केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, शुक्रवारी सकाळी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली आहे. सकाळी ८ वाजता दिल्लीचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) २२६ इतका नोंदवला गेला. ही पातळी धोकादायक (poor) श्रेणीत मोडते. गुरुवारी हा निर्देशांक २४१ होता, त्या तुलनेत आज हवेत सुधारणा झाली असली तरी राजधानीचे अनेक भाग अजूनही प्रदूषणाच्या विळख्यात असून सकाळी धुक्याची पातळ चादर पसरली होती.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, आनंद विहार (२६१), अशोक विहार (२५९), चांदणी चौक (२४०), द्वारका सेक्टर ८ (२७३), आर.के. पुरम (२७१) आणि ओखला फेज २ (२६२) या भागांमधील हवेची गुणवत्ता अजूनही 'धोकादायक' श्रेणीत कायम आहे. याशिवाय डीटीयू (२२८), बवाना (२६६), सोनिया विहार (२६२), रोहिणी (२६८) आणि शादीपूर (२८०) या परिसरांमध्येही प्रदूषण पातळी चिंताजनक आहे.
दुसरीकडे, दिल्लीतील अनेक भागांत हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा दिसून आली असून तेथील निर्देशांक 'मध्यम' (moderate) श्रेणीत आला आहे. औद्योगिक क्षेत्रांच्या तुलनेत आयजीआय टर्मिनल ३ (१४८), मथुरा रोड (१८३), पुसा (१९०), नॉर्थ कॅम्पस (२०२) आणि लोधी रोड (१५७) येथील हवेची स्थिती बऱ्याच अंशी चांगली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या वर्गीकरणानुसार, ० ते ५० 'चांगली', ५१ ते १०० 'समाधानकारक', १०१ ते २०० 'मध्यम', २०१ ते ३०० 'धोकादायक', ३०१ ते ४०० 'अत्यंत धोकादायक' आणि ४०१ ते ५०० 'गंभीर' अशी वर्गवारी केली जाते.
हवेत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी शहराच्या काही भागांत धुरक्याचा थर कायम असून एकूण हवेची गुणवत्ता खराब श्रेणीतच आहे. यापूर्वी गुरुवारी आनंद विहार (३३२), बवाना (३०६), अशोक विहार (३२०), द्वारका सेक्टर ८ (३२८), आर.के. पुरम (३१४), रोहिणी (३२२) आणि पटपरगंज (३०७) यांसारख्या अनेक भागांत 'अत्यंत धोकादायक' हवा नोंदवण्यात आली होती.
काही भागांतील स्थिती इतर ठिकाणांच्या तुलनेत चांगली होती. उदाहरणार्थ, आया नगरचा निर्देशांक २१४, चांदणी चौक (२१८) आणि सोनिया विहारमध्ये (२९९) हवेत सुधारणा झाली असली तरी हे स्तर 'धोकादायक' श्रेणीतच होते. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्लीचे तापमान ९.४ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. गेल्या २४ तासांत किमान तापमानात १ ते २ अंशांनी वाढ झाली असून कमाल तापमानात कोणताही मोठा बदल झालेला नाही.