अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी आपल्या अभिनयाने हिंदीसह बंगाली चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी छाप पाडली आहे. 'आराधना', 'अमर प्रेम'सारख्या हिट हिंदी चित्रपटांसोबतच 'देवी' आणि 'अपूर्व संसार' मधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. दीर्घ काळानंतर 'पुरातन' या बंगाली सिनेमातून त्यांचे मायबोलीत पुन्हा आगमन झाले आहे. आता मात्र शर्मिला टागोर यांनी स्वतःच या चित्रपटाला त्यांच्या बंगाली कारकीर्दीचा शेवटचा चित्रपट असल्याचं जाहीर केलं आहे.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, वय आणि प्रकृतीच्या कारणामुळे पुढे बंगाली चित्रपटांमध्ये काम करणं त्यांच्यासाठी शक्य नाही. 'पुरातन'च्या चित्रीकरणादरम्यानचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या की, गंगेच्या काठी १४-१५ दिवस संपूर्ण टीमसोबत राहून काम करणं खूपच सुखद होतं. 'पुरातन' सिनेमाला ह्युस्टन आणि वॉशिंग्टन, साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान मिळाले आहेत. रितुपर्णा सेनगुप्ता यांनी या चित्रपटात शर्मिला टागोर यांचं मुलीचं पात्र साकारलं आहे. सध्या शर्मिला टागोर यांचं आरोग्य स्थिर असून, त्या कुटुंबासोबत निवांत आयुष्य उपभोगत आहेत.