दिल्लीत 'एक्यूआय'ने ओलांडला ४०० चा टप्पा; थंडीच्या लाटेमुळे 'ऑरेंज अलर्ट'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दिल्लीकरांवर सध्या दुहेरी संकट ओढवले आहे. सोमवारी सकाळी दिल्लीची हवा अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली असून 'एअर क्वालिटी इंडेक्स' (एक्यूआय) ४०३ इतका नोंदवला गेला. देशाची राजधानी पुन्हा एकदा विषारी हवेच्या विळख्यात सापडली आहे. रविवारी हवेची गुणवत्ता 'अतिशय खराब' श्रेणीत होती, मात्र दिवसाच्या अखेरीस दाट धुके आणि प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे दिल्लीतील परिस्थिती अधिकच बिघडली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी अनेक ठिकाणी एक्यूआय ४०० च्या वर गेला आहे. यामध्ये आनंद विहार (४५८), अशोक विहार (४३०), बुराडी क्रॉसिंग (४०१), चांदनी चौक (४२६), जहांगीरपुरी (४३९), मुंडका (४१६), नरेला (४०४) आणि ओखला फेज-२ (४११) या केंद्रांचा समावेश आहे.

दिल्ली आणि लागून असलेल्या नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम तसेच फरीदाबाद या शहरांमध्ये सोमवारी सकाळी दाट धुके पसरले होते आणि दृश्यमानता शून्यावर (झीरो व्हिजिबिलिटी) आली होती. हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत असून एक्यूआय ४०० च्या वर गेला आहे. रविवारी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर विषारी धुक्याची चादर पसरली असताना नागरिक तेथून मार्गक्रमण करत होते.

२५ डिसेंबरपासून हवेच्या गुणवत्तेत सातत्याने घसरण सुरू असून परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर तज्ञांनी लहान मुले, वृद्ध आणि श्वसन किंवा हृदयाशी संबंधित आजार असलेल्या नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने (आयएमडी) २९ डिसेंबर रोजी दिल्लीसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. दिल्लीत थंडीचा जोर कायम असून कमाल तापमान २२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

परिस्थिती गंभीर असल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी केंद्रीय यंत्रणेची बैठक होण्याची शक्यता आहे. सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये 'ग्रॅप-३' (GRAP-3) चे निर्बंध लागू आहेत. याअंतर्गत खाजगी बांधकामांवर बंदी असून बीएस-३ पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.