West Bengal Election 2026: पश्चिम बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 h ago
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या १५ मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात सुरू असलेले फेरमतदान
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या १५ मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात सुरू असलेले फेरमतदान

 

कोलकाता : २ मे — 

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांमधील १५ बूथवर शनिवारी सकाळी फेरमतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाने एका दिवसापूर्वीच येथे पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले होते. सकाळी ७ वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.

Diamond Harbour: १५ मतदान केंद्रांवर मतदान

मगरहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ११ तर डायमंड हार्बरमधील ४ मतदान केंद्रांवर हे फेरमतदान सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या तासात मतदान अत्यंत शांततेत पार पडले. हिंसाचार किंवा अशांततेची कोणतीही घटना घडलेली नाही. या दोन्ही मतदारसंघांमध्ये केंद्रीय दलाचे पुरेसे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच वेबकास्टिंगद्वारे संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या मतदारसंघांमध्ये २९ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले होते.

TMC vs BJP: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मगरहाट पश्चिममध्ये तृणमूल काँग्रेसचे मोहम्मद शमीम अहमद मोल्ला आणि भाजपचे गौरसुंदर घोष यांच्यात मुख्य लढत आहे. येथे काँग्रेसचे अब्दुल माजिद हलदर आणि आयएसएफचे अब्दुल अझीझ अल हसन हेदेखील रिंगणात आहेत. डायमंड हार्बरमध्ये तृणमूलचे पन्ना लाल हलदर आणि भाजपचे दीपक कुमार हलदर आमनेसामने आहेत. काँग्रेसचे गौतम भट्टाचार्य आणि माकपचे समर नैया हे इतर उमेदवार आहेत.

Falta Constituency: फाल्ता मतदारसंघावर निर्णय लवकरच

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या या दोन्ही विधानसभा जागांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. या आरोपांची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षक सुब्रत गुप्ता यांना तिथे पाठवले होते. दरम्यान, फाल्ता विधानसभा मतदारसंघातील फेरमतदानाबाबत आयोग शनिवारी निर्णय घेणार आहे. २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत पार पडलेल्या या निवडणुकांची मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.