संरक्षणात पडणार 'अँटी ड्रोन' आणि 'संचार'चे पाऊल

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Anti Drone System @AeroIndia Expo
Anti Drone System @AeroIndia Expo

 


बंगळूर: केवळ देशाचे संरक्षणच नाही तर सशस्त्र दलांसह समाजासमोर असलेली आव्हाने सोडविण्यासाठी आपल्या कौशल्य आणि नवीन कल्पनांचा वापर सैन्यदलातील अधिकारी व जवान करत आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात ‘अँटी ड्रोन’ आणि लष्करी संसाधने व मनुष्यबळाचे ट्रॅकिंग करण्यासाठी आधुनिक प्रणालीची निर्मिती करत या अधिकाऱ्यांनी एक नवा टप्पा पूर्ण केला आहे. असाच अनुभव घडला तो बंगळूर येथे सुरू असलेल्या ‘एरो इंडिया’मध्ये आयोजित प्रदर्शनात. जेथे सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी काही नाविन्य सादर केले आहे.

एफ-एसएनएस ‘अँटी ड्रोन’ प्रणाली
पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या सैन्यदलातील लेफ्टनंट कर्नल सदानंद चौहान या मराठमोळ्या अधिकाऱ्याने सीमेवर शत्रूच्या ड्रोनचा सामना करण्यासाठी एफ-एसएनएस ‘अँटी ड्रोन’ प्रणाली विकसित केली आहे. ‘एरो इंडिया’मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या विकसित प्रणालीची पाहणी केली आहे. लवकरच ही प्रणाली सीमावर्ती भागात देखरेखीसाठी वापरण्याबाबत धोरणनिश्चिती करण्यात येणार आहे. मूळचे लातूरचे लेफ्टनंट कर्नल चौहान यांनी ‘अँटी ड्रोन’साठी एक सॉफ्टवेअर आणि संपूर्ण प्रणालीची निर्मिती केली आहे. सीमावर्ती भागात सीमेची सुरक्षा करण्यासाठी जवानांकडून प्राधान्य दिले जात असते. मात्र अलीकडे सीमावर्ती भागात ड्रोनच्या हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. या ड्रोनचा धोका टाळणे आणि सीमेवर सुरक्षित वातावरण कायम ठेवण्याकरिता ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शत्रूच्या ड्रोनला निकामी केले जाते.
 
 
या प्रणालीची निर्मिती बाबत लेफ्टनंट कर्नल सदानंद चौहान म्हणाले की, याची निर्मिती एमटेककरत असताना केली . मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकॉम इंजिनिअरिंग (एमसीटीई) आणि पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या साह्याने या ‘अँटी ड्रोन’ प्रणालीची निर्मिती करणे शक्य झाले. यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला. नुकतीच याची उत्तरेकडील सीमा भागात, जम्मू आणि काश्मीर येथे यशस्वी चाचणी झाली आहे. या प्रणालीला इंडियन आर्मी आयडिया अँड इनोव्हेशन स्पर्धेत पुरस्कार मिळाला असून, तीन महिन्यांत याचे किमान दोन प्रोटोटाइप तयार करण्यात येणार आहेत. त्याच्या चाचणीनंतर या प्रणालीचे नामकरणही होईल.
 
‘अँटी ड्रोन’ प्रणालीबाबत
- रेडिओ फ्रिक्व्हेन्सी काउंटर ड्रोन सिस्टीम अशी ही प्रणाली आहे
- सीमावर्ती भागात आढळणाऱ्या ड्रोनला निकामी करणे
- चाचणी पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष वापरास होणार सुरवात
- ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
 
लष्कराच्या संसाधनांचे ‘संचार’द्वारे रिअल टाइम ट्रॅकिंग
 
सैन्यदलातर्फे सीमावर्ती भागासह देशात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत विमानाद्वरे प्रत्यक्ष मदत पोहचविण्यात येते. मात्र विमानातून सोडण्यात आलेले लष्करी वाहन, अन्नधान्य, वैद्यकीय सामग्री किंवा पॅराट्रूपर जवान यांचे प्रत्यक्ष ठिकाण शोधणे काही वेळा अशक्य असते. त्यात यंत्रणेचा वेळही जातो, तर आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यात हवाई मार्गाने आवश्यक संसाधने पुरविताना ही संसाधने योग्य ठिकाणी पोहचली की नाही याची ही खातरजमा होणे महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टींचा आढावा घेत सैन्यदलातील कॅप्टन करण सिंह, सुभेदार प्रशांत सप्रे आणि सिग्नल मॅन विजय गुज्जर यांनी ‘संचार’ ही प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली लष्कराच्या संसाधनांची रिअल टाइम ट्रॅकिंग करण्यास सक्षम आहे. दरम्यान, याचा वापर केवळ भारतातच नाही तर आता तुर्कीमध्येही होत आहे.
 
या प्रणालीच्या परीक्षणावर बोलत असताना  सुभेदार प्रशांत सप्रे, यांनी सांगितले की, ही प्रणाली  विकसित करण्यासाठी सुमारे ८ महिन्यांचा कालावधी लागला असून, याच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामुळे आता सैन्यदलात आपल्या संसाधनांची योग्य ठिकाणी होणारी पोहोच तसेच मनुष्यबळ याचा माग काढणे शक्य होत आहे. नुकतेच तुर्की या देशात आपत्ती व्यवस्थापनासाठी भारतीय सैन्यदलाची तुकडी वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी पोहचली असून, त्यासाठीदेखील या प्रणालीचा वापर केला जात आहे.
 
‘संचार’ प्रणालीबाबत
- स्वदेशी तंत्रज्ञानावर निर्मित रिअल टाइम ट्रॅकिंग प्रणाली
- या प्रणालीचा वापर करताना इंटरनेटची आवश्यकता नाही
- याचा वापर करण्यासाठी किमान २ मोड्युलची गरज
- या प्रणालीसाठी संचार ॲपदेखील तयार करण्यात आले आहे
- प्रत्यक्ष ट्रॅकिंगबरोबर संवाद साधणे शक्य
- अत्यल्प किमतीत दर्जेदार प्रणालीची निर्मिती