अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री वांद्रे येथील घरात हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या हल्लेखोरापासून मुलांना वाचवताना सैफ गंभीर जखमी झाला होता. या घटनेमुळे सैफ अली खानचे संपुर्ण कुटुंब धोक्यात आले होते.
या घटनेनंतर आत्ता कुठे पटौडी कुटुंब सावरत आहे. दरम्यान सैफ अली खानची बहिण सबा पटौडीने आपल्या भावासाठी 'कुरान ख्वानी'चे आयोजन केले आहे. तसेच 'सदका' देखील दिला आहे. याबाबत सबाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये करीना, तैमूर आणि जेह देखील उपस्थित असलेले दिसत आहेत.
सबाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये कुरान ख्वानी आणि सदकाची एक झलक शेअर केली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "विश्वास माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. सैफ भाई आणि कुटुंब, तैमुर आणि जेह आणि वाहिनीसाठी कुरान ख्वानी आणि सदका देखील केला. हे सर्व नेहमी सुरक्षित राहो."
दरम्यान, चाकूहल्ल्यानंतर सैफला रिक्षाने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर पाच तास सर्जरी झाली आणि सैफच्या पाठीतून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला. सैफच्या मणक्याजवळ तो तुकडा रुतला होता. पाच दिवसांच्या उपचारानंतर सैफला २१ जानेवारी रोजी डिस्चार्ज मिळाला. सध्या या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे.