विमान प्रवाशांना मोठा दिलासा; ६०% जागा आता विनामूल्य, डीजीसीएकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

विमान प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, पारदर्शक आणि सुटसुटीत करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयामार्फत (DGCA) नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सुधारित नियमांनुसार, विमान कंपन्यांना प्रत्येक विमानातील किमान ६०% जागा विनामूल्य ठेवणे बंधनकारक असेल. यामुळे प्रवाशांना समान संधी मिळेल. एकाच पीएनआर (PNR) अंतर्गत बुकिंग केलेल्या प्रवाशांना शक्यतो शेजारील जागा देऊन एकत्र बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नियामक मंडळाने विमान कंपन्यांना क्रीडा साहित्य आणि वाद्ये नेण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक तसेच प्रवासी स्नेही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी सुरक्षा आणि तांत्रिक नियमांचे पालन करणे आवश्यक असेल. तसेच पाळीव प्राण्यांना सोबत नेण्याबाबतचे धोरण विमान कंपन्यांनी स्पष्टपणे प्रसिद्ध करावे, असेही आदेशात म्हटले आहे.

प्रवाशांच्या हक्कांचे फलक ठळकपणे लावावे
मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानांना होणारा विलंब, उड्डाण रद्द होणे किंवा विमानात प्रवेश नाकारला जाणे अशा परिस्थितीत प्रवाशांच्या हक्कांची कडक अंमलबजावणी या सूचनांमुळे सुनिश्चित होईल. विमान कंपन्यांनी प्रवाशांचे अधिकार त्यांच्या वेबसाईट, मोबाईल ॲप्लिकेशन, बुकिंग पोर्टल आणि विमानतळावरील काऊंटरवर ठळकपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे हक्क प्रादेशिक भाषांमध्ये देखील कळवणे बंधनकारक आहे.

एकूण प्रवास अनुभव सुधारणे, पारदर्शकता वाढवणे, तक्रारींचे निवारण करणे आणि भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात सर्वोच्च सुरक्षा मानके राखण्यावर मंत्रालयाचा भर असल्याचे सांगण्यात आले आहे.

उडाण यात्री कॅफे आणि फ्लायब्ररी सुविधांवर भर
भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे. 'उडाण' योजनेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढली असून विमान प्रवास सामान्य लोकांच्या आवाक्यात येत आहे. देशातील विमानतळांवरून आता दररोज ५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. यावरून या क्षेत्राच्या वेगवान प्रगतीची प्रचिती येते.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सर्वोच्च प्राधान्य प्रवाशांच्या सोयींना असून प्रवास सुलभ करण्यासाठी अनेक उपाययोजना लागू केल्या आहेत. यामध्ये स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारे 'उडाण यात्री कॅफे', विनामूल्य पुस्तके उपलब्ध करून देणारी 'फ्लायब्ररी' सुविधा आणि विमानतळांवरील मोफत वाय-फाय सेवांचा समावेश आहे.