अंतराळवीरांसाठी तयार केला नवीन स्पेससूट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 12 d ago
अमेरिकेच्या चंद्र मोहिमेसाठी वापरला जाणार हा सूट
अमेरिकेच्या चंद्र मोहिमेसाठी वापरला जाणार हा सूट

 

चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास घडविणारे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी ५० वर्षांपूर्वी परिधान केलेला पांढऱ्या रंगातील फुगीर स्पेससूट काळाच्या ओघात बाद ठरला आहे. अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी चांद्रमोहिमेसाठी नवा स्पेससूट (मूनसूट) तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच महिला अंतराळवीरांसाठी वेगळा स्पेससूट तयार केला आहे.

भावी पिढ्यांसाठी तयार केलेल्या काळसर राखाडी रंगावर निळ्या अन केशरी रंगातील डिझाइन असलेल्या या विशेष स्पेससूटच्या प्रारूपाचे अनावरण अमेरिकी अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने नुकतेच केले आहे. ‘नासा’ने ५० वर्षांनंतर पुन्हा मानवी चांद्रमोहिमेसाठी तयारी सुरू केली असून त्यासाठी खास तयार केलेल्या आणि विविध सोयी असलेल्या स्पेससूटमुळे चंद्रावर उतरल्यावर सुलभपणे हालचाल करणे अंतराळवीरांना शक्य होणार आहे. या नव्या ‘मूनसूट’चे अनावरण ह्यूस्टनमधील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये करण्यात आले. ‘नासा’च्या आर्टिमिस या चांद्र मोहिमेसाठी स्पेससूट तयार करण्याचे काम टेक्सासमधील ‘ॲक्झिओम स्पेस’ या कंपनीला दिले आहे. या कंपनीतर्फे अनावरणाचा कार्यक्रम पत्रकार आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. ‘नासा’चे अध्यक्ष बिल नेल्सन यांनी नव्या स्पेससूटची माहिती दिली.

स्पेससूटची वैशिष्ट्ये
- ॲक्सिओम एक्स्ट्रॉव्हेईक्युलर मोबिलिटी युनिट (एक्सईएमयू) असे नाव
- जुन्या अपोलो मोहिमेतील सूटपेक्षा हा स्पेससूट अधिक सुटसुटीत आणि लवचिक आहे
-अंतराळवीरांनुसार वेगवेगळ्या मापात आणि आकारात सूट तयार केले असून तो घातल्यानंतर हालचाली सुलभपणे होतील
-अमेरिकेतील ८० टक्के पुरुष आणि स्त्रियांना हा स्पेससूट घालता येऊ शकतो, अशा मापात तो शिवला आहे.
- जीवरक्षक प्रणालीने युक्त असलेला या सूटमध्ये शरीराचे रक्षण करणारे कपडेही आणि इलेट्रॉनिक्स उपकरणेही त्याला जोडलेली आहेत
- काळसर राखाडी, निळा व केशरी रंगात हा स्पेससूट शिवलेला असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाताना अंतराळवीर पांढऱ्या रंगातील सूट घालणार आहेत
- कारण चंद्राच्या पृष्ठभागावर पडणारा प्रखर सूर्यप्रकाशाचे परावर्तन करण्यासाठी आणि अतिउष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी पांढरा सर्वोत्तम रंग आहे
- सूटचे बाह्य आवरण तयार करण्यासाठी ‘ॲपल टिव्ही प्लस’वरील ‘फॉर ऑल मनकाइंड’ या चंद्रासंबंधीच्या मालिकेचे वेशभूषाकार इस्टर मारक्विस यांची मदत