व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणार 'हे' दोन खास एआय फीचर्स

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सध्या जगात सगळीकडे एआयचा बोलबाला सुरू आहे. प्रत्येक अ‍ॅपमध्ये एआय फीचर्स येण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता व्हॉट्सअ‍ॅप देखील मागे राहिलेलं नाही. लवकरच मेटा कंपनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दोन खास एआय फीचर्स देणार आहे.

WABetaInfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. Ask Meta AI असं यातील पहिल्या फीचरचं नाव आहे. चॅटजीपीटीला ज्याप्रमाणे आपण प्रश्न विचारू शकतो, तशाच प्रकारचं फीचर या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळेल. म्हणजेच, यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपवरुन मेटा एआयला आपले प्रश्न विचारू शकतील.

या फीचरची चाचणी सध्या सुरू असून, व्हॉट्सअ‍ॅपच्या Android २.२३.२५.1५ या अपडेटमध्ये हे फीचर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यामुळे यूजर्सना मेटा एआय या वेबसाईटवर जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे यूजर्सचा वेळही वाचणार आहे. या फीचरची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ते सर्वांसाठी उपलब्ध होईल.

एआय फोटो एडिटर
यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच एआय फोटो एडिटिंग फीचरही येण्याची शक्यता आहे. यामुळे यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपवरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने फोटो एडिट करू शकतील. हे फीचरही अद्याप टेस्टिंग मोडवर असल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅप बीटा इन्फो वेबसाईटने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये यूजर्सना तीन ऑप्शन मिळतील. बॅकड्रॉप, रिस्टाईल आणि एक्स्पांड असे तीन पर्याय यात असतील. यासोबतच फोटो क्लिप करणं, फोटोमध्ये टेक्स्ट अ‍ॅड करणं आणि इतर फीचर्सही मिळणार आहेत.