गुगल मॅप्समध्ये 'जेमिनी एआय'ची एन्ट्री; आस्क मॅप्समुळे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र

 

गुगल मॅप्स आता केवळ एक साधा नकाशा राहिलेला नाही. एका मोठ्या बदलानंतर तो आता तुमचा अत्यंत स्मार्ट आणि बोलका प्रवासी मार्गदर्शक बनला आहे. गुगलने अलीकडेच 'मॅप्स'मध्ये गेल्या दशकातील सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यात 'जेमिनी एआय'चा वापर करण्यात आला आहे. प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकणारी ८ नवीन भन्नाट वैशिष्ट्ये यात आणली आहेत.

ही नवीन वैशिष्ट्ये कोणती आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊया.

१. 'आस्क मॅप्स'ची भन्नाट सुविधा

हे गुगल मॅप्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. आता तुम्ही मॅप्सला तुमच्या गरजेनुसार मोठे आणि गुंतागुंतीचे प्रश्न विचारू शकता. उदाहरणार्थ, "माझ्या फोनची बॅटरी संपत आली आहे, रांगेत उभे न राहता फोन कुठे चार्ज करता येईल?" गुगलचे 'जेमिनी एआय' तुमच्या आधीच्या शोधांचा अभ्यास करून तुम्हाला अत्यंत अचूक आणि तुमच्या आवडीनुसार पर्याय सुचवते.

२. सजीव 3D  दृश्य

ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक जिवंत करण्यासाठी गुगलने नेहमीच्या सपाट नकाशाऐवजी 3D दृश्य आणले आहे. यात आजूबाजूच्या इमारती, पूल आणि भौगोलिक रचना अगदी स्पष्ट आणि हुबेहूब दिसतात. इमारती पारदर्शक दिसतात. यातून पुढचा रस्ता समजणे अत्यंत सोपे होते.

३. रस्त्यांवरील अचूक माहिती

वाहन चालवताना लेन बदलणे किंवा वळण घेणे अनेकदा गोंधळाचे ठरते. नव्या अपडेटमध्ये रस्त्यावरील लेन, झेब्रा क्रॉसिंग, ट्रॅफिक सिग्नल, दुभाजक आणि थांबण्याची चिन्हे अगदी अचूक आणि ठळकपणे दिसतात. याचा अपघात टाळण्यासाठी खूप मोठा फायदा होईल.

४. नैसर्गिक आवाजातील सूचना

नेहमीच्या यांत्रिक आवाजाला आता सुट्टी मिळाली आहे. गुगल मॅप्स आता तुमच्या शेजारी बसलेल्या एखाद्या मित्रासारख्या सूचना देईल. "पुढचा एक्झिट सोडून द्या आणि त्यानंतरच्या एक्झिटवरून उजवीकडे वळा", अशा अतिशय सोप्या आणि नैसर्गिक भाषेतील सूचना आता तुम्हाला ऐकायला मिळतील.

५. पर्यायी मार्गांची तुलना

अनेकदा आपल्याला दोनपैकी कोणता रस्ता निवडावा, असा मोठा प्रश्न पडतो. आता गुगल मॅप्स तुम्हाला पर्यायी रस्त्यांचे फायदे-तोटे स्पष्टपणे सांगेल. एक रस्ता लांबचा पण कमी गर्दीचा असू शकतो. दुसरा रस्ता जवळचा पण टोलचा असू शकतो. या दोन्हींची तुलना करून योग्य निर्णय घेणे आता खूप सोपे होईल.

६. स्मार्ट झूम आणि विस्तृत दृश्य

तुम्हाला तुमचा पुढचा संपूर्ण रस्ता एकाच वेळी पाहता येईल. यासाठी 'स्मार्ट झूम'चा पर्याय देण्यात आला आहे. अवघड वळणे किंवा लेन बदलण्याची माहिती खूप आधीच मिळते. यातून वाहनचालक सावध राहतात आणि सुरक्षितपणे गाडी चालवू शकतात.

७. प्रवासातील अडथळ्यांची तत्काळ माहिती

रस्त्यावरील खड्डे, बांधकाम किंवा अपघाताची माहिती आता तुम्हाला अगदी वेळेवर मिळेल. जगभरातील कोट्यवधी वाहनचालकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे गुगल मॅप्स तुम्हाला रस्त्यावरील कोणत्याही अडथळ्याची पूर्वकल्पना देईल.

८. पोहोचण्यापूर्वीच ठिकाणाची संपूर्ण माहिती

तुम्ही इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वीच गुगल मॅप्स तुम्हाला त्या इमारतीचे प्रवेशद्वार आणि पार्किंगची जागा दाखवेल. तुम्हाला रस्त्याच्या नेमक्या कोणत्या बाजूला थांबायचे आहे, याची स्पष्ट माहितीही मिळेल. यातून शेवटच्या क्षणी होणारी गडबड आणि गोंधळ पूर्णपणे टळणार आहे.

गुगलचे हे नवे तंत्रज्ञान सध्या अमेरिका आणि भारतात उपलब्ध होत आहे. आगामी काळात हे बदल प्रवासाची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकतील.