डीप स्पेस मायक्रोचिपच्या निर्मिती क्षेत्रामध्ये भारताने आज महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३२ बिट मायक्रोप्रोसेसर विक्रमचे आज 'सेमीकॉन इंडिया २०२५' या परिषदेमध्ये अनावरण करण्यात आले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) पुढाकाराने आणि त्याच संस्थेच्या वापरासाठी या चिपची निर्मिती करण्यात आली आहे. देशातील सेमीकंडक्टर उद्योगाला या चिपमुळे मोठे बळ मिळणार असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
पंतप्रधान मोदींनी यावेळी जागतिक कंपन्यांना भारतातील सेमीकंडक्टर उद्योगात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. आजमितीस देशातील मायक्रोचिपची बाजारपेठ ही ५० अब्ज डॉलरची असून ती २०३० च्या अखेरीस शंभर अब्ज डॉलरवर पोहोचेल. आज अवघे जग हे भारताच्या सहकायनि सेमीकंडक्टर भवितव्याची उभारणी करण्यासाठी सज्ज झाले असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. देशातील दहा फॅब्रिकेशन कारखान्यांमध्ये १८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येईल. सरकार यासाठी सर्वसमावेशक इकोसिस्टिमची उभारणी करत आहे त्यामुळे मायक्रोचिपची निर्मिती, विकास आणि पॅकेजिंगची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रतिकूल वातावरणातही टिकाव
या चिपच्या निर्मितीसाठी एडीए प्रोग्रॅमिंग लैंग्वेजचा वापर करण्यात आला असून उपग्रहे, एअर ट्रैफिक कंट्रोल सिस्टिम आणि प्रक्षेपकाच्या निर्मितीमध्ये तिला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अगदी प्रतिकूल वातावरणामध्ये देखील ही चिप टिकाव धरू शकते. आतापर्यंत 'इस्रो'कडून १६०१ या व्हेरिएंटच्या चिपचा वापर केला जात होता त्यात आता सुधारणा करून तिला 'विक्रम ३२०१' असे नाव देण्यात आले आहे.
बड्या कंपन्यांना मोठा लाभ
भारत या चिप निर्मितीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकू शकतो असे बोलले जाते. नागरी वापरासाठी देखील या चिपचा वापर करता येईल. अॅपल आणि सॅमसंगसारख्या बड्या कंपन्यांना यामुळे भारतामध्ये गुंतवणूक करणे अधिक सुलभ होईल असे मानले जाते. सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारताने याआधीच इंडिया सेमीकंडक्टर मोहीम सुरू केली आहे.
भारत सरकारची नवी मोहीम
भारत सरकार हे पुढील टप्प्यातील सेमीकंडक्टर मोहीम आणि डिझाइनशीसंबंधित अनुदान योजनेवर काम करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. डिजिटल पायाभूत सेवांचा आधार ही दुर्मीळ खनिज संपदा असून, सध्या सरकारने दुर्मीळ खनिज मोहिमेवर काम करायला सुरूवात केली आहे. त्या माध्यमातून दुर्मीळ खनिजांच्या वाढत जाणाऱ्या मागणीची पूर्तता करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जगाला आकार देणारी चिप
शांघाय सहकार्य परिषदेच्या व्यासपीठावरून पंतप्रधानांनी सेमीकंडक्टर चिपचे महत्त्व अधोरेखित करताना तिला 'डिजिटल हिरा' असे संबोधले होते. मागील शतकामध्ये तेल आणि या शतकात ही सूक्ष्म चिप जगाला आकार देणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. जवळपास सर्व इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये मायक्रोचिपचा वापर करण्यात येतो. अवकाश मोहिमांमध्येदेखील ही चिप गेमचेंजर ठरणार असून, सध्या या आघाडीवर भारताची तैवान, चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांसोबत स्पर्धा सुरू आहे.