लंडन टाइम्सने परीक्षणात लिहिलेलं होतं. ‘She looks divine and sings like an angel.’ त्या सिनेमामध्ये प्रदीप कुमार हा सलीम होता. प्रदीप कुमार एखाद्या पुतळ्यासारखा सुंदर होता; पण बस तेवढच! त्याचा चेहरा कोरा कागद होता, त्यावर भाव कधी लिहिले जायचेच नाहीत; आणि जो नट अकबर झाला होता, तो या देशाचा शहेनशहा सोडा, एखाद्या कोळशाच्या दुकानाचा मालकसुद्धा नसता वाटला.
त्याच सुमारास कमाल अमरोहीने ठरवल होत की, मीनाकुमारीला घेऊन आपण सलीम-अनारकलीच्या कथेवर सिनेमा काढायचा. गंमत पहा, एका ठिकाणी ‘मुघल-ए-आझम’च्या चार लेखकांपैकी एक लेखक कमाल अमरोही होता, उरलेले तीन म्हणजे अमान उल्ला खान, एहसान रिझवी आणि वजाहत मिर्झा.
आसिफ चिडले, त्यांनी स्पष्टपणे कमाल अमरोहीला सांगितल की, एक तर तू माझ्या सिनेमाचा लेखक राहा, नाहीतर सिनेमा काढ. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला तुला करता येणार नाहीत. त्याने स्वतःचा उद्योग बंद केला. या सिनेमाला फायनान्स पुरवला होता सुप्रसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनी शापूर्जी पालनजीने. ह्या सिनेमामध्ये सेट्स खूप भव्य आहेत. पैसा अक्षरशः पाण्यासारखा खर्च केला गेला.
आसिफला शिश महाल तयार करून तिथे गाण ठेवावस वाटल. तो तयार करण्यासाठी दोन वर्षं गेली आणि त्या काळामध्ये पंधरा लाख रुपये खर्च झाला. अत्यंत महागडे असे रंगीत आरसे बेल्जियमवरून मागवण्यात आले आणि ती किंमत बघून पालनजी झोपले नाहीत.
तो महाल उभा राहिल्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम असा झाला की, शूटिंग करताना त्या आरशांमुळे लाइट रिफ्लेक्ट व्हायला लागला. हा प्रश्न कसा सोडवायचा हा मोठा प्रश्न होता. मग त्यांच्यावर मेणाचा एक अत्यंत पातळ असा थर लावण्यात आला.
पालनजी एवढे चिडले की, त्यांनी सोहराब मोदीकडे हा सिनेमा सोपवायच ठरवल. आसिफ रडकुंडीला आले. त्यांनी सांगितल की, मला काही शॉट शूट करू द्या, त्यांचे निगेटिव्हज मी लंडनला प्रोसेसिंगसाठी पाठवतो आणि काय रिझल्ट आहे तो पाहू या.
नशिबाने रिझल्ट खूप चांगला आला. त्या महालातल ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाण तुफान गाजल. मधुबालाची त्या आरशांमधली हजारो प्रतिबिंबं पाहून इंद्रालासुद्धा सलीमचा हेवा वाटला, स्वर्गात अप्सरेला न्यूनगंड वाटला.
या सिनेमाची सुरुवात झाली होती तेव्हा दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं प्रेम अत्यंत रंगात होत; पण शूटिंग संपेपर्यंत दोघांमध्ये भांडण झालं. त्याच वेळेला मधुबालाला हृदयाचा त्रास सुरू झाला. तिचे वडील शूटिंगच्या वेळी त्रास देत म्हणून त्यांना पत्ते खेळण्यात गुंतवण्याची योजना आखली गेली.
एका माणसाला रोज एक हजार रुपये देऊन त्यांच्याबरोबर पत्ते खेळले जात. त्या माणसाला हरण्याची सक्त ताकीद दिली होती. जो एक फेमस शॉट आहे, त्याला पिसाचा शॉट म्हणतात, त्यात मधुबाला आणि दिलीप कुमार शहामृगाच्या पिसाआड प्रेम करतात.
तिथे बडे गुलाम अली खानचं गाणं हवं होतं. कारण मागे तानसेन गातो, ते चित्रपटसांठी गात नसत. त्यांना त्याकाळात दोन गाण्यांसाठी ५० हजार रुपये दिले गेले. त्या वेळी लता-रफी पाच हजार घेत. सगळ झाल्यानंतर दीड कोटीचा खर्च करून हा चित्रपट तयार झाला. मराठा मंदिर इथे प्रीमियर झालं. अख्खी इंडस्ट्री लोटली.
प्रीमियर झाल्यानंतर काहीजण अस म्हणायला लागले की, एवढा खर्च केला खरा; पण हा चित्रपट चालेल ? तोंडात सिगारेट धरून आसिफ उभा होता. त्याला मात्र खात्री होती, इतिहास घडणार. साठ आठवडे हा सिनेमा या देशातल्या विविध थिएटरमध्ये चालला.
तोपर्यंतचा तो सगळ्यात यशस्वी असा सिनेमा होता. त्याचा विक्रम नंतर अर्थात शोलेने मोडला. अलीकडे त्याच्यावर ब्रॉडवे स्टाइल सांगीतिक नाट्य बसवल गेल, तेही शापूर्जीने. आसिफ हा ‘मुघल-ए-आझम’साठी जन्माला आला आणि त्यानंतर जगातून निघून गेला... आणि अजरामर झाला.
स्वप्न पहाण हे कदाचित सोप्प असत. सिनेमात प्रवेश केल्यापासून त्यांच्या डोक्यामध्ये एक कथा होती आणि ती कथा अर्थात ‘मुघल-ए-आझम’ची. सलीम आणि अनारकली यांची कथा. १९४५ मध्ये आसिफ दिग्दर्शक झाले आणि दिग्दर्शक झाल्यानंतर जो पाहिला सिनेमा काढला त्याचं नाव फूल.
- द्वारकानाथ संझगिरी
(दैनिक सकाळच्या सौजन्याने)