित 'सितारे जमीन पर' सिनेमा सध्या खूप गाजत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्हमध्ये विशेष मुलांसाठी 'सितारे जमीन पर' सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवलं. दिव्यज फाऊंडेशनच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. तसेच अभिनेता आमिर खाननेही हजेरी लावली.
दिव्यज फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या 'सितारे जमीन पर' च्या स्क्रीनिंगला मुंबईतील १५ शाळांमधील विशेष मुलं आणि त्यांच्या पालकांना बोलवण्यात आलं होतं. या सर्व मुलांनी पालकांसोबत सिनेमाचा आनंद लुटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्यासोबत सिनेमा पाहण्यासाठी बसले होते. सोबत अमृता फडणवीस आणि आमिर खानही होते. त्यामुळे या मुलांचा आनंद द्विगुणीत झाला. जवळपास ३०० मुलांनी सिनेमा पाहिला.
सिनेमा पाहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत म्हणाले, "आमिर खान यांनी अतिशय चांगला सिनेमा तयार केला आहे. विशेषत: स्पेशली एबल्ड मुलांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. या मुलांमधील विशेष क्षमता समाजासमोर आणणारा हा सिनेमा आहे. या मुलांचे कुटुंब, शिक्षक त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतात आणि त्यांना समाजात उभं करण्याचा प्रयत्न करतात. समाजानेही त्यांच्याप्रती संवेदनशील असलं पाहिजे हे या सिनेमातून आपल्याला समजतं. म्हणून मी आमिर खान यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्वांनी हा सिनेमा बघितला पाहिजे."
अमृता फडणवीस प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, "आज या स्क्रीनिंगला जमनाबाई नरसी स्कुल आणि इतर शाळांमधील ३०० मुलं आली होती. सर्वांनी 'सितारे जमीन पर' चा आनंद घेतला. समाजाने या मुलांना आदर द्यावा ही शिकवण हा सिनेमा देतो. त्यासाठी आमिर खानचे आभार."