डावीकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील
पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पुण्यात पत्रकारिता करताना बघितलेले अजित पवार आणि नंतर आमदार असताना बघितलेले अजित पवार याबद्दल मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या.
पत्रकारिता करताना अजित पवारांसोबतच्या आठवणी
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणी ताज्या करताना सांगितले की, "अजितदादांना मी पत्रकार आणि राजकीय नेता अशा दोन्ही चष्म्यांतून पाहू शकलो. पुण्यात एका वृत्तवाहिनीसाठी बातमीदारी करायचो. तेव्हा अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते. पत्रकार परिषदा, जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठका, कार्यक्रम यातून त्यांना खूप जवळून पाहता आले. त्यावेळेसच जाणवले, की त्यांची प्रशासनावर हुकूमत आहे. त्यांनी बोलावलेली बैठक म्हणजे अधिकाऱ्यांना टेन्शनच असायचे. अधिकारी खासगीत म्हणायचे देखील, की इतरांना गुंडाळून ठेवता येते तसे अजित दादांना गुंडाळता येत नाही. पत्रकार परिषदांमधील त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर छान असायचा. एकदा कॅमेरे बंद झाले, की ते गप्पांमध्ये खूप खुलायचे."
ते पुढे म्हणाले की, "पत्रकारितेतून मी राजकारणात आलो आणि आमदार झालो. तेव्हा मी अजित पवार यांना वेगळ्या भूमिकेतून बघितले. विधानसभेत मी ज्या आसनावर बसायचो त्याच्या शेजारच्या भागातील पहिल्या रांगेत अजित पवार, जयंत पाटील, आर. आर. पाटील बसायचे. या तिघांची भाषणे ऐकण्यासाखी आणि शिकण्यासारखी असायची."
सेक्युलर नेता
इम्तियाज जलील पुढे म्हणाले की, "आपल्या सहकाऱ्याच्या प्रश्नाला मंत्र्याने समाधानकारक उत्तर दिले नाही तर अजित पवार उभे राहून जाब विचारत. नव्या आमदारांना पुढे नेण्याची त्यांची ही पद्धत मला आवडून गेली. मी त्यांचा राजकीय विरोधक असलो तरी त्यांच्यासारखा सक्षम आणि कार्यक्षम नेता महाराष्ट्रात नव्हता यावर मी ठाम आहे. मी त्यांना कायमच एक 'सेक्युलर' नेता म्हणूनच ओळखतो. त्यामुळेच ते भाजपसोबत गेल्यावर मला प्रचंड धक्का बसला आहे. त्यांच्याही काही अडचणी असतील. पण म्हणून एक राजकीय नेता, उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ओळख टाळता येणार नाही."